ही तक्रार मुख्यत: लहान मुलांमध्ये, पण कधीकधी मोठया वयातही आढळते. (विशेषत: गरोदरपणी अनेक स्त्रियांची ही तक्रार असते.) यात माती, भिंतीचा रंग, राख, चुना, खडू, पेन्सिल, इत्यादी एरवी ‘अखाद्य’ असे अनेक पदार्थ येतात. माती खाण्याची तक्रार उद्भवण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे-
माती खाणे हा विकार सहा ते सात महिन्यांनंतरच्या मुलांमध्ये दिसते. वयाच्या दोन वर्षापुढेही माती खाणे टिकल्यास तपासणी करून घ्यावी.
आहारात लोहक्षार व चुनायुक्त पदार्थ असावेत. (पाहा पोषणावरचे प्रकरण) , कॅल्शियम, मुलाला लोहक्षाराच्या गोळया किंवा औषध द्यावे.
माती खाणा-या मुलांना जंतविकार होतो. त्यामुळे त्याला जंताचे औषध द्यावे. रंग़ीत द्रव्ये (उदा. भिंतीचा रंग), इत्यादी पोटात गेल्याने होणारे आजार होऊ शकतात. यासाठी डॉक्टरकडे पाठवावे.
माती खाण्यावर एक उपाय याप्रमाणे : चांगली सोनकाव 15 ग्रॅम + दीड चमचा तूप हे मिश्रण लोखंडी तव्यावर परतून घ्यावे. परतल्यावर हे मिश्रण ठिसूळ बनते. ह्या मिश्रणाच्या मुगाएवढया गोळया तयार करून घ्या. या गोळया मुलांना सकाळी सायंकाळी एकेक अशा तीन आठवडे रोज द्याव्यात. याबरोबर चिमूटभर त्रिफळा चूर्णही द्यावे. या उपायांनी मुलांचे माती खाणे थांबते.
काही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे, मुठी आवळणे, इत्यादी लक्षणे दिसतात. या झटक्यांना घाबरून जाऊ नका. मुलाला ताबडतोब कोमट पाण्याने ताप उतरवल्यास झटके थांबतात. याबरोबर पॅमालची गोळी किंवा औषधही द्यावे. मात्र तापाचे कारण काय आहे, हे निश्चित करून उपचार करणे आवश्यक आहे.
ताप (लहान मुलांसाठी) (तक्ता (Table) पहा)
न्यूमोनिया हा खालच्या म्हणजे अंतर्गत श्वसनसंस्थेचा – वायुकोशाचा दाह आहे. हा दाह जिवाणू, विषाणू, यामुळे होतो. याशिवाय विषारी हवा (उदा. रॉकेलच्या वाफा) उलटीतून आलेले द्रवपदार्थ श्वसनसंस्थेत घुसणे, इत्यादी कारणांपैकी कशानेही न्यूमोनिया होऊ शकतो.
बाळाचा जन्म होताना काही बाळांच्या बाबतीत गर्भजल किंवा रक्त बाळाच्या श्वसनसंस्थेत ओढले जाऊ शकते. तिथे नंतर जंतुदोष होतो.
एकूण न्यूमोनियाचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष होय. जंतुदोषामुळे वायुकोशाचा दाह होऊन त्यास सूज येते. यामुळे तिथले कामकाज बंद पडते. न्यूमोनिया बहुधा एका बाजूच्या फुप्फुसाच्या काही भागातच होतो. (पण तो दोन्ही बाजूंनाही होऊ शकतो) दाह व सूज यांमुळे या भागात वेदना असते. पण लहान मुले ही वेदना सांगू शकत नाहीत. श्वसनसंस्थेचा काही भाग तात्पुरता निकामी झाल्यामुळे इतर भागावर श्वसनाची जास्त जबाबदारी येते. त्यामुळे दम लागतो.
या आजाराने खूप बाळे दगावतात. बालन्यूमोनिया हा फुप्फुसाच्या एका भागात जंतुदोष झाल्याने होणारा आजार आहे. यात खोकला, ताप, दम लागणे ही मुख्य लक्षणे असतात. लोकभाषेत याला डबा, पोटात येणे अशीही नावे आहेत. बालन्यूमोनियाचे मृत्यू जंतुविरोधी औषध दिल्याने टळतात.
हा आजार सहसा पाच वर्षाखालील मुलांमध्ये होतो पण त्यातही विशेष करून पहिल्या दोन वर्षात याचे प्रमाण जास्त असते. मूल कुपोषित असेल तर हा आजार होण्याचा धोका आणि मृत्यूची शक्यताही जास्त असते. गोवराच्या तापानंतर हा आजार होण्याची शक्यताही असते. अपु-या दिवसांच्या किंवा अशक्त मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार साथीचा नसतो. पण थंडी-पावसात या आजाराचे प्रमाण जास्त असते.
या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे खोकला, ताप व दम लागणे.
नुसता ताप, खोकला (पण दम नाही) असेल तर त्याला बालन्यूमोनिया न म्हणता ताप-खोकला म्हणतात. असे साधे आजार शक्यतो बाह्य श्वसनसंस्थेत (नाक, घसा,) किंवा श्वासनलिकेत जंतुदोष झाल्यामुळे होतात.
ताप, खोकला, दम लागणे या तीन लक्षण-चिन्हांवरून बालन्यूमोनियाचे निदान होऊ शकते. बालन्यूमोनिया सौम्य आहे की गंभीर हे आपण ओळखायला शिकू शकतो. सौम्य आजार असेल तर गावात तुम्ही उपचार करू शकाल. तीव्र आजार असेल तर रुग्णालयात पाठवायला पाहिजे. योग्य उपचाराने मूल वाचू शकते.
6 महिने ते 1 वर्षापेक्षा मोठया मुलांमध्ये मिनिटाला 40 पेक्षा अधिक श्वसन गती असेल तर दोष समजावा. हे तुम्हाला घडयाळाच्या सेकंद काटयाबरोबर छातीची हालचाल मोजून कळू शकते. यासाठी पूर्ण मिनिटभर श्वसन मोजा. श्वसनाची गती बरीच अनियमित असल्याने पूर्ण मिनिट मोजावेच लागते.
या बरोबरच नाकपुडया फुललेल्या दिसतात, त्वचा, जीभ, ओठ यांवर थोडी निळसर झाक असते. अशा बाळाच्या रक्तात प्राणवायू कमी, कार्बनवायू जास्त म्हणून असे होते.
ताप, खोकला, दम लागणे या झाल्या न्यूमोनियाबद्दल प्राथमिक गोष्टी. याव्यतिरिक्त खालीलपैकी एखादीही खूण असेल तर आजार जास्त आहे हे निश्चित.
पेनिसिलीन गटातले औषध किंवा ऍमॉक्सी ताबडतोब सुरू करावे व रुग्णालयात पाठवून द्यावे. उपचार लवकर सुरू झाल्यास हमखास गुण येतो. पण उशीर झाला असल्यास उपचार सुरू करून डॉक्टरकडे पाठवणे चांगले. यात बाळ दगावू शकते म्हणून सर्व प्रयत्न वेळीच करायला पाहिजे.
खोकला मुलांसाठी (तक्ता (Table) पहा)
ताप आणि खोकला-दोन महिन्यापेक्षा मोठे बाळ (तक्ता (Table) पहा)