डोळयाच्या आरोग्यासाठी ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये या जीवनसत्त्वाच्या अभावाचा परिणाम तीव्र असतो. हिरव्या पालेभाज्या, पिवळी व लाल फळे (आंबे, पपई, गाजर), शेवगा, मांसाहारातील यकृत, इत्यादींमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ भरपूर प्रमाणावर असते. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावाने आधी रातांधळेपणा येतो. यामुळे रात्री जेवताना हात ताटात चाचपडत राहतो. यापुढे श्वेतपटलावर पांढरे ठिपके (बिटॉट स्पॉट), बुबुळ व नेत्रअस्तराचा कोरडेपणा, बुबुळाचा धुरकटपणा, बुबुळावर जखमा व मग फूल पडणे, नेत्रपटलाची हानी होणे, इत्यादी बदल होतात. रातांधळेपणाच्या अवस्थेतच ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस दिला पाहिजे (दोन लाख युनिट).आरोग्य केंद्रातर्फे मुलांना असा प्रतिबंधक डोस दर सहा महिन्यांनी दिला जातो. यामुळे हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे. आपली रोगप्रतिकारशक्तीही ‘अ’ जीवनसत्वामुळे टिकून राहते.
हा त्रास बहुधा लहान मुलांना होतो. या उवा सहसा जांघेतल्या केसांवर राहणा-या जातीच्या असतात. याचा संसर्ग मुलांना एकमेकांत होतो. नीट पाहिल्याशिवाय या उवा दिसून येत नाहीत. मुख्य लक्षण म्हणजे पापण्यांना खाज सुटून मुले डोळे चोळत राहतात. उपचार म्हणजे उवा चिमटयाने किंवा नखाने काळजीपूर्वक काढून टाकणे.
डोळयांच्या नाकाकडच्या कोप-यांत दोन्ही पापण्यांच्या टोकांशी एकेक छिद्र असते. त्यातून हे अश्रू एका नलिकेमार्फत नाकात उतरतात. यामुळेच रडताना डोळयांबरोबरच नाकातूनही जास्त पाणी येते.
काही आजारांत (उदा. खुप-या, डोळे येणे) जंतुदोषामुळे हे छिद्र व नलिका बंद होते. यामुळे पाणी नाकात उतरण्याचा मार्ग बंद होऊन डोळयांत सारखे पाणी साठून राहते. यामुळे डोळे जास्त ओले दिसतात.
या विकारासाठी तज्ज्ञांकडे पाठवावे. अश्रुनलिका उघडण्यासाठी या छिद्रातून एका बारीक पिचकारीतून स्वच्छ सलाईन दाबाने सोडतात. यामुळे अश्रूंचा रस्ता पूर्वीप्रमाणे मोकळा होतो. तात्कालिक जंतुदोषासाठी कोझाल व दाह कमी करण्यासाठी ऍस्पिरिन द्यावे.
अश्रुपिशवीच्या ठिकाणी एक टणक गाठ निर्माण होऊ शकते व ती फुटून त्यातून पस बाहेर येऊ शकतो.