कोणतेही रोगनिदान करताना रुग्णाकडून त्याच्या त्रासाबद्दल आणि इतर संबंधित माहिती घ्यावी लागते. त्यानंतर त्याची शारीरिक तपासणी करावी लागते मग या दोन्हीवरून रोगनिदान होते. मात्र काही वेळा एवढयावरूनच रोगनिदान होत नाही. वरील तपासणीशिवाय आणखी तपासण्या कराव्या लागतात. रक्त, लघवी, थुंकी, खाकरा, विष्ठा, इत्यादींची तपासणी, छातीचा किंवा इतर भागाचा क्ष-किरण फोटो (एक्स-रे), इत्यादींबद्दल आपण ऐकलेले असेल. या सर्व खास तपासण्या आहेत. या तपासण्यांना उपकरणे लागतात. या खास तपासण्यांची यादी खूप मोठी आहे. हल्ली बहुतेक रुग्णांना ‘खास तपासणी’ करायला लागते. निवडक तपासण्यांची आपण फक्त तोंडओळख करून घेऊ या. यांपैकी काही साध्या तपासण्या आपणही करू शकतो. घरी तपासणी करता येईल अशी अनेक किट्स आता मिळू शकतात.
रक्ततपासणी हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकला असेल. हल्ली रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात नाहीत. (मात्र प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत रक्ततपासणीची गरज नसते.)
रक्ततपासणी या गोष्टींसाठी केली जाते