आरोग्य कायदा
‘मारझोड’ कशी ओळखावी?
बाई मारहाण लपवत असली तरी ती ओळखून काढणे हे आवश्यक आहे. आरोग्य कार्यकर्ते किंवा शेजारी-पाजारी हे काम करू शकतात.
- एखादी बाई अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, इत्यादी ‘दुखी’ घेऊन नेहमीनेहमी दवाखान्यात येत असेल (अशावेळी कारण म्हणून त्या बहुतेक असे सांगतात – काम करताना पडले, खूप काम करावे लागते, ताप, इ.)
- जखम झाल्यावर 1,2,3 दिवसांनी उपचारासाठी येणारी बाई ! कदाचित मारझोडीमुळे ही जखम झाली असेल. त्यादिवशी तिला येऊ दिले नसेल किंवा संध्याकाळ-रात्र झाल्यामुळे ती बाहेरच पडली नसेल. ‘जुनी जखम’ ही महत्त्वाची खूणगाठ लक्षात ठेवा. उपचारासाठी एवढा उशीर का केला असे विचारले तर ती बहुधा काहीतरी उत्तर देईल – (वेळ मिळाला नाही, पाळी आलेली होती, मुलांच्या शाळा, शेतात तातडीचे काम होते वगैरे वगैरे)
- मुकामार/जखम, ती पण अशा ठिकाणी की पडल्यामुळे तिथे लागू शकत नाही. पडल्यामुळे होणा-या जखमा गुडघे, छाती, पोट, चेह-याचा पुढचा भाग, हाताचे तळवे, कोपर कुल्ले, इ. ठिकाणी होऊ शकतील. बाई सांगते ते कारण व मुकामार/ जखम याची संगती लागत नसेल तर शंका घ्यावी. बचावासाठी मनुष्य हातांचा ढालीसारखा वापर करतो, त्या जखमा सहज कळतात. जखमांच्या जागा व स्वरूप यावरून कारण समजू शकते.
- तोंडाने कारण सांगत असताना डोळे/चेहरा वेगळीच कहाणी सांगतात, ती ओळखणे आवश्यक आहे. यासाठी अर्थातच आपण सहृदय व जागृत असले पाहिजे.
- मारहाणीच्या जुन्या खाणाखुणांवरून शंका घेता येईल.
आपली भूमिका
कोठल्याही चांगल्या समाजात हिंसा असायला नको. निदान निरपराध व्यक्तींना हिंसा-मारहाणीला तोंड द्यायला नको. त्यातही ज्याच्यावर संरक्षणाची जबाबदारी त्यांनीच मारहाण करणे हे आणखीनच वाईट. या दृष्टीने शेजारी-पाजारी व समाजाचे घटक, राष्ट्राचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे. ‘मी काय करणार’ , ‘त्याची बायको, तो तिला मारणारच’ ‘नव-याने मारले पावसाने झोडले’, इत्यादी मनोभूमिका बदलायला हवी. घरातल्या मारहाणी थांबवण्यासाठी आपण शक्यतो प्रत्येक स्त्रीला मदत करायला हवी.