स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत देशाची अनेक बाबतीत प्रगती झाली. मात्र आरोग्याच्या बाबतीत आपला देश अद्याप बराच मागास आहे. काही निवडक प्रांत आणि शहरी भाग सोडता आरोग्याची भारतातली परिस्थिती मागास आहे. जागतिक आरोग्य संघटना सर्व देशांचे आरोग्यमान पाहून आकडेवारी आणि तुलना प्रसिध्द करीत असते. दक्षिण आशियाई देशांसाठी दिल्ली येथे या संस्थेचे विभागीय कार्यालय आहे. या संघटनेमार्फत त्यांच्या वेबसाईटवर ही सर्व माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे. खालील माहिती या वेबसाईटवरून घेतलेली असून त्यात काही निवडक मापदंडानुसार भारताची आणि इतर देशांची तुलना केलेली आहे.
या सर्व आजार आणि मृत्यूदरांच्या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्यसेवांची आकडेवारी आता आपण पाहू या.
1. भारताच्या सकल घरेलू उत्पन्नापैकी सुमारे 5% खर्च आपण आरोग्यसेवांवर करीत असतो. या बाबतीत सर्व जगात अमेरिका आघाडीवर आहे. (15%) तरीपण तेथील आरोग्यसेवा फार चांगल्या नाहीत. दक्षिण पूर्व आशियात तिमोर हा छोटासा देश खर्चामध्ये अग्रेसर आहे. (10%)
2. भारतात दर लाख लोकसंख्येस सरासरी 3 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. 51% स्त्रियांना प्रसूती सेवा मिळतात तर 48% प्रसूतींच्या वेळी कुशल सहाय्यक हजर असते. भारतात गरोदरपणात धनुर्वात लस मिळणा-या स्त्रियांचे प्रमाण फक्त 71% आहे.
3. लसीकरणाचे प्रमाण भारतात कमीच असून बी.सीजी (73%) तिहेरी लस – 3(64%), पोलिओ-3 (70%), गोवर (56%) अशी आपली आकडेवारी आहे. अर्थातच हे प्रमाण कमीच आहे.
4. भारतात दर हजार लोकसंख्येस केवळ 1 रुग्णालय-खाट उपलब्ध आहे. त्यातही शहरी आणि ग्रामीण अशी तफावत आहे. कोरियामध्ये हेच प्रमाण 13 रुग्णालय खाटा इतके आहे. मोनॅको या छोटयाशा देशात हे प्रमाण 196 खाटा इतके आहे.
5. आधुनिक वैद्यक प्रणाली (ऍलोपथी) प्रशिक्षित डॉक्टर्सचे प्रमाण भारतात हजार लोकसंख्येस 0.7 इतके जेमतेम आहे. हेच प्रमाण क्यूबामध्ये 59 तर दक्षिण कोरियामध्ये 32 इतके आहे.
6. मात्र भारतात आयुर्वेद व होमिओपथी शाखेचेही डॉक्टर असून त्यांचे एकत्रित प्रमाणही हजारी 0.7 एवढेच आहे. म्हणजे ऍलोपथी व आयुर्वेद हे दोन्ही मिळून भारतात डॉक्टरांचे प्रमाण हजारी 1.5 डॉक्टर इतकेच आहे. भारतात दर हजारी लोकसंख्येस परिचारिकांची संख्याही फक्त 0.8 म्हणजे जेमतेम 1 आहे. याउलट दक्षिण कोरियात हे प्रमाण 4 इतके पडते. याशिवाय इतर आरोग्यसेवकांचे हजारी लोकसंख्येस प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
प्रसूतीसेविका (0.5)
दंतवैद्य (0.06)
फार्मासिस्ट (0.6)
स्वच्छता सेवक (0.4)
आशा (1)
लॅब तंत्रज्ञ (0.02)
इतर आरोग्यसेवक (0.8).
7. भारतातील लोक आरोग्यसेवेवरचा खर्च बहुतेक करून (75%) स्वत:च्या खिशातून करतात तर उरलेला खर्च शासकीय असतो. खाजगी सेवांवरील एकूण खर्चापैकी 3% खर्च हा वैद्यकीय विमा योजनेमधून तर 97% खर्च ऐनवेळी येईल तसा करावा लागतो. यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत.
8. शासकीय सेवांमध्ये मुख्य खर्च (85%) राज्य सरकारे करतात तर केंद्र सरकार फक्त 15% खर्च करते. मात्र राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना सुरु झाल्यावर हळूहळू केंद्र सरकारचा वाटा वाढत आहे. तरीही केंद्र सरकार त्याच्या एकूण अंदाजपत्रकाच्या फक्त 2% रक्कम आरोग्यावर खर्च करते.
9. रुग्णालयात दाखल करावे लागल्यास 40% कुटुंबांना उधार उसनवार करावी लागते तेव्हा चीजवस्तू विकून बिल भरावे लागते असे ही आकडेवारी सांगते.
या संघटनेच्या आकडेवारीशिवाय इतर काही माध्यमांवरून भारताची आरोग्यविषयक आकडेवारी कळते. यातील काही आकडेवारी वरील आकडेवारीशी जुळत नाही. यातील उपलब्ध आकडेवारीतील निवडक मुद्दे खाली दिले आहेत.
इतर देशांच्या मानाने भारत आरोग्यदृष्टया मागास आहे आणि आपल्या आरोग्यसेवाही अपु-या आहेत. कुपोषण, मृत्यूप्रमाण, आजारांचे प्रमाण, स्वच्छता सोयी, सुरक्षित पाणीपुरवठा इ. अनेक मूलभूत मापदंडांवर आपले आरोग्य कमकुवत आहे. तसेच एकूण आरोग्यसेवांची व्याप्ती, डॉक्टर व परिचारिकांचे लोकसंख्येस प्रमाण, रुग्णालय – खाटांचे प्रमाण, प्रसूतीसेवा या सर्व बाबतीत आपण मागे आहोत. प्राथमिक आरोग्य सेवांचा प्रसार करून आपल्याला ही परिस्थिती सुधारायची आहे.