तामीळनाडूची परिस्थिती मात्र आता आता बदलली आहे. इथे गरिबी आहे तशीच असताना, जन्मदर कमी कसे झाले? हा एक चर्चेचा विषय आहे. तामीळनाडू सरकारने दहावीस वर्षे पध्दतशीर लोकशिक्षण करून कुटुंब छोटे ठेवण्याबद्दल, लग्न योग्य वेळी करण्याबद्दल, मुलीकडे लक्ष देण्याबद्दल जागृती केली. मुलांसाठी राज्यव्यापी पोषक आहार पुरवला. केवळ गर्भनिरोधक साधनांमुळे हे झाले नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून तामीळनाडूचा जन्मदरही आता हजारी पंधराच्या खाली आला आहे, तो आणखीही कमी होईल.
आपल्या देशामध्ये पाच वर्षाखालच्या मुलांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे 12 टक्के आहे. 10 वर्षाखालच्या मुलांचे प्रमाण सुमारे 20 टक्के तर 18 वर्षाखालील मुलांचे सुमारे 35-40 टक्के आहे. विकसित देशांच्या तुलनेने भारतात मुलांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण जास्त आहे. तसेच भारतात अर्भकमृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण भरपूर आहे. जन्मलेल्या मुलांपैकी सुमारे 5-10 टक्के एक वर्षाच्या आत मरण पावतात. (विकसित देशात ते प्रमाण तीन टक्क्यांपेक्षाही कमी असते.) याची कारणे अनेक आहेत. जन्मताना वजन कमी असणे, सांसर्गिक आजार, अपघात, कुपोषण, इत्यादी अनेक कारणे आहेत.