Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
रोगनिदान

Diagnosis वैद्यकीय उपचाराआधी रोगनिदान करावे लागते. रोगनिदान म्हणजे कोणता आजार आहे हे ठरवणे आणि रोगाची तीव्रता किती आहे याचा अंदाज घेणे. आयुर्वेदामध्येही स्वतंत्र रोगनिदान पध्दती आहे. होमिओपथीमध्ये रुग्णाचे एकूण लक्षणचित्र लक्षात घेऊन औषधनिदान केले जाते. (होमिओपथीत वेगळे रोगनिदान नाही). आधुनिक (म्हणजे इंग्रजी) वैद्यकशास्त्रात गेल्या शंभर-दीडशे वर्षात रोगनिदानाचे शास्त्र तयार झाले. रोगनिदान जास्त अचूक होत गेले तशी औषधोपचारांची अचूकताही वाढत गेली. रोगनिदान ही वैद्यकशास्त्रातली अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. पण देशातल्या काही अर्धशिक्षित वैद्यकीय व्यवसायात तरी रोगनिदान ही फार दुर्लक्षित बाब आहे. आरोग्यकार्यकर्त्याचा तर याच्याशी काहीही संबंध नसतो असाच गैरसमज आहे. आरोग्यसेवा यशस्वी होण्यासाठी किमान काही प्राथमिक रोगनिदान करणे ही आवश्यक गोष्ट आहे.

अनेक दुखण्यांवर आपण प्राथमिक वैद्यकीय मदत करणे अपेक्षित आहे. ताप, खोकला, जुलाब,उलटी, डोकेदुखी, पोटदुखी अशी लक्षणे तर नेहमीच आढळतात. याशिवाय छाती दुखणे, सूज, चक्कर अशीही लक्षणे कधीकधी आढळतात. आता नुसता ताप, खोकला, जुलाब, इत्यादी शब्दांना रोगनिदानाशिवाय फारसा अर्थ नाही. ही लक्षणे ज्यामुळे आली आहेत तो रोग ओळखणे शक्य झाल्याशिवाय प्राथमिक आरोग्य सेवा शक्य नाही.

या प्रकरणात रोग-निदानपध्दतीसंबंधी काही सर्वसाधारण माहिती आहे. बरीच रोगलक्षणे निरनिराळया शारीरिक संस्थांशी निगडित असतात. (उदा. जुलाब, उलटी म्हणजे पचनसंस्थेशी संबंधित). अशा शरीरसंस्थांशी संबंधित रोगलक्षणांवरून रोगनिदान कसे करायचे हे त्या त्या प्रकरणात दिले आहे. या माहितीबरोबर प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास प्राथमिक रोगनिदान आपण नक्की चांगले करू शकू.

रोगनिदानाच्या पाय-या

कोठलेही उपचार करण्याआधी त्या रुग्णाला काय ‘आजार’ झाला आहे हे ठरवावे लागते. आजार निश्चित करण्याच्या (रोगनिदान) निरनिराळया शास्त्रांत निरनिराळया पध्दती आहेत. आयुर्वेदामध्ये रोगनिदानात कफ, वात, पित्त, नाडी, इत्यादी महत्त्वाचे असते. होमिओपथीमध्ये लक्षणे महत्त्वाची असतात. आधुनिक वैद्यकात रोगाची लक्षणे, पूर्वेतिहास आणि निरनिराळी चिन्हे लक्षात घेऊन निदान केले जाते. यातून निदान न झाल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास खास तपासणी (उदा.रक्त,लघवी,क्ष-किरण तपासणी वगैरे) केली जाते. आधुनिक रोगनिदानामध्ये तीन महत्त्वाच्या पाय-या आहेत.

  • रोगलक्षणांची माहिती, पूर्वेतिहास व आनुषंगिक माहिती.
  • शारीरिक तपासणी : निरनिराळी चिन्हे (नाडी, श्वास, तापमान, इ.)
  • खास तपासणी (उदा. रक्त,लघवी, थुंकी तपासणे, क्ष-किरण तपासणी, इ.) बहुतेक आजार रोगलक्षणे व रोगचिन्हे यांवरून ओळखता येतात. खास तपासणीच्या तंत्रांची काही माहिती स्वतंत्र प्रकरणात दिली आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास छातीच्या क्षयरोगात खोकला, ताप ही लक्षणे असतात. वैद्यकीय तपासणीत फुप्फुसात सूज आढळणे, बेडक्यात रक्त-पू पडणे, वजन घट ही चिन्हे म्हणता येतील. शेवटी बेडका तपासणीत क्षयरोग जंतू सापडणे व क्ष-किरण चित्रात क्षयरोगाचा डाग आढळणे ही झाली विशेष तपासणी.

संस्था, आजार, लक्षणे आणि चिन्हे

रोगलक्षणांच्या चिन्हांची संख्या खूप आहे. काही लक्षणे अगदी एकेका अवयवांशी निगडित असतात. (उदा. दातदुखी, कान फुटणे, इ.), तर काही लक्षणांचा संबंध अनेक संस्थांशी येतो (उदा. ताप, उलटी, इ.). म्हणूनच चिन्ह-लक्षणांवरून रोगनिदान करणे आवश्यक ठरते. सोबत दिलेल्या तक्त्यावरून कोणती रोगलक्षणे कोणत्या संस्थांशी संबंधित असतात हे लक्षात येईल. या प्रकरणात फक्त ताप, डोकेदुखी, उलटी, इत्यादी जास्त व्यापक स्वरूपाच्या लक्षणांविषयी पाहू या. तक्त्यात दिल्याप्रमाणे निरनिराळी लक्षणे विशिष्ट संस्थांच्या प्रकरणात दिली आहेत.

या तक्त्यावरून असेही लक्षात येईल, की ताप जवळजवळ कोणत्याही संस्थेच्या आजारामुळे येऊ शकतो. (पण हेही लक्षात घ्या की ताप हा सहसा जंतुदोषामुळेच येतो.)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.