Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
सांसर्गिक आजार

Swine Flu Care नुकत्याच आलेल्या स्वाईनफ्लूच्या साथीबद्दल आपल्याला माहिती आहेच. पूर्वीसारख्या मोठया साथी आता येत नसल्या तरीही साथींचा धोका कायमच असतो. स्वाईन फ्लू च्या साथीत सुरुवातीस मेक्सिकोत एका मुलाला झालेली लागण जगभर पसरली. अशा जागतिक साथीची शक्यता असतेच. फ्लू हा या दृष्टीने महत्त्वाचा आजार आहे. तो वेगाने पसरत असला तरी सुदैवाने एवढा घातक नाही. तरीही त्यामुळे उडालेली घबराट आपण अनुभवली आहे. संसर्गाचे शास्त्र म्हणूनच आजही महत्त्वाचे आहे.

सांसर्गिक आजार म्हणजे ‘जीवजंतूंमुळे होणारे आणि एकमेकांत संसर्गाने पसरणारे आजार’ अशी व्याख्या करता येईल. जीवजंतूंमुळे तसे अनेक आजार होतात, अगदी सापविंचूंनाही जीवजंतूच म्हणतात. पण सांसर्गिक आजारांमध्ये सर्वसाधारणपणे ‘सूक्ष्म’ जीवजंतूच (अपवाद जंतांचा ) धरले जातात. यांत मुख्यतः जीवाणू, विषाणू, बुरशी, सूक्ष्म एकपेशीय प्राणी व वनस्पती, सूक्ष्म कीटक आणि निरनिराळया प्रकारचे ‘जंत’ येतात. जंत खरे तर आकाराने मोठे असतात, पण ते शरीरात असतात, एकमेकांत संसर्गाने पसरतात, म्हणून सांसर्गिक वर्गात धरले आहेत. ही यादी आपण नंतर वर्गीकरणात पाहूच.

जीवजंतूंमुळे होणारे काही अपवादात्मक आजार एकमेकांत पसरत नाहीत. उदा. धनुर्वात हा जीवाणूंमुळे होणारा आजार त्या अर्थाने ‘सांसर्गिक’ नाही. तसेच लहान आतडयाचा किंवा मणक्याचा क्षयरोग हे एकमेकांत पसरत नाहीत. पण हे जंतूही कोठून तरी आलेले असतात, म्हणून त्यांना सांसर्गिक आजार म्हणणे बरोबर आहे.

vaccination
antiviral medicines
संसर्ग : राहणीमानाचे आजार

आपल्यासारख्या देशांमध्ये सांसर्गिक आजारांचे प्रमाण खूप आहे. आपल्याकडील निम्म्यापेक्षा अधिक आजार सांसर्गिक असतात. सर्वात जास्त मृत्यूही सांसर्गिक रोगांमुळेच होतात.निकृष्ट राहणीमान हे सांसर्गिक आजारांचे महत्त्वाचे कारण आहे. ‘सांसर्गिक आजार’ हे मागास आर्थिक सामाजिक व्यवस्थेचे एक लक्षणच आहे.

उपाय आहेत

Cold सांसर्गिक आजारांचा आणखी एक विशेष म्हणजे या ब-याच आजारांवर औषधे आहेत. इतर आजारांच्या मानाने (उदा. हृदयविकार, रक्तदाब, कर्करोग इ.) या आजारांवरचे (जीवशास्त्रीय पातळीवरचे) उपचार सोपे आणि स्वस्त असतात. काही विषाणूआजार सोडता बहुतेक सांसर्गिक आजारांवर परिणामकारक़ औषधे निघालेली आहेत.

अनेक महत्त्वाच्या संसर्गावर प्रतिबंधक लसींचे उपायही आहेत. या लसींमुळे अनेक संसर्गांना आळाही बसलेला आहे. पण साधारणपणे सांसर्गिक आजार हटवण्यासाठी सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक-राजकीय पातळयांवरच उपाय करायला हवेत. क्षयरोगाच्या बाबतीत ही वस्तुस्थिती याआधीच स्पष्ट केली आहे. औषधांच्या योग्य वापराने रुग्ण आपल्यापुरते बरे होऊ शकतात. पण निकृष्ट राहणीमानामुळे समाजातल्या एकूण रुग्णांच्या संख्येत फारशी घट होत नाही. हीच गोष्ट मलेरिया, जंत, हत्तीरोग, हगवण, इत्यादी सांसर्गिक रोगांच्या बाबतीत खरी आहे.

सांसर्गिक आजारांचे एकूण शास्त्र पाश्चात्त्य वैद्यक विज्ञानातच विकसित झाले. यात पाश्चात्त्य वैद्यकाची जेवढी प्रगती झाली तेवढी इतर उपचार पध्दतींची झाली नाही. संसर्गावर ब-याच अंशी अचूक अशा उपायांमुळे भारतासारख्या देशामध्ये या आधुनिक उपचारपध्दतीचा प्रसार व्हायला मदत झाली. या प्रकरणात आपण सांसर्गिक रोगांबद्दल सर्वसाधारण माहिती घेणार आहोत.

सांसर्गिक आजारांचे वर्गीकरण

soap hand wash सांसर्गिक किंवा जीवजंतुजन्य आजारांचे (कारणाप्रमाणे) वर्गीकरण सोबतच्या तक्त्यात दिले आहे. माहितीसाठी या जीवजंतूंची वैशिष्टये, होणारे आजार, विशिष्ट औषधे यांचीही नोंद या वर्गीकरणात केलेली आहे. या तक्त्यामुळे अनेक गोष्टी सहज लक्षात येतील. रोगास कारण ठरणा-या जीवजंतूंचे निदान झाले तरच औषध निवडता येईल आणि गुण येईल. सरधोपटपणे कोठलीही औषधे इकडेतिकड़े वापरता येत नाहीत.

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की विषाणूंवर अजून परिणामकारक़ मारक औषधे निघालेली नाहीत (दोन-तीन आजारांचा अपवाद सोडता). त्यामुळे विषाणू आजारांवर उगाचच प्रतिजैविक औषधांचा मारा केल्याने उपयोग नसतो. यामुळे नुकसान होण्याचीच जास्त शक्यता असते. (हे वर्गीकरण परत परत वाचून ठेवा आणि मनन करा).

रोगप्रसार

सांसर्गिक रोगांचा प्रसार होण्याच्या पध्दतींचा शोध व उपाय हा आधुनिक वैद्यकशास्त्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. हा भाग जरा तपशीलवार समजावून घेऊ या.

रोगजंतू आश्रयस्थान

  • रोगजंतू नेहमी ज्या ठिकाणी जगतात व वाढतात ती जागा, समूह, वस्तू, हे रोगजंतूंचे आश्रयस्थान/साठा/माहेरघर आहे असे म्हणता येईल. उदा. क्षयरोगाच्या सर्व ज्ञात-अज्ञात रुग्णांमध्ये क्षयरोगाचे जंतू असतात म्हणून या सर्व रोगसमूहाला आपण क्षयरोगजंतूंचे आश्रयस्थान (साठा) म्हणू शकतो.
रोगजंतूंचे उगमस्थान
  • लागण होताना ज्या एका बिंदूपासून जंतू येतात त्याला उगम म्हणता येईल. उदा. क्षयरोगाची लागण बापाकडून मुलाला झाली असेल तर त्या मुलाच्या दृष्टीने बाप हा रोगजंतूंचे उगमस्थान आहे.
माध्यम

उगमापासून नवीन शरीरापर्यंत जंतू ज्या साधनाद्वारे येतात त्याला आपण रोगवहनाचे माध्यम म्हणू या. उदा. क्षयरोगाचे वाहन हवा किंवा दूषित वस्तू आणि पटकीचे माध्यम पाणी किंवा अन्न, इत्यादी.

रोगप्रतिबंध

उगमस्थानापासून किंवा आश्रयस्थानापासून सांसर्गिक रोगाचा प्रसार माध्यमाद्वारे नवीन व्यक्तीच्या शरीरापर्यंत होतो. रोगाचा प्रसार थांबवायचा असेल तर ही साखळी ठिकठिकाणी तोडली पाहिजे. रोगप्रसाराची ही साखळी तीन ठिकाणी खालीलप्रमाणे तोडता येईल.

(अ) रोगजंतू

रोगजंतू आश्रयस्थानातूनच नष्ट करता आला तर त्याला रोगाचे निर्मूलन किंवा उच्चाटन (बीमोड) असे म्हणता येईल. उदा. देवी रोगाचे जंतू पृथ्वीवर शिल्लकच नसल्याने देवी रोगाचे उच्चाटन झाले आहे. मात्र ब-याच रोगांच्या बाबतीत पूर्ण उच्चाटन हे अशक्य असते. अशा वेळी रोगजंतूंची एकूण संख्या मर्यादित ठेवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. याला रोगनियंत्रण असे म्हणता येईल. उदा. मलेरियाचे आपण ‘उच्चाटन’ करू शकत नसल्याने केवळ ‘नियंत्रण’ करीत आहोत.

जंतुनाशक उपाय

एखाद्या जंतू उगमाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करणे काही वेळा शक्य असते. त्या वस्तूतले रोगजंतू अंशत: किंवा पूर्णपणे मारून टाकण्याला रोगजंतुनाशन म्हणतात. उदा. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून आपण अंशतः रोगजंतुनाशन करतो. पण शस्त्रक्रियेच्या आधी उपकरणे, इत्यादी साधने पूर्णपणे जंतुरहित करावी लागतात. जंतुनाशनाच्या रासायनिक, भौतिक (उष्णता, अतिनील किरण, इ.) अशा अनेक पध्दती आहेत.

उगमस्थान जर कोणी व्यक्ती असेल किंवा सजीव प्राणी असेल तर त्याला आपण संसर्गित व्यक्ती किंवा प्राणी म्हणू या. अशा सजीव उगमस्थानातले जंतू मारण्यासाठी सदर व्यक्ती लवकरात लवकर शोधून (त्वरित निदान) त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक असते. संसर्गित प्राणी– उदा. पिसाळी रोगाचा उगम नष्ट करण्यासाठी आपण पिसाळलेला कुत्रा मारून नष्ट करतो. बर्ड-फ्लू साथ थांबवण्यासाठी कोंबडया मारून टाकतात.

(ब) संसर्ग -माध्यम

Contagion Medium आता उगमस्थानापासून किंवा आश्रयस्थानापासून नवीन शरीरापर्यंत रोगजंतू नेण्याचे माध्यम बंद करण्याचा आपण विचार करू या. ही माध्यमेही अनेक प्रकारची आहेत. दूषित हवा, दूषित पाणी, अन्न, माशा, हात, वस्तू यांच्या माध्यमाने काही आजार चावणा-या कीटकांमार्फत रोगप्रसार होत असतो. हिवतापाच्या बाबतीत डासांची मादी ही आश्रयस्थान असते. डास चावण्याच्या प्रक्रियेतून हा रोगप्रसार होत असल्याने ‘माणसाला डास चावणे’ या घटनेवर नियंत्रण ठेवल्यास प्रसार कमी होईल.

प्रत्येक सांसर्गिक आजाराच्या प्रसाराचे काही ठरावीक मार्ग वा माध्यमे असतात. त्या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी ही विशिष्ट साखळी तोडावी लागते. उदा. कावीळ, पटकी, विषमज्वर यांचा प्रसार दूषित अन्नपदार्थांमुळे होतो. यासाठी अन्न, पाणी यांची स्वच्छता, शुध्दता राखली गेल्यास या रोगांच्या प्रसाराची साखळी तुटते.

कीटकप्रसारित रोगांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण योजना आहे.

(क) व्यक्तिसंरक्षण

प्रसार थांबवण्याची तिसरी पायरी म्हणजे संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे. निरोगी व्यक्तींनी वैयक्तिक पातळीवर आधीच प्रतिबंधक काळजी घेऊन लसटोचणी, इत्यादी मार्गानी प्रतिकारशक्ती वाढवणे.

diarrhea
health-education-poster

एकूण रोगप्रसारास आळा बसावा म्हणून खालीलप्रमाणे उपायोजना हवी:

  • एकूण समाजाचा सरासरी आरोग्य दर्जा सुधारणे (पोषण, राहणीमान, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ह्यांत सुधारणा), व विशिष्ट प्रतिबंधक उपाय वापरून व्यक्तींव्यक्तींची प्रतिकारक्षमता वाढवणे (उदा. लसटोचणी व इतर वैयक्तिक पातळीवरचे उपाय) व सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता पाळून रोगप्रसाराच्या साखळया तोडणे.
  • विशिष्ट रोगांची लागण झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर शोधून (शीघ्रनिदान) त्यांच्यावर पूर्ण उपचार करणे हा एक उपाय असतो. या व्यक्ती इतरांपर्यंत रोग पोचवणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.