डोळयाच्या सर्व जखमांवर, विशेषत:बुबुळाच्या जखमांवर ताबडतोब नेत्रतज्ज्ञाकडून उपचार होणे आवश्यक आहे. वरून किरकोळ वाटणा-या जखमाही अंधत्वास कारणीभूत ठरू शकतात. बुबुळावर जखम किंवा व्रण असल्यास त्या डोळयाला प्रकाश अजिबात सहन होत नाही, हीच याची मुख्य खूण असते.
बुबुळावर जखम असल्यास नेत्रतज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. बुबुळावरच्या जखमा लवकर दिसत नाहीत. डोळयात फ्लुरोसिन औषधाचा थेंब टाकला तर असा कण लवकर दिसून येतो. बुबुळावर काही कण, कचरा असल्यास अगदी काळजीपूर्वक (बुबुळास धक्का न लावता) काढता येत असल्यास काढावा. हे न जमल्यास तज्ज्ञाकडे पाठवून द्यावे. बुबुळाची चांगल्या प्रकाशात काळजीपूर्वक तपासणी न केल्यास बुबुळावरचा कण, जखम लक्षात येत नाही. मात्र दोन-तीन दिवसांत त्या ठिकाणी व्रण व पांढरटपणा येऊन दृष्टी अधू होण्याची शक्यता असते.
बुबुळाच्या जखमेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. प्रथमोपचार म्हणून जंतुविरोधी थेंब टाकून डोळा निर्जंतुक कापडयाच्या घडीने बांधून बंद ठेवावा. यामुळे बुबुळावरची जखम भरून यायला मदत होते. आत नवीन घाण, कचरा, जंतू जायला अटकाव होतो. गॅमा किरण वापरून निर्जंतुक केलेली कपडयाची घडी (स्टरीपॅड) औषधांच्या दुकानात उपलब्ध असते. कागदीपिशव्या स्वच्छ सुती कपडयाच्या घडया पॅकबंद करून सूर्यचुलीमध्येही निर्जंतुक करता येतील. मात्र या प्राथमिक उपचारावर थांबू नये. तज्ज्ञाकडे ताबडतोब पाठवावे.
नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. प्रकाश आणि प्रतिमा, संवेदना या पेशींमधून नेत्रचेता मार्फत (डोळयाची नस) सरळ मेंदूकडे पोचतात. हे नेत्रपटल अतिरक्तदाब आणि मधूमेह या दोन आजारात खराब होते व त्यामुळे अंधुक दिसते. म्हणूनच या दोन्ही आजारात नियमितपणे नेत्रपटलांची तपासणी करावी लागते. यासाठी डॉक्टर फंडोस्कोप नावाचे बॅटरीसारखे एक छोटे यंत्र वापरतात.
नेत्रपटल आपल्या जागेवरून सुटून डोळयामध्ये सरकण्याचा एक आजार असतो. याला आपण नेत्रपटल सुटणे असे म्हणू या. या आजाराची विविध कारणे आहेत. मुख्य लक्षण म्हणजे डोळयाच्या काही भागात अंधारी येणे व दृष्टीचे क्षेत्र कमी होणे. यावर लेझर शस्त्रक्रियेचा चांगला पर्याय आता उपलब्ध आहे. नेत्रतज्ज्ञांमध्ये आता नेत्रपटल-तज्ज्ञांची वेगळी शाखा विकसित झाली आहे.
अपूर्ण वाढ झालेल्या नवजात बालकांमधील नेत्रपटलदोष अर्भकाच्या नेत्रपटलाची संपूर्ण वाढ होण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. आठ महिन्यांआधी जन्मास आलेल्या अर्भकाचे नेत्रपटल कमजोर असते. नेत्रपटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण झालेली असते. जन्मानंतर अपूर्ण वाढ झालेल्या रक्तवाहिन्यांची वाढ होताना ती दोषपूर्ण होते व दोषपूर्ण रक्तवाहिन्यांचे एक जाळे तयार होते. या सदोष रक्तवाहिन्या नेत्रपटलास नैसर्गिक रक्तपुरवठा करू शकत नाहीत व या रक्तवाहिन्यांच्या वाढीमुळे मागचा पडदा निसटू शकतो.
प्रथमत: जन्माच्या दोन ते तीन आठवडयानंतर व तेव्हापासून पुढे रक्तवाहिन्यांची संपूर्ण वाढ होईपर्यंत नेत्रतज्ज्ञांकडून नेत्रपटलाची संपूर्ण तपासणी करावी.