बालमृत्यूंचे एक महत्त्वाचे कारण कुपोषण किंवा बाळाची उपासमार असते. बाल-कुपोषणाने बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे लवकर आजार होतात. पण ते लवकर बरे होत नाहीत. आजारांमुळे कुपोषण वाढते. असे मूल दगावण्याची शक्यता असते. याचे मूळ कारण कुपोषण (उपासमार) व तात्कालिक कारण असते. एखादा आजार. ताप, जुलाब, खोकला यापैकी कोणताही आजार असू शकतो.
कुपोषण होण्याआधी ते टाळणे महत्त्वाचे आहे. ही काळजी बाळ पोटात असल्यापासूनच घ्यावी लागते. खालील मुद्दे लक्षात ठेवा आणि अमलात आणा.
1. मुलींचे लहान वयात लग्न नको. कमी वयात बाळंतपण तर नकोच नको. पहिले मूल आईच्या 20 वयानंतरच व्हावे.
2. गरोदरपणात आणि नेहमीच स्त्रियांना चांगली वागणूक, विश्रांती, खाणेपिणे व आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. उपासातापासाने व कष्टाने स्त्रिया खंगतात, यामुळे त्यांची बाळे कमकुवत जन्मतात व दुबळी राहतात.
3. जन्मल्यानंतर पहिल्या तासापासून बाळाला स्तनपान सुरु करावे. यानंतर सहा महिन्यापर्यंत केवळ स्तनपान दिवसातून 8-10 वेळा द्यावे.
4. स्वच्छता पाळा. परिसर, घर, अन्न, पाणी आणि हात हे स्वच्छ पाहिजेत. खाऊपिऊ घालताना अन्नही स्वच्छ व ताजे पाहिजे.
5. सहा महिन्यानंतर पूरक आहार चालू करा. त्यात गोड खिरी, तूप याचा वापर करा. तूप नसल्यास तेल वापरा. गुळाचा वापर करा. गुळाने जंत होत नाहीत. तो गैरसमज आहे.
6. बाटली-दूध टाळा, त्याने जुलाब व गॅस होतो.
7. गुरांमुळे आजार लागू शकतात. घरात शक्यतो गोठा नको.
8. बाळाचे वजन, उंची, दंडघेर या पध्दतींनी वाढ तपासली पाहिजे. नोंदी केल्या पाहिजेत. वजनतक्ता सपाट झाला किंवा उतरला तर लगेच डॉक्टरकडे न्यायला पाहिजे.
9. मुलगा असो वा मुलगी त्यांना खाणेपिणे सारखेच लागते. यात भेदभाव करणे माणुसकीच्या विरुध्द आहे.
10. मुलांच्या खाण्यात सर्व पोषक तत्त्वे पाहिजेत. (पहा – पुस्तक पहिले, चौरंगी आहार) समतोल आहाराने समतोल वाढ होते.
11. शक्य असल्यास मुलांना अंडी, मांसाहार, मासे खाऊ द्या. याबद्दल धार्मिक परंपरा फार बळकट आहेत. वाढत्या मुलांसाठी यात सूट मिळावी.
12. जीवनसत्त्व अ चा डोस 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी द्यावा. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते व रोगांचा आघात होत नाही.
13. सर्व लसीकरण वेळेवर पूर्ण करा. सहा घातक आजार टाळण्याचा तो सर्वात सोपा व चांगला मार्ग आहे. हे सहा घातक आजार म्हणजे – टीबी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि गोवर.
14. कोणत्याही मुलाची भूक कमी झाली तर लगेच लक्ष द्या. डॉक्टरकडे न्या.
15. लहान मुलांना फार कोरडे अन्न देऊ नका. त्यांना कोरडे अन्न चावण्यात फार श्रम पडतात. यामुळे मुले कमी खातात व आहार कमी पडतो.
16. कोंबडया सतत दाणे टिपतात. तसेच बालवाडीतली व पुढची मुले सतत खाऊ मागतात. खाऊ त्यांना मिळेल असा ठेवा. शेंगदाणे, गुळ, लाडू, चणे, वडया वगैरे पदार्थ डब्यात घालून सहज सापडेल असे ठेवावेत. खाणे खिशात भरून नेले तरी चांगले.
17. पण मूल लठ्ठ होणार नाही याची पण काळजी घ्या. लठ्ठपणा घातक असतो. या मुलांना पुढे वेगवेगळे आजार होऊ शकतात.
18. खेळ-व्यायामाने मुलांना भूक लागते व अन्न चांगले पचते. अशा मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते.
19. दर सहा महिन्यांनी जंताचे औषध द्या. जंतांनी प्रकृती खंगते. मुलांचे खाणे पोटात जंतच खाऊन टाकतात.
20. सोयाबीन, डाळी, शेंगदाणे हे पदार्थ विशेष पौष्टिक असतात. त्यात प्रथिने जास्त असतात. त्याचा वापर आहारात नियमित होऊ द्या.
21. मुलांच्या आजारात खाणेपिणे तोडू नका, चालूच ठेवा. मात्र पचायला पातळ व हलके अन्न द्या.
गरिबी हे कुपोषणाचे प्रमुख कारण आहे. पण तरीही त्या त्या मुलांच्या बाबतीत उपचारांचा फायदा होतोच. कोणत्याही प्रकारच्या कुपोषणाच्या उपचाराचा प्रमुख भाग म्हणजे अन्नाची कमतरता भरून काढणे आणि कुपोषणाचे कारण दूर करणे.
प्रथम कुपोषणाच्या बरोबरीने आलेल्या आजारासाठी उपचार करावे लागतात. बहुतेक वेळा जुलाब, गोवर, न्यूमोनिया, क्षयरोग, श्वासनलिकादाह (छातीत कफ) अशा आजारांमुळे कुपोषणाच्या सीमेवर असलेले मूल अचानक कुपोषणाच्या गर्तेत ढकलले जाते. त्यामुळे पोषण उपचारांबरोबरच या बरोबरच्या आजारांचे उपायही करावे लागतात.
कुपोषणाच्या बरोबरीने होत असलेले जुलाब हा उपचाराच्या दृष्टीने सर्वात जास्त त्रासदायक भाग असतो. जंत असतील तर जंताचे औषध/गोळी द्यावी.
कुपोषित मुलाला दर दोन तासांनी आहार देणे जरूरीचे असते. हा आहार पचायला सोपा असा जास्तीत जास्त पौष्टिक असावा. त्यासाठी वरण-भात किंवा खिचडी द्यावी. अंडी, दूध, केळी, शेंगदाणे, गहू, नाचणी हे चांगले पदार्थ आहेत. तांदूळ + डाळ + दाणे किंवा सोयाबीन यांची खीर आणि जमेल त्या प्रमाणात इतर प्राणिज पदार्थ द्यावेत. यांसारख्या गोष्टींचा उपयोग होतो.
तेलामध्ये ऊष्मांकाचे प्रमाण पिठूळ पदार्थापेक्षा जास्ती असते. म्हणून सोसवेल त्याप्रमाणे गोडेतेल किंवा खोबरेल तेल कुपोषित मुलाला रोज देत राहावे. रोज 2-3 चमचे तेल पाजावे किंवा अन्नात खाऊ घालावे, यामुळे वजन लवकर सुधारते.
अन्नाच्या बरोबरीने ‘अ’, ‘ब’, ‘क’, ही जीवनसत्त्वे व लोह हे घटक पूरक म्हणून औषधांच्या स्वरूपात बहुतेक वेळा द्यावे लागतात.
सर्वांगसूजेच्या प्रकारात अन्न मिळू लागल्यावर सूज ओसरू लागून आधी वजनात घट होते व नंतर वजन वाढू लागते.