वय आणि श्रमाच्या मानाने योग्य आहार मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, पण हा हक्क प्रत्यक्षात उतरत नाही. भारतासारख्या देशांत निदान निम्मा समाज दारिद्रयरेषेखाली राहतो. कुपोषण हे या समाजाचे अंग बनलेले आहे. उरलेल्या समाजातील काही टक्के लोकांना अतिपोषणामुळे येणारे आजार जडतात. कुपोषण म्हणजे पोषणाची कमतरता किंवा अतिरेक. आपल्या देशाच्या संदर्भात कुपोषण म्हणजे बहुशः अन्नाची कमतरता हाच अर्थ घेतला जातो.
कुपोषणाचे (कमतरता) दोन प्रकार आणखी सांगता येतील. एक म्हणजे विशिष्ट अन्नघटकांची उणीव (उदा. ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव) आणि दुसरा म्हणजे सर्वच प्रकारचे अन्न कमी पडणे. या दोन्ही प्रकारचे कुपोषण दारिद्रयरेषेखाली मोठया प्रमाणात दिसते, पण त्यातल्या त्यात आहार कमी पडणे हाच प्रकार मुख्य आणि महत्त्वाचा आहे. अन्न कमी पडल्यामुळे होणारे कुपोषण
देशातले एकूण अन्नधान्य उत्पादन आता तरी आपल्या सध्याच्या लोकसंख्येस पुरेल असे आहे. एखाद्या वर्षी उत्पादन कमी पडले तरी मागील वर्षाच्या साठयातून काम निभवता येते. सर्वसाधारणपणे धान्योत्पादन पुरेसे आहे, पण तेलबियांचे उत्पादन कमी पडते, तसेच दूधउत्पादन शहरांचा हिशेब करता पुरेल इतके आहे, पण दरडोई पुरवठा अजूनही पुरेसा नसल्याने बहुसंख्य समाजाला (विशेषतः खेडयात) दूध मिळणे अवघड आहे. पण समजा अन्नधान्य उत्पादन पुरेसे असले तरी सर्व लोकांना ते दोन्ही वेळ पुरेसे का मिळत नाही ? याचे कारण श्रमजीवी लोकांच्या हातात पुरेशी क्रयशक्ती नसणे. याची कारणे व्यापक सामाजिक-आर्थिक दुरवस्थेत आहेत.
जेथे घरात आजचा दिवस घालवण्यापुरतीही क्रयशक्ती नसते अशा घरात जेवढे तुटपुंजे आहे त्यात आधी पुरुष जेवतो, मग मुलगा, मग मायलेकी अशा क्रमाने खायला मिळते. खरे तर स्त्रिया काही कमी काम करत नाहीत. ग्रामीण कुटुंबात पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत स्त्रिया अविश्रांत काम करतात. शहरातील नोकरदार स्त्रीचीही अशीच स्थिती असते. एकूण श्रमाचा निम्मा वाटा तरी स्त्रियांचा असतो. पुरुष ‘कर्ता’ असतो ही पुरुषप्रधान समाजाने लादलेली समजूत आहे. अशा परिस्थितीत ब-याच वेळा घरची स्त्री शिळेपाके खाऊन किंवा उपाशी झोपते. स्त्रिया, वृध्द यांचे हाल असतात. कुपोषणाचे अनेक प्रकारचे आजार अगदी घरोघरी दिसतात. निम्म्या लोकसंख्येत कुपोषणाच्या काठाकाठाने चाललेले जीवन असते. एखादा आजार, आर्थिक संकट आले, की ही काठावरची शरीरे लगेच कुपोषणाच्या खाईत पडतात. पाच वर्षाखालील अर्धा टक्का मुले अतिकुपोषित (उघड) आणि सुमारे 40 टक्के कुपोषणाच्या सीमरेषेवर अशी आकडेवारी आहे. आदिवासी, दलित, मागासवर्गीय यांमध्ये तर हे प्रमाण जास्त आहे.
गरजेच्या मानाने अन्न-आहार कमी पडणे हे बालकुपोषणाचे प्रमुख कारण आहे.
बरीच बाळे 1 ते3 वर्षातच कुपोषित होऊन जातात. यात त्यांचे फार नुकसान होते. त्यांची वाढ पुढेही अपुरीच राहते. म्हणूनच 3 वर्षापर्यंत बाळांची चांगली काळजी घ्यावी लागते.
तीन वर्षानंतरही वाढीसाठी चांगले खाणेपिणे, आरोग्यसेवा, स्वच्छता याची गरज असतेच. अंगणवाडीतले खाणे केवळ पूरक असते. मात्र तो मुख्य आहार नाही.
कुपोषणामागे चुकीच्या सामाजिक चालीरिती आहेत तशी गरीबी पण आहे. गरिबीमुळे आई-बापांना बाळाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. घरी बाळ सोडून कामावर जावे लागते. रोजगारासाठी गाव-घर सोडणा-या कुटुंबाची मुले जास्त कुपोषित होतात
अंगणवाडी-योजनेत मुलांची वजने घेऊन वयाप्रमाणे हिशोब करुन वजन कमी/जास्त/योग्य असे ठरवले जाते. यासाठी शासन भारतीय बालरोगतज्ञ परिषदेची शिफारस वापरते. यानुसार ग्रेड 1,2,3,4 वर्गवारी केली जाते. ग्रेड 3 व 4 म्हणजे तीव्र कुपोषण. ग्रेड 1 हे सौम्य कुपोषण आणि ग्रेड 2 मध्यम कुपोषण, वयाप्रमाणे वजन तपासण्यासाठी वजन तक्ता वापरला जातो. वजन करण्यासाठी लहान मुलांना झोळी व स्प्रिंगकाटा असतो. मोठया मुलांना गोल वजनकाटयावर उभे करुन वजन पाहिले जाते. कुपोषण मोजण्याचे इतर मापदंड अंगणवाडीत वापरले जात नाहीत उंची खुरटणे, (वयानुसार उंची) हा एक महत्त्वाचा मापदंड आहे, पण तो इथे वापरला जात नाही. या वयानुसार वजन पध्दतीने महाराष्ट्रातील एकूण कुपोषणाचे चित्र सोबतच्या तक्त्यात दिले आहे. यातून तीव्र कुपोषणाचे प्रमाण अगदी कमी असल्याचे दिसून येते. अनेकांना याबद्दल शंका आहे. कदाचित कुपोषण दाखवण्याच्या भीतीमुळे अंगणवाडी सेविका किंवा गटपातळीवरील अधिकारी हे आकडे कमी दाखवत असू शकतील. किंवा अंगणवाडीचा आणि या अतिकुपोषित मुलांचा संबंध येत नसेल/आलेला नसेल. वस्ती-तांडा दूर असणे, रोजगारासाठी वणवण या दोन कारणांनी असे होत असेल.
NFHS सर्वेक्षणात तीन मापदंड वापरतात – (अ) वयानुसार वजन, (ब) वयानुसार उंची, (क) उंचीनुसार वजन. यातला पहिला मापदंड अंगणवाडीत वापरला जातो हे आपण पाहिले आहे. मात्र ग्रेड 1,2,3,4 कशाला म्हणायचे याच्या व्याख्या अंगणवाडीत वेगळी तर NFHS मध्ये वेगळी आहे. NFHS3 चे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सोबतच्या तक्त्यात मांडले आहेत. यावरून असे दिसून येते की मागील सर्वेक्षणापेक्षा यावेळी काही सुधारणा झालेली आहे.
देशभर दर वर्षांनी NFHS ही संस्था एक व्यापक सर्वेक्षण घडवून आणते. अर्थातच ही नमुना पाहणी असते, पण ती अगदी शास्त्रीय व प्रतिनिधीय पध्दतीने केलेली असते. नुकतेच याच्या तिस-या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. यात भारत व महाराष्ट्रादि प्रांतांची कुपोषणविषयक आकडेवारीही दिलेली आहे. यातील निवडक आकडेवारीचे विश्लेषण उपयुक्त ठरु शकेल. याचबरोबर बालमृत्यू, प्रजनन वेग, इ. माहितीही उपयुक्त ठरेल.
बालकांच्या लसीकरणाची टक्केवारी देशात मागील सर्वेक्षणात 43% होती ती किंचित सुधारुन 44% झालेली आहे. मात्र याचवेळी महाराष्ट्रात ती 89% पासून 81% पर्यंत घसरली आहे.
बालकुपोषणात वयानुसार वजन, वयानुसार उंची व उंचीनुसार वजन हे तीन मापदंड आहेत. याबरोबर ऍनिमियाचे (रक्तपांढरी) प्रमाण हा ही एक महत्त्वाचा निकष मोजला जातो. महाराष्ट्रात यानुसार पुढीलप्रमाणे आकडेवारी येते. (कंसातले आकडे भारताचे आहेत): वयानुसार अल्पवजनी मुलांचे प्रमाण 40% (भारत 46%), वयानुसार उंची खुरटलेली मुले 38% (भारत 38%) उंचीनुसार वजन कमी असणे (रोडपणा) 15% (19% भारत)
महाराष्ट्रातली या तीनही समस्यांचे प्रमाण मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत थोडे कमी झाले आहे.
6 महिने -35 महिने वयोगटातील रक्त कमी असलेल्या मुलांचे प्रमाण 72% (भारत 79%) तर स्त्रियांचे ऍनिमिया रक्तपांढरीचे प्रमाण 49% (भारत 56%) इतके आहे.
वजन, उंची ही झाली ढोबळ मोजमापे. कुपोषणाचे आणखीही पैलू आहेत – (अ) रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. – म्हणजे लालपणा कमी असणे. याला चुकीने ‘रक्तक्षय’ असे म्हटले जाते; पण हा क्षयरोग नव्हे. आम्ही त्याला ‘रक्तपांढरी’ म्हणतो. महाराष्ट्रात अशा मुलांचे प्रमाण 80% इतके म्हणजे खूपच जास्त आहे. रक्तातले हिमोग्लोबिन मोजता येते. (ब) ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव. हे मोजत नाहीत पण अभावाच्या खाणाखुणा किती प्रमाणात आहेत त्याची मोजदाद करता येते. (क) आयोडीन कमतरतेमुळे गलगंड होणे आणि मतिमंद बाळे निपजणे. (ड) डोळयात पांढुरके डाग असणे ही एक खूण आहे. याशिवाय वजन जास्त असणे हा देखील कुपोषणाचा महत्त्वाचा प्रकार आहे.
कुपोषण म्हणजे केवळ बालकुपोषण नाही. कुपोषण यापुढेही होत राहते. शालेय वयातील मुले, तरुण वय, प्रौढक्य व वृध्दत्त्वातही कुपोषण असतेच. भारतात व महाराष्ट्रात ते आहेच. वयाच्या 18-20 वर्षांपर्यंत उंची, वजन, स्नायुभार वाढत राहतात. या काळातले कुपोषण झाले तर वाढीवर कायमचा परिणाम होतो. कुपोषणावर उपाययोजना करण्यासाठी बालवय ही सगळयात योग्य वेळ म्हणून बाल कुपोषण महत्त्वाचे.