कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्क म्हणजे खेकडा. कर्करोगाचे आजार खेकडयाप्रमाणे चिवट, धरले तर सहसा न सोडणारे असतात. तसेच खेकडयाला सर्व दिशांनी अवयव असतात त्याप्रमाणे कर्करोग आजूबाजूला अनेक दिशांनी पसरतो. म्हणूनच कर्करोग हे नाव अगदी समर्पक आहे. पण यापेक्षा जास्त समर्पक शब्द म्हणजे बांडगूळ. बांडगूळ जसे झाडाला खाऊन टाकते तसेच कर्करोगाचे आहे.
कर्करोग हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. याला काही अपवाद आहेत. भारतात दर लाख लोकवस्तीत 100 कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण आहे. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता वाढते. कर्करोग जवळजवळ कोणत्याही अवयवात निर्माण होऊ शकतो. त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागाशी संबंधित असतात.
कर्करोग: महत्त्वाचे अवयव (तक्ता (Table) पहा)
ही वर्गवारी शहरी लोकसंख्येतून घेतलेली आहे. ग्रामीण भागात थोडयाफार फरकाने हेच चित्र असेल, फक्त क्रम थोडा वेगळा असेल. यातल्या काही अवयवांचे कर्करोग उघड दिसत असल्यामुळे हे रुग्ण जरा आधीच्या अवस्थेत तपासणीसाठी येतात उदा. जीभ व तोंडाच्या अंतर्भागाचे कर्करोग, घसा, स्तन, इ. पण काही कर्करोग अगदी अंतर्भागात असल्यामुळे उशिरा दिसून येतात व तोपर्यंत ते हाताबाहेर जातात. विशेषतः जठर, यकृत, अन्ननलिका, फुप्फुसे, गर्भाशय, मोठे आतडे, गुदाशय, प्रॉस्टेट, इत्यादी ठिकाणचे कर्करोग लवकर दिसून येत नाहीत. कर्करोगाच्या जागेनुसार आजारांमुळे थोडाफार त्रास किंवा बदल जाणवतो उदा.
असे बदल लवकर हेरून डॉक्टरकडे पाठवणे अगदी महत्त्वाचे आहे. योग्यवेळी उपचार झाले तर यांतील काही रुग्ण उपचाराने बरे होण्याची शक्यता असते.
कर्करोगाचे लोकसंख्येशी व इतर आजारांशी असलेले प्रमाण सतत वाढत आहे हे स्पष्ट आहे. याची कारणे अनेक आहेत. याबरोबरच लोकशिक्षणामुळे रोगाची विशिष्ट लक्षणे आढळल्यास जागरूकपणे रुग्ण लगेच डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोगनिदानाचे प्रमाण खूप वाढले आहे. सोनोग्राफी व रक्तचाचण्या यामुळे रोग लवकर ओळखता येतो. कर्करोगाच्या आकडेवारीत जी वाढ झालेली दिसते, ती वाढ थोडीशी खरी आहे. मुळात कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होतेच आहे. याची मुख्य दोन कारणे म्हणजे आयुर्मान वाढणे, आणि कर्करोगाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती वाढत जाणे (उदा. प्रदूषण, अनेक व्यवसायजन्य कर्करोग).
शरीराचा अगदी प्राथमिक घटक म्हणजे पेशी. पेशींचे विभाजन होऊन पेशींची संख्या वाढत असते. या संख्यावाढीमुळे अवयवांची वाढ होते. मात्र या सर्व पेशींची वाढ ठरलेल्या ठिकाणापुरती मर्यादित असते. उदा. जठराच्या पेशी फुप्फुसात वाढणार नाहीत. कर्करोगात या दोन्ही नियमांचे उल्लंघन होते. एक म्हणजे पेशींची संख्या गरजेपेक्षा जास्त वाढते व तिथून सुटलेल्या कर्कपेशी शरीरात कोठे रूजून वाढू शकतात. ही कर्करोगाची मूळ घटना आहे. असे का होते? काही पेशी अशा बेलगाम का होतात?
या प्रश्नाचे उत्तर पेशीकेंद्रातली गुणसूत्रे व रंगसूत्रे यांच्यात शोधावे लागेल. पेशीचे सर्व गुणधर्म यात सामावलेले असतात. त्या पेशीच्या वाढीच्या मर्यादा, संख्यावाढीच्या मर्यादा, स्थानाच्या मर्यादा, इत्यादी या पेशीकेंद्रात गुणसूत्रांच्या स्वरूपात ठरलेल्या असतात. यात बदल झाले, की गुणधर्मातही बदल होतात. पेशींची संख्या, आकारमान, स्थान, इत्यादी बंधने सैल करणारे बदल घडले की, कर्करोगाची शक्यता तयार होते. समजा एखाद्या पेशीत (उदा. जिभेवरच्या एका पेशीत) असा बदल झाला तर त्या पेशीचे पुढे विभाजन होताना संख्या, आकारमान वाढत जाईल. त्यातून तयार होणा-या सर्व पेशी अशाच स्वैर असतील. हळूहळू त्या ठिकाणी एखादी गाठ तयार होईल. गाठीच्या काही भागांस रक्तपुरवठा न झाल्याने किंवा घर्षणाने त्याचा काही भाग मरून त्या ठिकाणी व्रण किंवा खड्डा तयार होईल. पण उरलेल्या पेशी मात्र वाढत राहतील. लगतच्या भागापर्यंत (उदा. जिभेपासून तोंडातील आतले आवरण, त्यावरचे स्नायू, अस्थी, इ.) या कर्कपेशी वाढत जातील.
उगमस्थानापासून आजूबाजूच्या अवयवांत बांडगुळाप्रमाणे वाढण्याच्या या अवस्थेला स्थानिक आक्रमणाची अवस्था असे म्हणता येईल. या अवस्थेत रोगट भाग काढून टाकणे शक्य असल्यास रोगमुक्ती मिळू शकते. पण असे काही थोडे भागच काढून टाकणे शक्य असते. जीभ, गाल, त्वचेचा एखादा भाग, स्तन, आतडयाचा थोडा भाग, इत्यादी काढून टाकण्यासारखे असतात. पण हृदय, यकृत असे काही भाग काढून चालत नाहीत. काही भाग अंशतः काढता येतात (उदा. जठराचा काही भाग, फुप्फुसाचा काही भाग, इ.)
कर्करोगाचे स्थानिक आक्रमण चालू असतानाच कर्कपेशी रसवाहिन्यांवाटे व रक्तावाटे पसरत असतात. काही कर्करोगांची या मार्गाने वाढण्याची प्रवृत्ती जास्त असते, तर काहींची कमी. उदा. प्रॉस्टेट ग्रंथीचा कर्करोग इतरत्र वेगाने पसरतो, तर स्तनांचा कर्करोग त्या मानाने स्थानिक आक्रमणच जास्त करतो. रक्तावाटे किंवा रसवाहिन्यांवाटे वेगाने पसरणा-या कर्करोगांमध्ये मुख्यतः प्रॉस्टेट, थॉयराईड (गलग्रंथी), स्त्री-पुरुष बीजांडे, यकृत, रक्तपेशी यांचे कर्करोग प्रमुख आहेत. रक्तपेशींचा कर्करोग मात्र इतर अवयवांत फारसा पसरत नाही.