शेती व्यवसायातील अनेक कामांमध्ये अपघातांची शक्यता असते. चांगली काळजी घेता आली तर त्यातले काही अपघात टळू शकतील. उरलेले काही अपघात टाळण्यासाठी मात्र जास्त व्यापक उपाययोजना लागेल.
आधी आपण या अपघातांचे वर्गीकरण करू या.
या यादीतल्या सगळयाच अपघातांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण काही मुद्दे खालीलप्रमाणे:
सदोष यंत्रे हा एक मोठा प्रश्न आहे. कापणीयंत्राच्या बाबतीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गहू कापणी कामगारांत हे अपघात विशेष प्रमाणात आढळतात. हात, बोटे तुटणे हा एक फारच गंभीर अपघात आहे.
साप, विंचू, इत्यादी विषारी प्राण्यांच्या दंशाचे प्रमाण खूप आहे. आपल्या समाजात बूट, हातमोजे वापरण्याची पध्दत नाही. बूट, हातमोजे घातल्यास यातले निम्म्याहून अधिक अपघात सहज टळतील. हे बहुतेक अपघात संध्याकाळी, पहाटे या वेळेत होतात; म्हणून चांगली बॅटरी पाहिजे. योग्य उपचार ताबडतोब मिळाले तर यातले 90% मृत्यू टळू शकतात. विंचू व सर्पदंशाबद्दलचा तपशील वेगळा दिला आहे.
साधारणपणे एक वर्षानंतर मुलांची हालचाल एकदम वाढते. मुलांच्या सभोवतालच्या परिस्थितीत अनेक धोकादायक गोष्टी असल्यास अपघातांचे प्रमाण वाढते. एक वर्षावरील मुलांच्या मृत्यूंचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. या अपघातांत अनेक प्रकार येतात. भाजणे (स्वयंपाकघरात), फटाक्यांचे अपघात, बुडणे, झाडावरून पडणे, साप-विंचू चावणे, पडून मार लागणे, गुरांमुळे होणा-या जखमा, विजेचा शॉक, वाहनांखाली सापडणे, औषधे किंवा विषारी पदार्थ पोटात जाणे, खेळताना झालेल्या जखमा, बी, किडा, खडू, इत्यादी नाका-कानात जाणे, धारदार वस्तूंमुळे जखमा होणे, खेळामध्ये टोकदार वस्तू लागणे, इत्यादी अनेक अपघात यात येतात. यांतल्या अनेक घटना जीवघेण्या ठरू शकतात.
असे अपघात होऊ नयेत म्हणून अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागते. मुलांकडे व त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष असणे आवश्यक आहे. अनेक कुटुंबांत मुलांना लहान भावंडांकडे सोपवून रोजगारासाठी बाहेर पडावे लागते. यामुळे अपघात होत राहतात.
घर व घराभोवतालच्या परिसरात धोकादायक गोष्टी मुलांपासून दूर किंवा हाताबाहेर आहेत याची खात्री करायला पाहिजे. उदा. औषधे किंवा विषारी बाटल्या उंच ठिकाणी असणे, चाकू-कात्री खाली न राहणे, आजूबाजूला टाकी, उघडी डबकी किंवा खड्डे नसणे, मुलांच्या खेळण्यांत धारदार वस्तू नसणे, इत्यादी अनेक गोष्टी पाहणे आवश्यक असते. अशी दक्षता घेतली तरच मुलांचे अपघात टळू शकतील.
फटाक्यांचा मोह टाळल्यास काही अपघात टळतील. तसेच बालमजुरीचीही मागणी कमी होईल.