/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
चेतासंस्थेचे काही रोग लक्षणे
प्रास्ताविक

Brain Structure पूर्वी ज्याला मज्जासंस्था म्हणत त्याला आता चेतासंस्था असे नाव आहे. मेंदू, चेतारज्जू आणि नसा (म्हणजे चेतातंतूंचे गट्ठे) हा आपल्या शरीरातला अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचा भाग आहे. शरीरातल्या सर्व क्रियांवर याचे नियंत्रण असते. या संस्थेच्या आजारात शरीराच्या इतर कोठल्या ना कोठल्या तरी भागावर परिणाम होतोच. म्हणून मेंदूचा एखादा भाग आजारी वा बिघडला आहे हे शरीरावरच्या दुष्परिणामांवरून बहुधा ओळखता येते. उदा. मेंदूत रक्तस्राव झाला तर अर्धांगवायू होतो. चेतासंस्थेच्या आजारांत अनेक प्रकार व कारणे आहेत. आपल्याला चेतासंस्थेच्या ब-याच भागांचे हळूहळू ज्ञान होत आहे.

चेतासंस्थेच्या आजारांचे परिणाम निरनिराळया प्रकारचे असतात. एखाद्या विशिष्ट भागावर मुंग्या येणे, झटके, बधिरपणा, शक्ती कमी होणे, लुळेपणा, अनैच्छिक हालचाली, स्नायू ताठ होणे, स्नायू निकामी व लहान होत जाणे, एखाद्या विशिष्ट इंद्रियाचे कामकाज बिघडणे किंवा बंद पडणे (उदा. दृष्टी जाणे, बहिरेपणा, इ.) तोल जाणे, स्मरणशक्ती, विचारशक्ती, बोलणे, इत्यादी मानसिक, बौध्दिक, भावनिक क्रिया मंदावणे किंवा बंद पडणे, इत्यादी अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू शकतात.

या मुख्य परिणामांशिवाय इतर संस्थांच्या आजारात दिसणारी लक्षणे व चिन्हे (उलटया, ताप, बेशुध्दी, इ.) दिसू शकतात. आजाराची सुरुवातीपासूनची वाटचाल आणि दिसणारे परिणाम याचा सांगोपांग विचार करूनच रोगनिदान करण्यात येते. निदानासाठी खास तपासणीचा आधार घ्यावाच लागतो. (उदा. पाठीच्या कण्यातल्या चेतारज्जूच्या भोवतालच्या पोकळीतील पाणी काढून तपासणे, क्ष-किरण चित्र, स्कॅन, इ.) चेतासंस्थेचे आजार हा खास तज्ज्ञांचा विषय आहे. पण निवडक आजारांची सर्वांनाच माहिती असणे आवश्यक आहे.

चक्कर आणि अंधारी

Dizziness Darkness चक्कर किंवा घेरी येणे हे आपल्या सर्वांच्या पाहण्यात असते. चक्कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुध्दीही येऊ शकते. पण ब-याच वेळा आपोआप बरे वाटते.

चक्कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला जात असतो. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्याचे दोन भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘चक्कर येणे’ म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या व्यक्तीस स्वतः किंवा आजूबाजूचे जग गरगर फिरत आहे अशी भावना होणे. काही आजारांमध्ये असे गरगरणे किंवा चक्कर येणे एवढयापुरताच त्रास मर्यादित असतो. पण काही आजारांमध्ये मात्र डोळयासमोर अंधारी येणे, उभे असेल तर खाली पडणे, बेशुध्दी इथपर्यंत घटनाक्रम जातो. नुसती गरगरण्याची भावना असेल (केवळ चक्कर) तर अंतर्कर्ण किंवा त्याच्याशी संबंधित मेंदूचा भाग यांचे आजार असतात. प्रवास ‘लागणे’ हा प्रकार यातच येतो. कारण बस किंवा बोट लागण्याचा त्रास हा अंतर्कर्णाच्या संवेदनशीलतेमुळेच निर्माण होतो.

डोळयासमोर अंधारी

‘चक्कर’पेक्षा वेगळा प्रकार म्हणजे डोळयापुढे अंधारी येऊन खाली पडणे किंवा जागच्या जागी बेशुध्द होणे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा अचानक कमी पडणे. ही घटना अनेक कारणांमुळे घडते.

  • अतिरक्तदाब असताना अचानक उभे राहणे.
  • अल्परक्तदाब. यामुळे मेंदूत रक्तपुरवठा कमी होतो.
  • पोटातील चलनवलन एकदम (वायू, विकार, कळ) बदलून रक्तप्रवाहात घट येणे.
  • अतिवेदनेमुळे चेतासंस्थेवर तात्पुरता परिणाम होऊन त्यामुळे रक्तदाब अचानक कमी पडणे.

यापैकी कारणे असतील तर उभी असलेली व्यक्ती खाली पडते. पण खाली पडल्यावर हृदय व मेंदू एकाच पातळीवर येऊन मेंदूचा रक्तप्रवाह लगेच सुधारतो. यामुळे ती व्यक्ती तात्पुरती बेशुध्दी संपून लगेच सावध होते. काहीवेळा अचानक खाली पडलेल्या व्यक्ती काही क्षणानंतर आपोआप सावध कशा होतात हे यातून समजते. अशी व्यक्ती चक्कर येताना खाली पडत असल्यास तिला उभे धरून ठेवणे चुकीचे आहे. कारण यामुळे मेंदूस रक्त पोहोचणार नाही. याऐवजी या व्यक्तीस हलकेच सुरक्षित आडवे होऊ देणे महत्त्वाचे आहे. हा महत्त्वाचा प्रथमोपचार आहे.

पण काही आजारांमध्ये केवळ आडवे झाल्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्याची फारशी शक्यता नसते. रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका, शोष (शरीरातले पाणी कमी होणे), मेंदूत रक्तस्राव होऊन किंवा रक्तवाहिनी अरुंद होऊन रक्तप्रवाह थांबणे. या आजारांमध्ये मेंदूचा रक्तपुरवठा कमी राहिल्याने ही स्थिती दीर्घकाळ राहते.

इतर काही आजारांमुळे चक्कर येण्यासारखी भावना दिसते. रक्तपांढरी, खूप ताप, दृष्टिदोष, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे (उपास, मधुमेहात जादा इन्शुलिन दिल्याने किंवा इतर कारणाने), इत्यादींमुळे चक्कर येणे किंवा त्यासारखी भावना होते.

चक्कर किंवा अंधारी – रोगनिदान

सोबतच्या रोगनिदान तक्त्याचा आणि मार्गदर्शकाचा आधार घेऊन रोगाविषयी अंदाज बांधता येईल. चक्कर येण्यामागची अनेक कारणे डॉक्टरांनीच हाताळणे आवश्यक आहे. म्हणून तात्पुरती मदत केल्यानंतर रुग्णास योग्य ठिकाणी तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे.

यापैकी ‘प्रवास लागणे’, उपवास, अपचन, पोटातील गॅस, उष्माघात ही कारणे असतील तर उपचार तुम्ही स्वतः करू शकाल.

रक्तपांढरी (जास्त प्रमाणात), हृदयविकार, अंतर्कर्णाचे आजार, मेंदूचे आजार, मानसिक आजार, क्षयरोगविरोधी औषधांचा दुष्परिणाम, काचबिंदू, मधुमेह, इत्यादी कारणांसाठी योग्य तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

चक्कर आणि अंधारी येणे (तक्ता (Table) पहा)

सोबतचा रोगनिदान मार्गदर्शक वापरताना पुढील काही मुद्दे लक्षात घ्यावेत :

  • दम लागणे – म्हणजे श्वास वेगाने चालणे, लवकर थकवा येणे.
  • पोटात वायू, गुबारा – विशेषतः उतारवयात हा प्रकार आढळतो. ब-याच वेळा गुबा-यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारखे परिणाम दिसतात. मात्र अपचन, गुबा-याची माहिती रुग्णाकडून सहज मिळू शकते.
  • जास्त रक्तस्राव – जास्त रक्तस्रावामुळे रक्ताभिसरण कमी पडून अंधारी येते. बाहेर दिसणारा रक्तस्राव असेल तर कारण स्पष्ट असते. पण शरीराच्या आत झालेले रक्तस्राव कळण्यासाठी तपासणी करावीच लागते. असे मोठे रक्तस्राव उदरपोकळी, छाती, मांडी या तीन भागांत होऊ शकतात. (मेंदूतल्या रक्तस्रावानेही चक्कर येईल. पण त्याचे कारण मेंदूच्या कामकाजात असते.)

मांडीच्या हाडाचा अस्थिभंग असेल तर वरवर मांडी फार न सुजता आत एक-दोन लिटर रक्तस्राव होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थिभंगाच्या इतर खाणाखुणा (हालचाल न करणे, वेदना, इ.) दिसतील.

छातीतला रक्तस्राव असेल तर दम लागणे, छातीच्या त्या बाजूच्या भागाची श्वसनाबरोबर हालचाल न होणे ह्या खुणा दिसतात. याबरोबरच क्वचित खोकल्यातून रक्तस्राव असेल.

उदरपोकळीतील रक्तस्राव असेल तर पोटात वेदना, दुखरेपणा, कडकपणा जाणवेल, (पोटाचा आकार वाढण्याची अपेक्षा चूक आहे)

गरोदरपण – मग ते दोन-तीन महिन्यांचे का असेना- असेल तर अंतर्गत रक्तस्रावाची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. हा रक्तस्राव योनिमार्गे दिसेलच असे नाही.

  • अतीव वेदना :कोणतीही अतीव वेदना अंधारी येण्यास कारणीभूत ठरू शकते. हृदयविकाराची वेदना, अस्थिभंग, पोटातील कळ (जास्त असेल तर), इत्यादी उदाहरणे सांगता येतील.
  • खूप ताप : खूप ताप असेल तर तापाचे कारण असलेल्या रोगप्रक्रियेमुळे अशक्तता येऊन अंधारी येऊ शकते.
  • उष्मा : उष्माघातात शोष व उष्णतेमुळे अंधारी येते.
  • शोषः जुलाब-उलटयांमुळे शोष पडून अंधारी येते.
  • रक्तातील साखर कमी होणे : मधुमेहावर ‘इन्शुलिन’ उपचार चालू असेल तर (अ) इन्शुलिन जास्त होऊन किंवा (ब)जास्त व्यायाम व (क) उपवास यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण उतरून अंधारी येते. थोडी साखर खायला दिल्यास ही अंधारी लगेच थांबते.
  • मानसिक धक्का : मानसिक धक्क्यामुळे रक्तप्रवाहात तात्पुरते बदल होऊन अंधारी येते. कधीकधी बेशुध्दीही येते. मात्र खाली पडल्यावर रक्तप्रवाह सुधारून आपोआप बरे वाटते.
  • मानेतील मणक्याचा आजार : मानेतील मणक्याची कुर्चा सरकणे किंवा हाडाचे कण तयार होणे, किंवा मणक्यातले अंतर कमी होणे, यामुळे चेतासंस्थेवर दबाव येतो. यामुळे चक्कर येऊ शकते.
  • औषधांचा परिणाम : क्षयरोगाच्या औषधांचा (स्ट्रेप्टोमायसिन) अंतर्कर्ण व त्याच्याशी संबंधित नसेवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा वेळी चक्कर येणे, कानात बारीक आवाज होत रहाणे हा त्रास जाणवतो. अंतर्कर्णाचे अनेक आजार चक्कर येण्यास कारणीभूत ठरतात.
  • दृष्टीदोष : दिसायला त्रास होणे, खूप डोकेदुखी व चक्कर असेल तर काचबिंदू असण्याची शक्यता असते.
  • प्रवास : प्रवास आणि चक्कर येणे यांचा संबंध सर्वांना माहीत आहे. असाच त्रास झोक्यावरही होऊ शकतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.