रक्तस्रावाची प्रवृत्ती
शरीरात एखाद्या ठिकाणी कापले तर रक्तस्राव सुरू होतो रक्तस्राव थांबावा म्हणून शरीरातून तीन प्रकारचे प्रयत्न होतात.
- रक्तस्रावाच्या भागातील रक्तवाहिन्या लगेच आकसून रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते.
- केशवाहिन्यांच्या जाळयातून रक्तस्राव असेल तर सूक्ष्म रक्तपेशी व रक्तकणिका जमून केशवाहिन्यांचे जाळे बंद होते. या प्रक्रियेने बहुधा केशवाहिन्यांमधला रक्तस्राव पूर्ण थांबतो. यासाठी सुमारे 1 मिनिट पुरते.
- रक्तवाहिनीतून होणारा रक्तस्राव थांबण्यासाठी रक्त गोठावे लागते. यानुसार 5 ते 13 मिनिटे लागतात, कारण रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला एवढा वेळ लागतोच.रक्त गोठण्याची प्रक्रिया होते म्हणजेच रक्तातील विशिष्ट प्रथिने गोठून त्याची गाठ होऊन रक्तस्रावाचा मार्ग बंद होतो.
रक्त गोठण्यासाठी एक विशिष्ट प्रथिन, जीवनसत्त्व के, कॅल्शियम (चुना) व इतर काही घटक लागतात. दूध नासल्यावर चोथापाणी जसे वेगळे होते तशीच काही प्रक्रिया यात होते. एखाद्या काचेवर किंवा बाटलीत रक्त ठेवल्यावर 5 ते 13 मिनिटांत रक्ताची गाठ जमते व पिवळसर पाणी वेगळे होते.
रक्तस्रावाचा वेळ याहून जास्त लांबत असेल तर त्याचे रोगनिदान होणे आवश्यक आहे. अशी रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल तर हिरडया, नाक, लघवी, इत्यादी मार्गानीही रक्तस्राव होतो. एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर त्यातूनही जास्त रक्त जाते. त्वचेखाली लालसर रक्ताचे ठिपके उमटतात, कारण केशवाहिन्यांतून त्वचेखाली रक्तस्राव होत राहतो. डेंगू तापात काही जणांना हा त्रास होतो.
रक्तस्रावाची कारणे
रक्तस्राव थांबत नसला तर त्याची अनेक कारणे असू शकतात.
- डेंग्यू ताप व जंतुदोष
- मेंदूसूज, विषमज्वर
- सर्पदंश- विशेषतः फुरसे, घोणस, इ.
- रक्ताचा कर्करोग
- आनुवंशिकतेचे आजार (हिमोफेलिया)
- ‘क’ जीवनसत्त्व आणि इतर घटकांचा अभाव
- यकृताचा आजार
- काही औषधांचा दुष्परिणाम (उदा ऍस्पिरिन)
- गुंतागुंतीच्या बाळंतपणात घातक रक्तस्राव होऊ शकतो.
- रक्तस्रावाची प्रवृत्ती आढळल्यास तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
रक्तस्राव आणि आयुर्वेद
रक्तस्रावामागे अनेक प्रकारची कारणे आढळतात. इतर उपचाराबरोबर अडुळसा रस व गूळ किंवा साखर देऊन उपयोग होऊ शकेल. यासाठी अडुळसा पानांचा रस तयार करावा लागतो. रस तयार करण्यासाठी 12-15 अडुळसा पाने वाफवून, वाटून रस काढावा. यात सुमारे 15-20 मि.ली. रस आणि त्याबरोबर चमचाभर खडीसाखर (किंवा गूळ किंवा साखर) मिसळून रोज एकदा याप्रमाणे 7 ते 10 दिवस द्यावा. काही रुग्णांच्या बाबतीत या उपचाराने रक्तस्रावाच्या प्रवृत्तीला आळा बसतो.
ज्या रुग्णांना त्वचेखाली स्त्राव होण्याची (लाल ठिपके दिसतात) प्रवृत्ती असते त्यांना रक्तबंधनी गोळी (100 मि.ग्रॅ.) सकाळी व संध्याकाळी द्यावी. याप्रमाणे 7 दिवस उपचार करावेत.
रक्ततपासणी हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकला असेल. हल्ली रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात नाहीत. (मात्र प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत रक्ततपासणीची गरज नसते.)
रक्ततपासणी या गोष्टींसाठी केली जाते
- रक्तातील रक्तद्रव्य, तांबडया पेशी, पांढ-या पेशींची संख्या व प्रमाण तपासणे.
- रक्तस्राव किती वेळात थांबेल व रक्त किती वेळात गोठते हे पाहणे.
- रक्तातील प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ क्षार, प्राणवायू, कार्बवायू, यूरिया, बिलिरुबीन, (काविळीत वाढते ते द्रव्य) आणि इतर अनेक घटकांचे प्रमाण पाहणे. (अर्थातच ही पाहणी नेहमी करावी लागत नाही)
- रक्तातल्या प्रतिघटकांची पातळी आणि प्रकार (म्हणजे रोगजंतूंविरुध्द तयार होणारे संरक्षक पदार्थ) पाहणे. उदा. विषमज्वरासाठी ‘विडाल’ तपासणी, लिंगसांसर्गिक रोगांसाठी ‘व्हीडीआरएल’ तपासणी, एचआयव्ही एड्स तपासणी अशा अनेक तपासण्या आहेत.
- रक्तगट (ए, बी, ओ) व आर-एच तपासणे.
- रक्तातील जंतूंचे पृथक्करण करणे; त्यावर कोठली औषधे चालतात हे पाहणे, विशेषतः दीर्घकाळ ब-या न होणा-या तापात अशी तपासणी करतात.
- कावीळ, यकृतदाह, प्लीहासूज, हृदयविकार, इत्यादी आजारांत वाढणारी रासायनिक द्रव्ये तपासणे.