या आजाराचे आणखी मुख्य दोन प्रकार असतात. अल्प मुदतीचा तीव्र प्रकार आणि दीर्घ मुदतीचा कर्करोग.
रक्तातील पांढ-या पेशींची निर्मिती करणा-या मूळ पेशींना कधीकधी कर्करोग होतो. या आजारात मूळ पेशींची संख्या अमर्याद वाढते. ब-याच वेळा रक्तातल्या पांढ-या पेशींची संख्याही अमर्याद वाढते. पांढ-या पेशींचे नेहमीचे काम म्हणजे शरीराचे रोगजंतूंपासून संरक्षण. या पेशींचे काम बिघडल्यामुळे रोगजंतूंची वारंवार बाधा होऊ लागते, रक्तपांढरी होते आणि अधूनमधून रक्तस्राव होतो. उपचार न केल्यास या आजाराने मृत्यू येतो. यात दोन उपप्रकार असतात. मायलॉईड आणि लिम्फॉईट
या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. मात्र रक्ताच्या कर्करोगाचा थोडा संबंध किरणोत्सर्जन (अणूंपासून निघालेले किरण, क्ष-किरणांचा जास्त वापर) काही प्रकारचे विषाणू व काही औषधे यांच्याशी आहे. पण ब-याच रुग्णांमध्ये असे कोणतेही कारण दिसून येत नाही. याचा एक प्रकार विशेष करून लहान मुलांना होतो. दुस-या प्रकारचा रक्ताचा कर्करोग उशिराच्या वयात येतो.
यांपैकी काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवावे. वेळीच रोगनिदान व उपचार झाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता असते. रोगनिदानासाठी रक्तनमुना आणि अस्थिमज्जेचा भाग (म्हणजे हाडाच्या पोकळीतला रस) तपासावा लागतो. या तपासणीत पांढ-या पेशींची संख्या वाढणे व कर्करोगाच्या पेशी दिसणे यावरून रोगनिदान होते.
पेशींच्या वाढीला मर्यादा घालण्यासाठी पेशीवाढीविरुध्द विशिष्ट औषधे किंवा किरणोत्सर्ग वापरला जातो. ज्या ठिकाणी पांढ-या पेशी तयार होतात (विशेषतः छातीच्या मधोमध असणारे हाड) त्या ठिकाणी किरणोत्सर्गाचा मारा करून कर्करोगाच्या पेशींचा नाश करता येतो. मात्र याचे इतरही दुष्परिणाम होतात. कर्करोगाचा प्रकार, पायरी याप्रमाणे उपचार ठरवावे लागतात.
आधुनिक विज्ञानाने गेल्या काही वर्षात या रोगाच्या उपचारात मोठे यश मिळवले आहे. या उपचारांमुळे अनेक रुग्ण पूर्ण बरे होऊ शकतात. या उपचारांचे स्वरुप कर्करोगाच्या पेशींच्या प्रकारावर अवलंबून असते. अर्थातच यासाठी प्रगत तंत्रज्ञान लागते आणि कर्करोग विशेषज्ञच अशा रुग्णांचे उपचार करू शकतात. या उपचारांची मूलतत्त्वे माहितीसाठी खाली दिली आहेत.
आजाराच्या मुख्य प्रकारानुसार कर्करोगविरोधी औषधे निवडली जातात. 2-3 औषधांची एकत्रित उपाययोजना केली जाते. यासाठी ठरावीक दिवसांचे वेळापत्रक असते. हे प्रारंभिक उपचार दोन महिने केल्यावर बहुतेक (90%) रुग्णांचा आजार मोठया प्रमाणावर कमी होतो. पेशींची संख्या कमी होते व लक्षणे सुधारतात.
तरीही काही कर्करोग पेशी अजून शिल्लक राहतातच यासाठी नंतर दीड दोन वर्षे वेळापत्रकानुसार उपचार केले जातात.
या औषधांचे बरेच दुष्परिणाम असतात. यातली बरीच औषधे पेशीपातळीवर घातक परिणाम करतात, पण हे दुष्परिणाम कालांतराने बरे होतात. मात्र उपचाराच्या काळात रुग्णाला अनेक प्रकारे वैद्यकीय साहाय्य लागते. रक्त भरणे, रक्तपेशी भरणे, जंतुविरोधी उपचार, सलाईन व द्रवपदार्थ, स्टेरॉईड औषधे या सर्वांचा समतोल आणि काटेकोर कार्यक्रम असतो.
आधुनिक उपचाराने आकस्मिक लिम्फॅटिक कर्करोगाचे बरे होण्याचे प्रमाण 90% पर्यंत आहे. मात्र आकस्मिक मायलॉईड कर्करोगात हे प्रमाण 30% पर्यंतच आहे. काही रुग्णांना अस्थिमज्जारोपण करावे लागते. यासाठी अस्थिमज्जा दान करू शकेल असा रक्ताचा नातेवाईक लागतो.
या रुग्णांमध्ये आजार उलटण्याचा धोका असतोच.