त्वचा म्हणजे बोली भाषेत चामडी किंवा कातडी. ‘रोग कसे होतात’ या प्रकरणातील तक्त्यात आपण त्वचेच्या सदरात पाहिलेच असेल. भारतात बहुतेक त्वचेचे आजार हे सूक्ष्म जीवजंतूंमुळे होतात. खरूज, गजकर्ण, गळवे, पुरळ, कुष्ठरोग, हे सर्व या गटात मोडतात. बरेच आजार सांसर्गिक आहेत आणि ते निकृष्ट राहणीमानाने, अपु-या स्वच्छतेमुळे वाढतात. या आजारांवरचा खरा उपाय राहणीमान आणि स्वच्छता सुधारणे हाच आहे. त्वचेच्या लिंगसांसर्गिक आजारांची माहिती स्वतंत्र प्रकरणात दिली आहे.
त्वचेच्या आजारांचे प्रमाण बरेच असल्याने त्वचारोगासंबंधी माहिती असणे आवश्यक आहे. योग्य रोगनिदान झाले तर औषधोपचाराने चांगला उपयोग होऊ शकतो. पण योग्य माहिती नसल्याने निरर्थक व हानिकारक औषधोपचार करण्याचेही प्रमाण खूप आहे. त्वचारोगांबद्दल अज्ञान व भीती खूप असल्याने फसवेगिरीही फार आढळते. तसेच ‘स्टेरॉईड’ या औषधांचा गैरवापर त्वचारोगांमध्ये अनेक वेळा होतो. या औषधांमुळे काही आजारांत चटकन आराम मिळाला तरी तो तात्पुरता असतो. त्यानंतर दुखणे बहुधा उलटते व रुग्णाला विनाकारण त्रास भोगावा लागतो. या प्रकरणातील माहिती वाचून नेहमी आढळणा-या बहुतेक त्वचारोगांचे प्राथमिक निदान व उपचार करता येतील.
त्वचेची रचना दोन थरांमध्ये असते. यांतला वरचा किंवा बाहेरचा थर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच उपथरांनी बनलेला असतो. या पाच पेशीथरांपैकी सर्वात खालच्या पेशीथरापासून सतत निर्माण होत असतात. खालचे थर हळूहळू वर सरकतात. सर्वात बाहेरचा पेशीथर सतत झिजेमुळे टाकला जातो व नवा खालून भरून येतो. या बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठा किंवा चेतातंतू नसतात. पोषण किंवा संवेदना या दोन्हींसाठी त्याला खालच्या थरावर अवलंबून राहावे लागते. बाह्यत्वचेवर जखम झाली तर खालच्या पेशीथरांमुळेच जखम भरून येते.
या बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. या मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री-पुरुषभेद, वय, इत्यादी विविध गोष्टींवर अवलंबून असते. या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्वचेचा रंग आणखी दोन रंगद्रव्यांमुळे येतो. (अ) त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य-कॅरोटिन आणि (ब) त्वचेच्या रक्तप्रवाहातील रक्तद्रव्य-हिमोग्लोबीन ही ती दोन रंगद्रव्ये आहेत.
त्वचेचा दुसरा थर जोडपेशी आणि सूक्ष्म तंतूमय भाग यांनी बनलेला असतो. यात रक्तप्रवाहासाठी केशवाहिन्यांचे जाळे, संवेदनांसाठी चेतातंतू (वेदना, शीतोष्ण, दाब, ताण, स्पर्श) घामग्रंथी आणि केशमुळे असतात.
त्वचेतील ग्रंथीतून तेलकट पदार्थ पाझरतो. हा पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. साबणाच्या वापराने हा तेलकट थर निघून जातो. यामुळे त्वचा खरखरीत बनते. आरोग्यासाठी साबणाचा वापर आवश्यक नाही, उलट तो हानिकारक ठरू शकतो. अगदी तेलाशीच रोज काम असेल किंवा अंग फारच मळकट झाले असेल तर साबण वापरणे गरजेचे आहे. इथेही साबणाच्या ऐवजी बेसन, शिकेकाई, रिठे, इत्यादी पदार्थ वापरता येतात. (साबणाचा वापर वाढत चालल्याने जलप्रदूषण वाढत आहे हे लक्षात ठेवून वापर कमी करावा लागेल.)
आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहेत. यासाठी काही पथ्येही सांगितली आहेत. एक सर्वसाधारण नियम म्हणजे दूध, मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. दूध-खिचडी, दूध-मासे हे पदार्थही एकत्र घेणे वर्ज्य आहे. मीठ व खारट पदार्थांवरही नियंत्रण आवश्यक आहे. लोणचे, खारवलेल्या मिरच्या, सांडगे, शेवया, इत्यादी पदार्थ या दृष्टीने कमी खावेत. अशी काळजी घेतल्यास त्वचारोग लवकर नियंत्रणात येतात असा अनुभव आहे. ठेवल्यावर आपोआप पाणी सुटणा-या दही, गूळ, इत्यादी वस्तूही त्वचारोग वाढवतात असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. पोटात जंत असणे, कोठा साफ नसणे हा त्रास असेल तर त्यावर लवकर व नियमित उपचार करणे आवश्यक आहे. या विकारामुळे त्वचारोग लवकर आटोक्यात येत नाहीत.
पावसाळयाच्या शेवटी होणारे त्वचाविकार हे शरीरातील थोडे रक्त काढल्यास (रक्तमोक्षण) लवकर बरे होतात. यासाठी जळवांचा वापर करता येईल. त्वचारोगाच्या आजूबाजूला किंवा रोगग्रस्त त्वचेवर जळवा लावल्यास लवकर आराम पडतो असा अनुभव आहे.
आयुर्वेदानुसार साबणाऐवजी बेसनपीठ व तेल वापरल्यास त्वचा निरोगी व स्निग्ध राहण्यास मदत होते. विशेषकरून कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींनी अशी काळजी घेणे आवश्यक आहे.