मूत्रसंस्था – शरीरशास्त्र

मूत्रसंस्था – शरीरशास्त्र

मूत्रसंस्थेचे मुख्य घटक म्हणजे

  • पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंना असणारी दोन मूत्रपिंडे
  • त्यातून निघणाऱ्या मूत्रवाहिन्या
  • या दोन मूत्रवाहिन्यांतून येणारे मूत्र साठवून वेळोवेळी बाहेर टाकणारे मूत्राशय आणि
  • मूत्राशयातून मूत्र शरीराबाहेर आणणारी एक मूत्रनलिका-स्त्री पुरुषामध्ये ही वेगवेगळी असते .
  • पुरुषांमध्ये मूत्रनलिका लांब असते आणि वळण घेऊन शिश्नात जाते. स्त्रियांमध्ये मूत्रनलिका आखूड आणि सरळ असते. म्हणून स्त्री मूत्रनलिकेतून जंतुदोष मूत्राशयात जाणे त्या मानाने सोपे असते. म्हणून स्त्रियांमध्ये मूत्राशयदाह जास्त प्रमाणात आढळतो.

मूत्रपिंडाचे मुख्य काम म्हणजे मूत्र (लघवी) तयार करणे. यामुळे शरीराला नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात. शरीरातील अनेक जैवरासायनिक क्रियांमध्ये टाकाऊ पदार्थ तयार होतात. या टाकाऊ पदार्थांपैकी काही पदार्थ मूत्रपिंडात वेगळे काढले जातात. मूत्रपिंड म्हणजे एक नैसर्गिक गाळणे आहे. रोहिण्यांमार्फत शरीरातले रक्त मूत्रपिंडात येते. इथे ते केशवाहिन्यांच्या जाळयातून खेळवले जाते. मूत्रपिंडात असंख्य सूक्ष्म गाळण्या असतात. केशवाहिन्यांमधून काही टाकाऊ पदार्थ व पाणी या गाळण्यांमध्ये उतरते. त्यात उतरलेले काही आवश्यक पदार्थ रक्तात परत खेचले जातात (उदा: साखर).  मूत्रपिंडातल्या असंख्य गाळण्यांतून तयार झालेले मूत्र थेंबाथेंबाने मूत्रवाहिनीतून मूत्राशयात जमते. मूत्राशय पुरेसे भरले, की लघवीची जाणीव होऊन इच्छेनुसार आपण मूत्र बाहेर टाकतो.

लघवी होणे ही शरीराची अगदी महत्त्वाची क्रिया आहे. मूत्रनिर्मिती बंद पडली तर अनावश्यक पदार्थ शरीरात तुंबतात व मृत्यू ओढवू शकतो. मूत्रनिर्मितीचे काम (लघवी होणे )अनेक कारणांनी बंद पडू शकते. पैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुलाब व उलटयांमुळे किंवा उष्माघातामुळे इत्यादी जास्त प्रमाणात शोष (शरीरातले पाणी कमी होते) होणे. यामुळे मूत्रपिंडाचे काम पाण्याअभावी व कमी रक्तपुरवठयामुळे बंद पडते.( म्हणूनच खूप जुलाब,उलटया होऊन शुष्क झालेल्या रुग्णाला लघवी होते की नाही हे विचारणे फार महत्त्वाचे आहे.) चोवीस तासांत लघवी झाली नसल्यास मूत्रपिंडे कायमची बंद पडू शकतात. अशा रुग्णांना जीवनजल, सलाईन सुरु करून शरीरातील कमी झालेल्या पाण्याची भरपाई सुरु करून यांबरोबर लॅसिक्सचे इंजेक्शन किंवा गोळी देतात . लॅसिक्स या औषधामुळे मूत्रपिंडाचे काम पंधरा मिनिटांत सुरू होते, पण त्यासाठी शरीरातले पाण्याचे प्रमाण सुधारणे आणि ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे.अशा रुग्णास प्रथमोपचार सुरु करून त्वरित रुग्णालयात पाठवायला हवे.

शरीरात दोन मूत्रपिंडे असली तरी एका मूत्रपिंडावर काम चालू शकते. म्हणूनच एक मूत्रपिंडदान करणे शक्य असते.

मूत्रपिंडाची व मूत्रनलिकेची रचना व स्थान लक्षात घेता, या अवयवांच्या आजारात दुखण्याची जागा थोडीफार निश्चित असते. मूत्रपिंडाच्या आजारात दुखणे पाठीमागे असते, तर मूत्रवाहिनीच्या (खडे, इत्यादी कारणांमुळे) दुखण्याचा ‘पट्टा’ ही निश्चित असतो. मूत्राशयाचे दुखणे ओटीपोटात जाणवते, तर  मूत्रनलिकेचे दुखणे लघवीच्या जागी जाणवते.

मूत्रसंस्थेचे आजार

मूत्रसंस्थेचे आजार पचन-श्वसनसंस्थेच्या मानाने संख्येने कमी असतात, पण या संस्थेच्या वरवर क्षुल्लक दिसणाऱ्या तक्रारींच्या मुळाशी गंभीर आजारही असू शकतात. वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, लघवीचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे हे लक्षात आले पाहिजे. नाही तर उपचारास विलंब होऊन मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. तसेच मुतखडयामुळे मूत्रप्रवाहात अडथळा तयार होऊन हळूहळू मूत्रपिंडाचे काम बंद पडू शकते. म्हणूनच मूत्रसंस्थेच्या लक्षणांकडे गंभीरपणे लक्ष देऊन वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते.

मूत्रपिंडे आणि मूत्रसंस्थेच्या आजारांची लक्षणे

मूत्रपिंडे आणि मूत्रसंस्थेच्या आजारांची खालीलपैकी लक्षणे असू शकतात, त्याकडे वेळीच लक्ष देऊन उपचार व्हायला हवेत. सुमारे 50% रुग्णांना आजार वढेपर्यंत लक्षणे/त्रास हॉट नाही हेही  लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा तपासणीची संधि असते तेंव्हा काही चंहकण्या करून घ्यायला पाहिजे (उदा: लघवी तपासणी किंवा सएरं क्रिएटिनीन)

  • एकूण लघवी कमी प्रमाणात होणे, (24 तासात 400 मिलि पेक्षा कमी)
  • लघवी दिवसातून कमी वेळा होणे
  • लघवी जास्त प्रमाणात होणे
  • वारंवार लघविला जायला लागणे
  •  लघवी करताना दुखणे , जळजळ
  • चेहऱ्यावर सूज, पावलावर सूज
  • पोटात दुखणे, ओटीपोटात किंवा पाठीच्या कण्याच्या बाजूला दुखत राहणे
  • लघवी धुरकट, गढूळ होणे,
  • लघवीतून खर जाणे (मूतखडे)
  • लघवीतून पू जाणे
  • लघवी लालसर, लघवीत रक्त जाणे  
  • भूक कमी होणे, मळमळ उलटी (हे मूत्रपिंड-विकाराचे लक्षण असू शकते)

परंतु बऱ्याच रुग्णाना कोणतीच लक्षणे नसतात किंवा उशिरा येतात, तरी आत मूत्रपिंड-विकार असू शकतो. म्हणून जेंव्हा नियमित/प्रासंगीक तपासणी होते तेंव्हा मूत्र-तपासणी. रक्तातील युरिया-क्रिएटिनिन, सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे, यातून आतील मूत्रपिंड-मूत्रसंस्था यातला आजार असल्यास माहीत होऊ शकतो.  सुमारे 50% रुग्णाना मूत्रपिंड विकार जास्त होईपर्यंत कळत नाही.  

मूत्रसंस्था आजारांसाठी विशेष तपासण्या
  • लघवीची रासायनिक आणि सूक्ष्मदर्शक तपासणी:
  • लंघवीमधील प्रथिन तपासणी : डिपस्टिक पद्धतीने प्रथिन प्रमाण मोजता येते ( प्रथिन नाही, कमी, 1+, 2+,3+,4+).
  • लंघवीतून रक्त जाण्याची तपासणी : सूक्ष्मदर्शक तपासणीत हे कळू शकते
  • एक्स रे तपासणी (मुख्यत: मुतखड्यासाठी)
  • सोनोग्राफी
  • रक्तातील क्रिएटिनिन (सामान्यपणे पुरुषात 0.7 ते 1.3 मिलिग्राम /100 मिलीमध्ये, स्त्रियांमध्ये 0.6 तो 1.1). ही फार महत्वाची तपासणी आहे
  • eGFR या तपासणीत मूत्रपिंडाचे रक्त गाळून लघवी निर्माण करण्याचे काम किती क्षमतेने चालू आहे ते समजते. सामान्यपणे eGFR 90 च्या पुढे हवा.( रक्तातील क्रिएटिनिन आणि व्यक्तीचे वय व वजन यांच्या गणिताने हा आकडा काढतात.)

तीव्र मूत्रपिंडदाह (Acute Glomerulo Nephritis)

हा अचानक येणारा गंभीर आजार आहे. यात मूत्रपिंडातील पेशींना सूज येते. हा आजार सहसा लहान वयात-शालापूर्व वयात-येतो. ही सूज एक प्रकारच्या जिवाणूंमुळे येते. मात्र याची सुरुवात बहुधा घसादुखीने होते.

रोगनिदान

मूत्रपिंडदाह या आजाराची लक्षणे सहज कळून येतात. अशा मुलांमध्ये चेहऱ्यावर सूज (विशेषतः सकाळी), लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवी लालसर होणे, धुरकट किंवा गढूळ लघवी होणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. याबरोबरच कधीकधी ताप, पोटदुखी, उलटी, डोकेदुखी, इत्यादी त्रास आढळतो .

अशा रुग्णांना ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. तपासणीत अशा रुग्णांचा रक्तदाब वाढलेला दिसतो. लघवीत प्रथिने व रक्तपेशी दिसतात. एकूण लघवीचे 24 तासांतले प्रमाण नेहमीपेक्षा कमी (कधीकधी अर्धा लिटरच्या आसपास) आढळते.  डॉक्टरकडून योग्य उपचारानंतर बहुधा हा आजार आटोक्यात येतो. रोगनिदान होण्यात उशीर झाला तर मात्र धोका संभवतो.

आयुर्वेद

तोंडावर सूज येऊन, पावलावरही सूज आली असल्यास मूत्रप्रवृत्ती होण्यासाठी पातळ औषधे देण्यापेक्षा सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांचा वापर उपयोगी असतो. पुनर्नवासव दोन चमचे + दोन चमचे पाणी, दोन वेळा, सात ते दहा दिवस देतात. त्रिकटूचूर्ण दीड ग्रॅ. ते दोन ग्रॅ. सकाळ-संध्याकाळ तीन दिवस द्यावे; पचनाची शक्ती कमी असल्यास याचा उपयोग होतो. हाताच्या अंगठयाइतके आले व तेवढाच गूळ सकाळी रिकाम्या पोटी घेणे (7 ते 14 दिवस). हे अगदी थोडीथोडी सूज असताना चांगले उपयोगी पडते.