रक्त-संस्था

मानवी रक्ताचे घटक 

मानवी शरीरातील रक्त हे जीवनासाठी अत्यावश्यक द्रव ऊतक (fluid tissue) आहे. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात साधारणपणे ४.५ ते ५.५ लिटर रक्त असते. रक्ताचे मुख्यतः दोन भाग असतात – प्लाझ्मा (Plasma) आणि रक्तपेशी (Blood cells). प्लाझ्मा हा रक्ताचा द्रवरूप भाग असून तो सुमारे ५५% असतो. प्लाझ्मामध्ये सुमारे ९०-९२% पाणी असते. उर्वरित भागात प्रथिने (albumin, globulin, fibrinogen), खनिजे, हार्मोन्स, एन्झाइम्स, ग्लुकोज, चरबी व अपशिष्ट पदार्थ असतात. प्लाझ्मा शरीरातील पोषक द्रव्ये, हार्मोन्स आणि अपशिष्ट पदार्थ वहन करण्याचे कार्य करतो. उर्वरित ४५% भाग रक्तपेशींचा असतो. रक्तपेशींचे तीन मुख्य प्रकार आहेत – लाल रक्तपेशी (RBC), पांढऱ्या रक्तपेशी (WBC) आणि प्लेटलेट्स (Platelets).

लाल रक्तपेशी (RBC) या सर्वाधिक प्रमाणात असतात. त्यामध्ये हिमोग्लोबिन असते, जे ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते. सामान्यतः प्रौढ पुरुषांमध्ये RBC संख्या सुमारे ४.५ ते ५.५ दशलक्ष प्रति मायक्रोलिटर (µL) आणि स्त्रियांमध्ये ४.० ते ५.० दशलक्ष प्रति µL असते. लाल पेशींचे आयुष्य साधारण १२० दिवस असते.

पांढऱ्या रक्तपेशी (WBC) शरीराच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या असतात. त्या जीवाणू, विषाणू व इतर जंतूंविरुद्ध लढतात. WBC ची सामान्य संख्या सुमारे ४,००० ते ११,००० प्रति µL असते. त्यांचे विविध प्रकार असतात, जसे न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट, इओसिनोफिल व बॅसोफिल.

प्लेटलेट्स (Platelets) रक्ताच्या गुठळ्या बनविण्यासाठी आवश्यक असतात. त्यांची सामान्य संख्या सुमारे १.५ ते ४ लाख प्रति µL असते. जखम झाल्यावर रक्तस्त्राव थांबविण्यासाठी प्लेटलेट्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

प्लाझ्मा व विविध रक्तपेशी यांच्या समन्वयामुळे शरीराचे पोषण, संरक्षण आणि संतुलन राखले जाते. त्यामुळे रक्ताचे आरोग्य टिकवणे अत्यंत आवश्यक आहे.

रक्तगट A,B, AB, O  ही मुख्य प्रकारचे आणि त्यात Rh+ve, Rh-ve असे उपप्रकर असतात.

लोह, फॉलिक ॲसिड, आणि बी 12 ही मानवी रक्तातील लाल पेशी आणि रक्तद्रव्य  तयार होण्यासाठी आवश्यक पोषक घटक आहेत, तसेच प्रथिने देखील. स्त्रियाना पुरुषांच्या (8 मिलिग्राम रोज) दुप्पट तिप्पट प्रमाणात (28-27 मिलिग्राम) लोह पोषक  घटकाची गरज असते, कारण मासिक पाळी आणि प्रजनन यात रक्तस्त्राव होत असतो.

रक्तपांढरी (ॲनिमिया)

रक्तपांढरी म्हणजे रक्तद्रव्याचे प्रमाण कमी होण्याला आपण दिलेले एक सोयीचे नाव आहे. किंवा ‘रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता घटणे म्हणजे रक्तपांढरी’. इंग्रजीत याला अनेमिया म्हणतात. साधारण भाषेत अशा व्यक्तीला ‘फिकट किंवा निस्तेज आहे’ असे म्हटले जाते. डोळ्याचा लालसर भाग, जीभ, नखे, आणि हाताचे तळवे यावर फिकटपणा स्पष्ट दिसतो. बालकांमध्ये टाळावे किंवा टाच तपासणे सोपे जाते. पण शक्यतो रक्त-तपासणी करावी म्हणजे आजार किती आहे ते नेमके कळू शकेल.

रक्तपांढरी हा आजार आपल्या देशातला एक प्रमुख आजार आहे. तो इतक्या प्रमाणात आढळतो, की ब-याच लोकांना याची ‘सवय’ होते. इतर काही आजार असल्याशिवाय तक्रार करावी असे वाटत नाही. रक्तपांढरी जास्त प्रमाणात असेल तरच औषधोपचाराचा विचार केला जातो. रक्तपांढरी हा इतका सामान्य रोग असला तरी त्यासाठी लोकभाषेत कोठलेही नाव प्रचलित नाही. रक्तक्षय हा तयार केलेला संस्कृत शब्द आहे. रक्तक्षय हे नाव ‘क्षय’ या घटकामुळे गैरसमज करून देणारे आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण जनतेत, विशेषतः स्त्रियांमध्ये, याचे प्रमाण 50-70 टक्के आढळते. पाच वर्षापेक्षा लहान मुलांमध्येही तेवढेच प्रमाण आहे. हा जास्त करून गरिबीचा आणि कुपोषणाचा आजार आहे. पण हा आजार आपल्या देशात श्रीमंतांनाही होतो.

अनेमिया उर्फ रक्तपांढरी म्हणजे काय?

आपल्या रक्तात हिमोग्लोबीन – हे लाल रक्तद्रव्य असते आपल्या रक्तात रक्तद्रव्याचे प्रमाण दर 100 मिली. मध्ये सुमारे 15 ग्रॅम इतके (तक्ता पाहा) असायला पाहिजे. हे रक्तद्रव्य तांबडया पेशींमध्ये भरलेले असते. या तांबडया पेशी हाडांच्या पोकळयांमध्ये तयार होतात. रक्तपेशी सुमारे 120 दिवस रक्तात राहतात. त्यानंतर पांथरीमध्ये त्या ‘मोडीत’ निघतात. त्यातून निघालेल्या रक्तद्रव्याचे विघटन होऊन प्रथिने, लोह, इत्यादी घटक वेगवेगळे होतात. काही भाग परत वापरण्यासारखा नसतो, तो लघवीवाटे व मळावाटे बाहेर टाकला जातो. हा बाहेर टाकला जाणारा पदार्थ पिवळा असतो. म्हणूनच लघवी व मळ (विष्ठा) पिवळसर असतात. काविळीचा पिवळा रंगही याच द्रव्याचा असतो. उरलेल्या घटकांपैकी लोह व प्रथिने परत नवीन रक्तपेशी करण्यासाठी वापरले जातात.

रक्तपांढरीची कारणे

रक्तपांढरीत रक्तातील रक्तद्रव्याचे एकूण प्रमाण कमी असते. रक्तपांढरीचे दोन मुख्य प्रकार आहेत. (अ) रक्तपेशींची संख्या व प्रमाण कमी असणे किंवा (ब) पेशीतल्या रक्तद्रव्याचे प्रमाणच कमी असणे हेच दुसरे जास्त महत्त्वाचे कारण आहे.

हिमोग्लोबिन पातळी व अ‍ॅनिमिया (g/dL)
वयोगटसामान्य Hb (g/dL)अ‍ॅनिमिया (Hb कमी)
नवजात (0–1 महिना)16 – 22<13
1–2 महिने10 – 18<10
2–6 महिने9.5 – 14<9.5
6 महिने – 5 वर्षे11 – 13.5<11
5 – 12 वर्षे11.5 – 15.5<11.5
12 – 18 वर्षे12 – 16<12
प्रौढ पुरुष13 – 17<13
प्रौढ स्त्रिया12 – 15<12
गर्भवती स्त्रिया≥11<11
 अ‍ॅनिमियाची तीव्रता (विशेषतः प्रौढ व गर्भवतींसाठी)
तीव्रताHb पातळी (g/dL)
सौम्य (Mild)10 – 10.9
मध्यम (Moderate)7 – 9.9
तीव्र (Severe)<7
  • ही WHO मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित साधारण मूल्ये आहेत.
  • मुलांमध्ये व गर्भवती स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमिया ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही मुख्य कारणे असतात.