
कानाचे तीन भाग आहेत: बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात.
बाह्यकर्णाची रचना नरसाळयासारखी बाहेर पसरट व आत नळीप्रमाणे अरुंद असते. बाह्यकर्णाच्या नळीसारख्या भागात त्वचेमधून तेलकट पदार्थ पाझरतो.तयाला मळ म्हणतात. त्यामुळे हा भाग मऊ राहतो वा किडा मुंगी आत जात नाही..
मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. तिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो. दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो.

मध्यकर्णाची पोकळी एका नळीने (कानाघ नळी) नाकाला जोडलेली असते. या नळीमुळे मध्यकर्णातील हवा बाहेरच्या हवेशी जोडली जाऊन सम दाबात राहते.. असे नसते तर कानाचा पडदा कमीजास्त दाबाबरोबर आत किंवा बाहेर फुगला असता. सर्दी झाली, की या नळयांची तोंडे सुजून बंद होतात; यामुळे. कधी कान गच्च झाला आहे असे वाटते; तर कधी कानाला दडे बसल्यासारखे वाटते. सर्दीपडशात नाकातील घाण मध्यकर्णात जाऊन मध्यकर्णाचा दाह सुरू होतो. यामुळे कान ठणकून कधीकधी फुटतो.
मध्यकर्णात तीन लहानलहान हाडांची साखळी असते ही साखळी एका बाजूने कानाच्या पडद्याशी जोडली आहेतर दुस-या बाजूने अंतर्कर्णाच्या शंखाला जोडलेली असते. या साखळीचे काम म्हणजे ध्वनिकंपनांनी होणारी पडद्याची हालचाल अंतर्कर्णाच्या शंखापर्यंत नेणे. कान वारंवार फुटत असेल तर ही साखळी जंतुदोषाने खराब होऊन ऐकू येत नाही. मध्यकर्णात पू झाला, की कान ठणकतो. मात्र पडदा फुटून पू बाहेर पडला, की ठणका थांबतो.
अंतर्कर्ण म्हणजे हाडाच्या पोकळीत बसवलेला गाभारा किंवा एक नाजूक शंख. त्या शंखाचे मुख्य काम म्हणजे ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंतर्फे मेंदूपर्यंत पोचवणे. याला तीन अर्धवर्तुळाकार नळया जोडलेल्या असतात.या शंख व नळया तोल-स्थिती-गती यांच्याबद्दल मेंदूकडे संदेश पाठवतात. ऐकणे व स्थिती-गती ज्ञान कसे होते हे आपण अगदी थोडक्यात पाहू या.
ऐकू येणे शंखाकृती ध्वनिशंखात एक द्रव असतो. त्याच्या कोषात हारमोनियमच्या (बाजाची पेटी) पटटयांसारखी रचना असलेला एक पडदा असतो. ध्वनिकंपने हाडाच्या साखळीमार्फत शंखामध्ये पोचतात. या कंपनांमुळे शंखातल्या द्रवाची हालचाल होते. त्यामुळे ध्वनिविशिष्ट पट्टींचे कंपन होते. यानुसार पेशींना जोडलेल्या मज्जातंतूंमार्फत ध्वनिसंदेश मेंदूत पोचवले जातात. अशा तर्हेने आपल्याला ऐकू येते.
मध्यकर्णाच्या दीर्घकालीन आजारात (जंतुदोष) कानाचा पडदा आणि हाडांची साखळी खराब होतात. यामुळे मध्यकर्णामार्फत आवाज ऐकू येणे बंद होते. पण कवटीच्या हाडांवर कंपने आदळून हा आवाज हाडामार्फत ध्वनिशंखात पोचू शकतो. यामुळे काही प्रमाणात तरी ध्वनिज्ञान शाबूत राहते. या तत्त्वाचा उपयोग करून फक्त मध्यकर्ण बिघडलेल्या व्यक्तीस हाडामार्फत थोडे ध्वनिज्ञान मिळवता येते. पण ध्वनिशंख व पुढली यंत्रणा नष्ट झाली तर त्या कानास ठार बहिरेपणा येतो.
अंतकर्णाचे दुसरे काम म्हणजे गतिस्थिती ज्ञान. शरीराच्या गती-स्थितीचे ज्ञान अनेक मार्गांनी (स्नायू, सांधे, दृष्टी आणि अंतर्कर्णातील व्यवस्था) होत असते. अंतकर्णाचे यंत्रणा त्यापैकीच सर्वात महत्त्वाची आहे. ही यंत्रणा म्हणजे तीन अर्धवर्तुळाकार नळया व त्यांना एकत्र जोडणारा लहानसा फुगा असतो. या सर्व भागात द्रवपदार्थ असतो. नळयांमध्ये खास संवेदनाक्षम पेशी असतात. या पेशींच्या थरावर वजनदार कणांचा एक थर असतो.. डोक्याच्या स्थितीप्रमाणे (आडवे, उभे, तिरपे, उलटे) आणि गतीप्रमाणे (पुढे, मागे, वर्तुळाकार गती) द्रवपदार्थ व वजनदार थराची हालचाल होत राहते. याचे मेंदूत संदेश पोचतात.. कानाच्या काही आजारांमध्ये या यंत्रणेपर्यंत आजार पोचला तरीही तोल सांभाळण्याचे काम बिघडते.
बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे. बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतर्कर्ण, मेंदूची संबंधित आठवी नस किंवा मेंदूचा ध्वनिज्ञानकेंद्राचा भाग यापैकी कोठेही दोष असेल तर बहिरेपणा येतो. काही मुलांमध्ये जन्मजात कर्णबधिरता असते व त्यातला मुकेपणा हा बहिरेपणाचाच परिणाम असतो. हा आजार वेळीच ओळखू आल्यास काही उपचार व प्रशिक्षण करता येते.
कोणतेही मूल ऐकून ऐकूनच बोलायला शिकते, म्हणून त्याच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे. काही मुलांना जन्मजात बधिरता असते. हे आईवडिलांच्या लक्षात यायला उशीर होतो. यावर औषधोपचार काही नाही, मात्र हा दोष लवकर ओळखून त्या दृष्टीने संगोपन व प्रशिक्षण करणे आवश्यक असते.
बधिरतेमुळे शब्द कळत नाहीत, म्हणून ही मुले मुकी राहतात. अशा मुलांना सुरुवातीस वेगळया शाळांमध्ये घालावे अशा शाळा काही शहरांमध्ये आहेत.
आधीचे बाळ मूकबधिर असेल तर पुढील बाळ देखील असे होण्याची बरीच शक्यता असते. गरोदरपणात आईला जर्मन गोवरचा ताप किंवा गालफुगीचा ताप आल्यास गर्भावर हा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
महत्त्वाचे म्हणजे जन्मलेल्या प्रत्येक बाळाची लवकरात अशी तपासणी केली पाहिजे. टाळी वाजल्यावर दचकणे ही सर्वात सोपी खूण आहे. एक महिन्याचे बाळ टाळीला दचकते. टाळीने बाळ दचकत नसेल तर बधिरता असू शकते. तसेच आईचा आवाज, चमचा- वाटीचा ओळखीचा आवाज वगैरे आवाजांना बाळ प्रतिसाद देते की नाही हे आईने ध्यानात घ्यायला पाहिजे. चार महिन्याचे बाळ आवाजाच्या बाजूच्या दिशेला डोळे फिरवते. सहा महिन्याचे बाळ वरच्या आवाजाच्या दिशेने डोळे वळवते. वर्षाचे बाळ तोंडाने बोकाळते पण केवळ बा, बा, मा, मा एवढा आवाज पुरेसा नाही, निरनिराळे आवाज काढले पाहिजेत.
कर्णबधिरता ओळखण्याची नंतरच्या वयात एक महत्त्वाची खूण आहे. अशा मुलाला हवी आहे ती वस्तू न सांगता ते त्या वस्तूकडे बोट करते. (उदा. पाण्याचा माठ, जेवण, इत्यादी) मात्र यावेळी मूल थोडे मोठे झालेले असते.
दोन वर्षाचे बाळ बोलायला लागते. असे झाले नाही तर तपासणी केली पाहिजे.
कधीकधी बहिरेपणा पूर्ण नसतो,. अशा वेळी तपासणीसाठी यंत्रांची मदत होते.
जन्मजात नसलेला, पण नंतर तयार होणारा बहिरेपणा हा बहुधा एका बाजूला येतो. वर लिहिल्याप्रमाणे त्याची कारणे कानाच्या निरनिराळया भागांत असू शकतात ती अशी…
बहिरेपणाचे आपल्या देशात सर्वात जास्त आढळणारे कारण मध्य कर्णाचे आजारहेच आहे. कान फुटल्यावर पूर्ण आणि योग्य उपचाराची व्यवस्था होणे हे महत्त्वाचे असते. हे डॉक्टरच्या सल्ल्यानेआपणही करू शकतो.
कानाला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली असेल तर श्रवणयंत्राचा उपयोग होऊ शकतो. मात्र अंतर्कर्णाचा शंख खराब झाला असेल किंवा त्याची चेता-नस किंवा मेंदूचा भाग सदोष असेल तर श्रवणयंत्रांचा उपयोग होत नाही. यासाठी पूर्ण तपासणी करूनच श्रवणयंत्रे द्यावी लागतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याला ऐकू येत नाही त्या व्यक्तीचा समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. यंत्र घेण्याच्या झाल्यास ६ आठवडे, दिवसभर वापरण्याची तयारी पाहिजे. सुरवातीला गोंगाट वाटू शकतो , पण मेंदूला त्याची सवय व्हायला ६ आठवडे लागतात.
श्रवणयंत्राचे मुख्य प्रकार, कानामागे बसवायचे श्रवणयंत्र
मध्यम किंवा गंभीर बधिरतेसाठी ही श्रवणयंत्रे उपयुक्त आहेत. कर्णबधिर मुलांसाठी हीच श्रवणयंत्रे वापरावी लागतात. ही यंत्रे ब-यापैकी टिकाऊ असल्यामुळे परत बदलण्याचा खर्च कमी असतो.
कानात बसवायची श्रवणयंत्रे
ही श्रवणयंत्रे कानाच्या नरसाळयातच बसवतात. म्हणूनच ही प्रत्येक कानाप्रमाणे बनवावी लागतात. श्रवण यंत्र नीट न बसल्यास या श्रवणयंत्रांमधून एक शिटीसारखा आवाज येण्याची तक्रार येते. . ही श्रवणयंत्रे मुख्यत: प्रौढ/तरुण व्यक्तींसाठी वापरली जातात, कारण त्यांचा आकार एकदा केला की बदलावा लागत नाही.
याशिवाय पूर्णपणे कानात बसवायचेही श्रवणयंत्र उपलब्ध आहे.
काही जणांचा मध्यकर्ण खूप खराब असू शकतो. अशा व्यक्तींच्या कानामागच्या हाडाचा वापर ध्वनिवहनासाठी करता येतो. हाडावर बसवायचे श्रवणयंत्र मिळते.
टेलिफोन किंवा मोबाईल वापरता येतो.
आधुनिक श्रवणयंत्रात एकूण पर्याय खूप आहेत. डिजिटल श्रवणयंत्रांची किंमत खूप असते पण आवाजाची गुणवत्ताही चांगली असते. व्यक्तिगणिक बधिरतेची कंपन संख्या बदलते; त्यानुसार डिजिटल टयूनिंग करता येते हा फायदा आहे.
मात्र एकदा टयूनिंग करून चालत नाही. यासाठी परत परत तंत्रज्ञाकडे जावे लागते. श्रवणयंत्राची बॅटरी ही वारंवार बदलावी लागते. बॅटरीची शक्ती कमी झाली की आवाज कमी होतो. आता रिचार्जेबल यंत्र मिळतात.
डिजिटल श्रवणयंत्रांमुळे आजूबाजूचा गोंगाट वेगळा करता; येतो.
याशिवाय आता एफ् एम् प्रकारची श्रवणयंत्रे उपलब्ध होत आहेत. ही श्रवणयंत्रे मुख्यत: कर्णबधिर मुलांच्या वर्गांमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त आहेत. नाशिकच्या माई लेले श्रवण विकास केंद्राने यासाठी देशी तंत्रज्ञान वापरले आहे.