योग-शास्त्र

योगशास्त्र-प्राथमिक

योग म्हणजे काय?

योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग. पतंजली ऋषीने योगशास्त्र सूत्ररुपाने मांडली आहे. यात योगाची पुढीलप्रमाणे व्याख्या दिली आहे: योग: चित्तवृत्ती निरोध: (चित्तवृत्तींना निर्विकार करणे म्हणजे योग.) तरंग नसलेल्या एखाद्या शांत सरोवराप्रमाणे मन निर्विकार करणे म्हणजे योग. आपल्या मनात जागेपणी व झोपेतही सतत तरंग उठत असतात. मन सतत हिंडत फिरत असते. मन निर्विकार करण्यासाठी पतंजलीने अनेक पाय-या व साधने सांगितली आहेत म्हणूनच योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे, शारीरिक नाही.

म्हणून योग म्हणजे केवळ योगासने नाही. योगासने ही केवळ एक पूर्वतयारी आहे. शरीर हट्टाने काबूत आणणे, त्यानंतर मन काबूत आणणे याचा हठयोग म्हणता येईल. योगशास्त्रात आठ अंगे-पाय-या आहेत. म्हणून त्याला अष्टांगयोगही म्हणतात.

भारतात सुरु झालेली योगपरंपरा आता जगात अनेक देशांमध्ये पोचली आहे. पण सध्या त्यातला शारीरिक भागच जास्त पसरला आहे. योगशास्त्र शिकवणा-या हजारो शाखा व प्रशिक्षकांकडून वेगवेगळा योग शिकवला जातो. प्रकार काही असले तरी योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे, केवळ शारीरिक नाही हे लक्षात असावे.

तसेच योग म्हणजे व्यायाम नाही. योगशास्त्राचा उद्देश शरीर व मन शुध्द व भक्कम करणे हा आहे. व्यायाम आणि योगातला फरक आपण नंतर पाहणारच आहोत.

अष्टांगयोग

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा, समाधि ही योगांची आठ उपांगे आहेत. यांची थोडक्यात माहीती खाली दिली आहे.

यम

अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे) ब्रह्मचर्य, अपरिग्रह (वस्तूंचा संग्रह न करणे) हे पाच यम आहेत. योगी व्यक्तीसाठी हे पाचही आवश्यक आहेत. संसारी व्यक्तीसाठी ब्रह्मचर्य (मैथुनक्रिया मनाने किंवा शरीराने न करणे) आणि अपरिग्रह हे मर्यादित महत्त्वाचे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय ही तर जीवनाची चिरंतन मूल्ये आहेत. बहुतेक धर्मपरंपरांमध्ये ही तत्त्वे आहेत. अशा आचरणामुळे व्यक्तीची मानसिक उन्नती होते.

नियम
  • शौच (स्वच्छता) म्हणजे स्वत:च्या शरीराबद्दल वैराग्य व इतरांशी संसर्ग न करण्याची प्रवृत्ती.
  • संतोष, म्हणजे आनंद. हा आनंद स्वत:तून निर्माण व्हावा लागतो, बाहेरील वस्तूंवर तो अवलंबून नसतो.
  • स्वाध्याय, तप; म्हणजे आध्यात्मिक अभ्यास व साधना आणि ईश्वर-प्रणिधान ही समाधीची पूर्वतयारी आहे.
योगासने

स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे ‘योगासन’ अशी व्याख्या आहे. आपल्याला माहीत असणारी अनेक योगासने ‘अवघड’ वाटतात. सुरुवातीस योगासने करणे जड जाते. हळूहळू सरावाने आणि शरीर लवचीक झाल्याने ही अवघड दिसणारी आसने ‘स्थिर’ व ‘तणावमुक्त’ (सुखाची) होऊ लागतात. असे आदर्श आसन करणे एकदम साधत नाही. काही जणांना काही आसने साधतात, तर इतरांना इतर आसने साधतात. वय व शरीरबांधणीनुसार यात फरक पडतो. लहानपणी शिकल्यास योगासने लवकर येतात. म्हणूनच शाळेपासून योगविद्या शिकवणे आवश्यक आहे.

योगासनांचे 6 गट पाडता येतील.
  • उभी आसने
  • बैठी आसने
  • पाठीवर झोपून करायची आसने
  • पोटावर झोपून करायची आसने
  • खाली डोके वर पाय अशी अवस्था
  • पोटाची आसने/क्रिया

या 5-6 गटांत मिळून शेकडो आसने येतात. मात्र त्यातली निवडक आसने प्रचलित आहेत. सर्व आसने करणे एखाद्यालाच शक्य होते. ही सर्व आसने शरीर सर्वांगाने लवचीक व सुदृढ व्हावे म्हणून उपयोगी आहेत. प्राचीन काळात अनेक योगी (हठयोगी) स्त्री-पुरुषांनी अनेकविध आसने शोधली.

नाशिकच्या कुंभमेळयातले फोटो किंवा टी.व्ही दृश्ये आपण पाहिली असतील. देशातले शेकडो-हजारो साधू-बैरागी कुंभमेळयास जमतात. तासन् तास योगासने करण्याची त्यांची शक्ती व साधना अचंबित करते. एका पायावर उभे राहणे (एकपादासन), शीर्षासन (खाली डोके वर पाय), पद्मासन (बैठक) आदि आसने लीलया ते तासन् तास ठेवू शकतात. असा हठयोग सामान्य माणसाला साधणे अवघड आहे. सामान्य व्यक्तीकडून तशी अपेक्षाही नसते. आरोग्यासाठी योग एवढेच आपले इथे उद्दिष्ट आहे.

वरील पाच गटांतील विविध आसने आपल्याला योगशिक्षकाकडूनच शिकावी लागतील. आपल्या कुवतीनुसार योग्य ती आसने आणि क्रम शिकायचे असतात. तक्त्यात योगासनांची गटवारी दिली आहे. ही वर्गवारी केवळ माहीतीसाठी आहे.