काही सूक्ष्मजंतूंमुळे कातडीचा दाह होतो, पुरळ उठतात आणि खाज सुटते. यावर वरीलप्रमाणे स्वच्छता करून जंतुनाशक मलम लावावे. पोटातून कोझाल किंवा डॉक्सीच्या गोळया घेतल्याने लवकर आराम पडतो.
कडुनिंबतेल हे ही उत्तम जंतुनाशक आहे.
पायाला भेगा पडणे (विशेषत: उतारवयात) हे उष्ण कोरडया हवामानात सर्रास आढळणारे दुखणे आहे. अनवाणी किंवा नुसत्या चपला घालून वावरल्याने पायावर घर्षणाचा, कोरडया वातावरणाचा व धुळीचा परिणाम होऊन भेगा पडू शकतात. बुटांच्या सतत वापराने भेगांचे प्रमाण आपोआप कमी होते.
भेगा पडल्यावर तात्पुरता आराम म्हणून रोज रात्री पाय गरम पाण्यात 5 मिनिटे बुडवून ठेवावेत. यानंतर स्वच्छ धुऊन खोबरेल तेल किंवा आमसूल तेल लावावे. भेगा होऊ नयेत म्हणून बूट वापरावेत. बुटांनी पायाचा कोरडेपणा कमी होतो व त्वचा चांगली राहते.