जननसंस्थेत ठिकठिकाणी मांसल गाठी तयार होऊ शकतात. योनिद्वार, योनिमार्ग, गर्भाशय, बीजनलिका, बीजांडे यापैकी कोठेही या गाठी होऊ शकतात. सर्व गाठींची तपासणी ‘आतूनच’ करावी लागते. सामान्यपणे तीन-चार प्रकार नेहमी आढळणारे आणि महत्त्वाचे आहेत : (1) गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग (2) गर्भाशयाच्या साध्या व कर्करोगाच्या गाठी (3) बीजांडाच्या साध्या गाठी (4) बीजांडाचे कर्करोग. (5) गर्भाशयाच्या आतील अस्तराचा कर्करोग
भारतातील स्त्रियांच्या कर्करोगांत प्रमुख कर्करोग हा गर्भाशयाचा आहे. सहसा हा आजार जननक्षम आणि तरुण-मध्यम वयात येतो. सतत बाळंतपणे, लिंगसांसर्गिक आजार, अस्वच्छता, अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध या काही बाबी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी जास्त निगडित आहेत. म्हणजेच अशा स्त्रियांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
पाळीच्या चक्रात अचानक झालेला बदल, अंगावर पांढरे/लाल किंवा दुर्गंधीयुक्त स्राव जाणे, लैंगिक संबंधांनंतर लाल अंगावर जाणे, लघवी किंवा संडासच्या भावनेत झालेले बदल, मासिक पाळी बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्राव सुरु होणे यासारखी लक्षणे गर्भाशयाच्या कर्करोगात दिसतात.
कर्करोग झालेल्या सुमारे 70% स्त्रियांमध्ये ह्यूमन पॅपिलेमा व्हायरस या विषाणूची लागण झालेली सापडते. हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. जितक्या जास्त व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध असतील तितकी याची शक्यता वाढते.
याबरोबरच धूम्रपान, एच.आय.व्ही. ची लागण, क्लॅमिडिया जंतुदोष, काही हार्मोन्स उदा. गर्भनिरोधक गोळयांचा दीर्घकाळ वापर अशी काही इतर कारणेही दिसून येतात.
स्त्रियांच्या बाबतीत हा अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. हा वेगाने वाढतो व लवकर हाताबाहेर जातो. सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडाला खरबरीतपणा येतो. नंतर फ्लॉवरच्या आकाराची गाठ होते. त्यानंतर गाठीची झपाटयाने वाढ व प्रसार होतो.
याची प्रमुख लक्षणे म्हणजे चाळीशीनंतर पाळीशी संबंधित नसलेला अवेळी रक्तस्राव. लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव हे देखील लक्षण असू शकते.
पॅप तपासणी शिबिरामध्ये साधारणपणे 1 टक्का नमुने कर्करोग सूचक आढळतात. यानंतर सरासरी 15 वर्षांनी पुढे कर्करोग होतो असे दिसते. म्हणजेच आपल्याला पॅप तपासणीनंतर उपचारासाठी चांगला वेळ मिळतो. अर्थात 15 वर्षे थांबायचे नसते. प्रगत देशांमध्ये या तपासणीने 80% कर्करोग वाढण्याआधीच शोधले जातात आणि या आजारामुळे मृत्यू येण्याचे प्रमाण 60% कमी झाले आहे.
पॅप टेस्ट बरीच भरवशाची आहे, मात्र 15% सदोष नमुने मुळात सदोष नसतात. त्यामुळे पक्के निदान आवश्यक असते. तसेच कर्करोगाची प्राथमिक अवस्था असून पॅप टेस्टमध्ये दोष कळला नाही असेही होऊ शकते. म्हणून दरवर्षी पॅप तपासणी करणे चांगले.
पॅप तपासणी तंत्रात अनेक सुधारणा झालेल्या आहेत. याशिवाय इतरही रोगनिदान तंत्रे विकसित झालेली आहेत.
2. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस टेस्ट- ही रक्त तपासणी आहे. सुमारे 70% कर्करोगसंभव स्त्रियांमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते.
3. कर्करोग वाढलेल्या स्त्रियांना स्कॅन, इत्यादी अनेक तपासण्या कराव्या लागतात. यामुळे कर्करोगाची वाढ व प्रकार कळून येतो.
भरपूर भाज्या व फळे यांचा आहारात समावेश असणे व पपई, लिंबू यांचा वापर, जीवनसत्त्व अ, ब (फोलिक ऍसिड) क, माशाचे तेल हे गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी मदत करतात.
हल्ली एच.पी.व्ही वॅक्सीन मिळते. सर्व मुलींमध्ये 6 वर्ष वयानंतर ते लैंगिक संबंध सुरु होण्याआधीच्या वयापर्यंत ही लस टोचणी केल्यास एच.पी.व्ही संसर्ग व कर्करोग टाळता येऊ शकेल.
पॅप टेस्ट निदानात कर्करोगाची सूचना असल्यास छोटया शस्त्रक्रियेने काम होऊ शकते. यासाठी अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. क्रायोसर्जरी, लेझरने दहन, साधी शस्त्रक्रिया यापैकी उपलब्ध असेल त्या उपचाराने पुढचा सर्व त्रास टाळता येतो.
काही स्त्रियांच्या बाबतीत गर्भपिशवी काढून टाकण्याचा विचार केला जातो. विशेषत: उतारवयात हा पर्याय वापरला जातो.
एकदा निदान झाल्यावर उपचार गुंतागुंतीचे आहेत. आजार किती लवकर लक्षात आला/निदान झाले यावर उपचार ठरतात. यात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, किरणोपचार (रेडियेशन) व औषध (किमोथेरपी) यांचा समावेश असतो. लवकर निदान झाल्यावर संपूर्ण उपचार घेतल्यावर जीव वाचू शकतो.
भारतात गर्भाशयमुखाचा कर्करोग स्त्रियांसाठी फार महत्त्वाचा आहे. गर्भाशयाचे लांबट तोंड योनीमार्गात उघडते. आपल्या हाताच्या बोटांनी त्याला स्पर्श करता येतो. हा कर्करोग लवकर शोधता येतो आणि वेळीच उपचाराने तो बराही होऊ शकतो. भारतात हा कर्करोग लैंगिक संसर्गामुळे आणि जास्त बाळंतपणांमुळे होतो असे दिसते. 35-45 वयोगटात हा कर्करोग जास्त आढळतो. आता यासाठी एक प्रतिबंधक लसही आहे.