विदर्भ, मराठवाडा भागात उन्हाळयात उष्माघाताचे बळी झाल्याचे आपण ऐकतो. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात. सर्वसाधारणपणे बाहेर उन्हात काम करणा-यांना उष्माघात होतो. सुरुवातीस चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था, इत्यादी परिणाम दिसतात. याबरोबर खूप तहान, घाम न येणे हेही दिसून येते. यानंतर झटके येणे, वेगाने चालणारी नाडी, दम लागणे, इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात. हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. उष्माघातात खूप ताप, घाम न येणे, शोष, चक्कर, लघवी न होणे, बेशुध्दी व शेवटी मृत्यू असे परिणाम दिसतात. यातली मुख्य रोगप्रक्रिया म्हणजे अतिउष्णतेने शरीरातल्या प्रथिनांवर दुष्परिणाम होणे व पेशींमधली जीवनप्रक्रिया थांबणे. शरीरातल्या सर्व अवयवांत पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा ‘मेंदूसूज’ हे असते.
महाराष्ट्रात उन्हाळयात अनेक ठिकाणी कमाल तापमान 420C च्या वरती जाते. (400C तपमानाचे अंघोळीचे पाणी आपल्याला चांगलेच गरम लागते) काही ठिकाणी तपमान 490 पर्यंत गेल्याची नोंद आहे.
या काळात पंखे, कुलर्स निरुपयोगी ठरतात. थंड पाण्याची चादर बरीच उपयोगी असते.
मुख्य म्हणजे या काळात उन्हातान्हातले काम बंद ठेवून सावलीत थांबणे आवश्यक आहे.
लवकरात लवकर शरीरातली जादा उष्णता काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हेच महत्त्वाचे प्रथमोपचार आहेत.
रुग्णास सावलीत नेणे, ओली चादर अंगावर टाकून वारा घालणे हे ताबडतोब करण्याचे उपाय आहेत. शक्य असल्यास रुग्णास थंडगार पाण्यात थोडा वेळ ठेवावे. (अर्थात डोके बुडवू नये) व तापमान थोडे उतरल्यावर बाहेर काढावे. याबरोबरच हातपाय चोळावेत म्हणजे रक्ताभिसरण सुधारेल. लवकरात लवकर रुग्णालयात न्या म्हणजे औषधोपचार चालू करता येईल.
एवढे झाले तरी निम्मे-अधिक रुग्ण दगावतात.
विजेचा धक्का (शॉक) हा एक गंभीर अपघात आहे. वीज पडणे आणि घरगुती विजेचा धक्का हे दोन प्रकार आहेत. वीज पडून झालेल्या अपघातात सहसा ती व्यक्ती वाचत नाही. घरगुती विजेमुळे मात्र कमी अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात.
विद्युत धक्क्याचे परिणाम दोन प्रकारे होतात. भाजणे हा एक प्रकार आहे. याचबरोबर चेतासंस्था, स्नायू, हृदय यांवर विद्युत प्रवाहाचा परिणाम होऊ शकतो . विद्युत धक्क्यामुळे हृदयाची गती अनियमित होण्याचा किंवा ते बंद पडण्याचा संभव असतो. स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे मोठी हालचाल (दूर फेकले जाणे, खाली पडणे, इ.) घडून येते. धक्का मोठा असल्यास बेशुध्दी किंवा मृत्यू येतो.
विजेच्या संपर्कातून त्या व्यक्तीला लाकडाच्या सहाय्याने दूर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. संबंधित स्विच बंद करणे शक्य असल्यास जास्त चांगले.