skin iconत्वचाविकार
व्रण

ulcer व्रण म्हणजे जुनी जखम. जखम झाल्यानंतर ती एक तर आठवडयाभरात भरून येते, नाही तर चिघळत राहते. काही वेळा पुळी फुटून त्याचा व्रण होतो. अशा चिघळलेल्या व लवकर ब-या न होणा-या जखमेला आपण व्रण म्हणू या. वेगवेगळया जिल्ह्यात याला वेगवेगळी नावे आहेत. (दुख, फिसके, इ.)

अशा व्रणामध्ये ब-याच वेळा पू होतो, लालसर मांसल भाग दिसतो, वेदनाही आढळते. यातला लालसर गुळगुळीत भाग हा जखम सांधणारा घटक असतो. तोच पुढे आकसून घट्ट होतो. त्याला आपण जखमेची खूण असे म्हणतो.

व्रण झाल्यानंतर त्या भागाशी संबंधित रसग्रंथींना सूज येऊ शकते. यालाच आपण ‘अवधाण’ म्हणतो. व्रण लहान असला तरी कधीकधी ‘अवधाण’ मोठे असते व खूप दुखते.

उपचार
  • ज्या व्रणातून पू येतो त्यावर नुसती वरवर मलमपट्टी करून फार उपयोग नसतो. अशी जखम दिवसातून दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. यानंतर स्वच्छ कापसाने, फडक्याने पुसून कोरडी करावी. अशी दूषित जखम धुण्यासाठी हायड्रोजन द्रवाचा वापर करावा. जखम धुण्यासाठी त्रिफळा काढा अत्यंत उपयुक्त आहे.
  • जखमेवर पट्टी बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जखम दूषित न होऊ देणे व लावलेले औषध एकत्र ठेवणे. चिकटपट्टी किंवा बँडेज पट्टीच्या मदतीने हे करता येते. जखम चिघळू नये, पू कमी व्हावा, जखम लवकर भरून यावी यासाठी जंतुनाशक मलम उपयुक्त असते. सोफ्रा (सोफ्रामायसिन) मलम नेहमी वापरले जाते. याचा गुण चांगला येतो.
  • एक चांगला घरगुती उपाय म्हणजे कोरफड कापून तिचा गर जखमेला लावून पट्टी करणे. (किंवा कोरफडीची साल गरासहित बांधणे.) यात जखम भरून येण्यासाठी खास गुण असावा. या उपायांनी ब-याच दिवसांच्या जखमाही लवकर ब-या होतात असा अनुभव आहे.
  • जखम चिघळून पू होऊन अवधाण आणि ताप आला असेल तर पोटातून जंतुविरोधी औषधे (उदा. डॉक्सी, कोझाल, इ. द्यावीत. तसेच तापासाठी ऍस्पिरिन, पॅमाल द्यावे.)
  • आपल्या वातावरणात, धुळीत धनुर्वाताचे जंतू नेहमीच असतात. पण धनुर्वात प्रत्येकाला किंवा प्रत्येक जखमेतून होत नसतो. पूर्वी ही लस घेतलेली नसेल तर धनुर्वाताची लस यासाठी टोचून घ्यावी. याचा दुसरा डोस महिन्याने घ्यावा म्हणजे खरा उपयोग होतो.

    उपलब्ध असेल तर हैड्रोजन पेरॉक्साईडच्या पाण्याने जखम रोज धुवावी. हे हैड्रोजन पेरॉक्साईड औषध स्वस्त व गुणकारी आहे. यात भरपूर प्राणवायू असतो. या प्राणवायूमुळे धनुर्वाताचे जंतू मरतात.

  • उघडया जखमेवर माशा अंडी घालतात. तीन-चार दिवसांत या अंडयांपासून अळया तयार होतात. जखमेतील पेशी खाऊन त्या मोठया होतात. या अळयांमुळे खूप वेदना व त्रास होतो. या अळया जखमेतून आत खोलवर घुसण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जखमा लवकर ब-या होत नाहीत. याला खूप नेटाने व काळजीपूर्वक उपचार करावे लागतात. या अळया चिमटयाने एकेक काढून टाकाव्या लागतात. आत घुसलेल्या अळया बाहेर काढण्यासाठी ‘ईथर’ नावाच्या औषधाचा किंवा निलगिरी तेलाचा किंवा कारल्याच्या पानाच्या रसाचा वापर करावा. औषध जखमेवर थोडेफार शिंपडल्यावर अळया बाहेर पडतात व त्यांची हालचाल मंदावते. यानंतर अळया काढून टाकायला सोपे जाते. जखम स्वच्छ ठेवणे, पट्टी करणे पू टाळणे, धनुर्वात होऊ न देणे हेच महत्त्वाचे आहे.
  • जखम शिवण्यासारखी मोठी असेल तर ती ताजी असतानाच स्वच्छ करून शिवलेली बरी. यामुळे जखम लवकर भरून येते आणि पुढचा त्रास कमी होतो. चेह-यावरच्या जखमा अर्धा सेंटीमीटर पेक्षा मोठया असतील तर टाके घालावेत किंवा चिकटपट्टीने सांधाव्यात. असे केल्याने जखमेची मोठी खूण राहत नाही.
  • ही सर्व काळजी घेऊनही काही जखमा लवकर ब-या होत नाहीत. अशावेळी मधुमेह, कुष्ठरोग यांपैकी आजार आहेत की काय ह्यासाठी तपासणी करावी लागेल. मधुमेहासाठी लघवीत साखर असल्या-नसल्याची साधी तपासणी करता येते.
होमिओपथी निवड

नायट्रिक ऍसिड, एपिस, आर्निका, आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, कल्केरिया कार्ब,कॉस्टिकम, हेपार सल्फ, लॅकेसिस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

कुरूप

काटा मोडून कुरूप झाले असेल तर ते कापून काढावे लागते. दुकानात कुरूप घालवण्यासाठी खास मलमपट्टया (कॉर्न कॅप) मिळतात त्या वापराव्यात. वारंवार कुरूप होत असल्यास होमिओपथीचे उपचार करावे. आयुर्वेद चिकित्सेत यासाठी ‘दहन’ (कुरूप भाजणे) हा उपाय सुचवतात. यासाठी गुळाचा चटका दिला जातो.

होमिओपथी निवड

कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, सिलिशिया, सल्फर, थूजा

गळू

गळू म्हणजे पू साठणे. बहुधा गळू कातडीत तयार होते. काही जातीच्या सूक्ष्म जिवाणूंमुळे गळवे तयार होतात. गळू तयार होताना सुरुवातीला नुसता लालसरपणा व दुखरेपणा असतो. दोन-तीन दिवसांनंतर ठणकणारी गाठ, सूज तयार होते. त्यावर पांढरेपणा (आतल्या पुवामुळे) दिसतो. हाताच्या बोटांनी चाचपल्यावर ही सूज इतर भागांपेक्षा गरम लागते व बोटांनी दबली जाते. सूजेला घट्टपणा असेल तर गळू अजून पिकलेले नाही असे समजावे. गळवावर पांढरटपणा, मऊपणा असेल तर ते फोडावे.

शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर गळवे होण्याची शक्यता वाढते. कुपोषण किंवा मधुमेह, एड्स यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच या आजारांत गळवे होतात.

गळवावर उपचार
  • गळवाचा निचरा होणे आवश्यक असते. पिकलेले गळू बहुधा आपोआप फुटते व दोन-तीन दिवसांत निचरा होतो. नाही तर इंजेक्शनची जरा जाड (म्हणजे 16 नंबरची) सुई उकळून (निर्जंतुक करून) गळू फोडायला वापरावी. किंवा दाढीचे नवे ब्लेड वापरून गळवावर बारीक छेद घेता येईल. एकदा पू बाहेर पडायला सुरुवात झाल्यावर हळूहळू दाबून निचरा करता येतो.
  • जर गळू कापायचे नसेल तर एक-दोन दिवस गरम पाणी, फडके वगैरेंनी चांगला शेक दिला तर गळू फुटायला मदत होईल.
  • गळू फार मोठे असेल किंवा बोट, चेहरा अशा नाजूक ठिकाणी असेल तर भूल देऊन फोडावे लागते.
  • गळू फोडल्यानंतर शक्य तितका पू बाहेर काढावा यानंतर निर्जंतुक स्वच्छ फडक्याने किंवा कापसाने पट्टी बांधावी. पट्टी भिजल्यावर परत बदलावी.
  • दुखणे कमी होण्यासाठी ऍस्पिरिनची गोळी घ्यावी.
  • गळवातील जिवाणूंचा शरीरात प्रसार होऊ नये आणि सूज मर्यादित राहावी म्हणून जंतुविरोधी गोळयांचा वापर करावा.
  • काहीजण गळवावर जळवा लावून पू काढतात. (मात्र जळवा पू शोषत नाहीत असा काही तज्ज्ञांचा अनुभव आहे)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.