femaleurine system icon स्त्रीजननसंस्था पुरुषजननसंस्था
किशोरवयीन मुलांचे पोषण
किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्त्व व पोषण

M J Phule and D K Karve साधारण 12 ते 18 या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्टया नाजूक काळातून जात असतात. अठरा वर्षांनंतर त्यांना सज्ञान मानले जाते. या वयात त्यांच्यामध्ये लैंगिकदृष्टया बरेच बदल होत असतात. हीच मुले उद्याचे पालक आणि आपल्या देशाचे भावी नागरिक होणार. किशोरवयीन गर्भारपण आणि गर्भपात ही एक कठीण समस्या आहे.

किशोरवयीन मुलांचे पोषण

वाढत्या वयात शरीराला जास्त अन्नाची गरज असते. योग्य पोषण मिळाले तर मुलामुलींची योग्य वाढ होऊन अपेक्षित उंची- वजन आणि स्नायूंची शक्ती प्राप्त होते. अनुकूलता मिळाली तर एका पिढीत हा फरक दिसून येतो. हल्ली पालकांपेक्षा त्यांची मुले जास्त उंच आणि वजनदार होतात. याचे कारण पूर्वीपेक्षा हल्ली जास्त पोषक अन्न मिळते.

स्त्रियांना समाजात असलेल्या दुय्यम स्थानामुळे मुलींना कुपोषणाचा धोका जास्त असतो. त्यांना कमी आणि हलके अन्न दिले जाते. त्याच्याकडून काम मात्र जास्त करून घेतले जाते. त्यात दर महिन्याला पाळीच्या रक्तस्रावामुळे त्यांना रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. (तसेच मुलांनादेखील रक्तपांढरी होऊ शकते.) वजन, उंची आणि आरोग्याचे तेज ही चांगल्या आरोग्याची लक्षणे आहेत. या वयात सकस अन्न मिळणे, जरूर पडल्यास लोहाच्या पूरक गोळया देणे महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या लाडांमुळे या वयात ब-याचदा बाजारातील निकृष्ट जिन्नस खाण्याची सवय काही मुलांना लागते. पण लहान मुलांइतकेच या वयातही सकस अन्नाला महत्त्व आहे.

Blood White Disorder
Whitish Days
खेळ आणि व्यायाम

Girls Cycling या वयातल्या मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे. यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आरोग्य सुधारते. मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाचे आहेत. मुले खेळ लवकर शिकतात आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवतात. योगासनांचादेखील पुढच्या आयुष्यावर चांगलाच परिणाम होतो. खेळ आणि व्यायामामुळे त्यांना पुढील आयुष्यातले ताणतणाव सहन करण्याची ताकद येते.

किशोर वयातील आरोग्य समस्या

कुपोषण व रक्तपांढरी : कुपोषण आणि जास्त काम यांमुळे मुलींमध्ये रक्तपांढरी आढळते.

अपु-या माहितीमुळे एच.आय.व्ही. आणि एड्सची लागण होण्याचा धोका या गटाला अधिक आहे. किशोरवयीन मुलांनादेखील लिंग सांसर्गिक रोगांची लागण होऊ शकते.

लहान वयात लग्न झाल्यामुळे आई आणि मूल दोघांच्याही आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. आई अधिक अशक्त होते, रक्तपांढरीचा त्रास सुरु होतो आणि लहान वयात लैंगिक संबंध आल्यामुळे, लैंगिक आजार होण्याचा धोकाही वाढतो. बाळालाही रक्तपांढरी होते, ते कमी वजनाचे होते आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते.

लहान वयातल्या लग्नामुळे मुलीला मानसिक आणि सामाजिक त्रासही सोसावा लागतो.

लिंगसांसर्गिक आजार

आपल्या लैंगिकतेचा शोध घेण्याची इच्छा या वयात जास्त असते. मात्र समाजात किशोरवयीन मुलांना लैंगिकतेबद्दल बोलणेदेखील अवघड होते. हे बदलले पाहिजे. कारण एका बाजूने लहान वयात लग्न करायचे दडपण मुलींवर आणले जाते. पण मुलींनी लैंगिकतेविषयी थोडी जरी उत्सुकता दाखविली तर मात्र ते अतिशय लाजिरवाणे आणि वाईट समजले जाते.

पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेण्याचे काही मार्ग धोकादायक ठरू शकतात. उदाहरणार्थ, वेश्येबरोबर लैंगिक संबंध, तेही निरोध न वापरता ठेवणे धोकादायक असते. मुलींनी प्रौढ माणसाबरोबर लैंगिक संबंध ठेवले तर संसर्ग होण्याची आणि गरोदर राहण्याची जास्त भीती असते. ही भीती मुलांबरोबर संबंध ठेवले तरी काही प्रमाणात असतेच. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे आजार आपण पुढील घटकात पाहणार आहोत. निरोधचा योग्य वापर केल्यास हे आजार टाळता येतात.

लहान वयात लग्न आणि गर्भारपण

Wedding Early Age आपल्या समाजात, गावांमध्ये अजूनही कमी वयात विवाहाची रीत आहे. मुलीचे संरक्षण करण्यासाठी आणि कुटुंबाचे नाव वाईट होऊ नये म्हणून पूर्वी समाजाने ही पध्दत मान्य केली होती. पण बालविवाह हे या समस्यांचे उत्तर नाही. या पध्दतीमुळे मुलींचे बालपण हिरावून घेतले जाते. त्यांच्यावर न झेपणा-या वैवाहिक जबाबदा-या पडतात, गरोदरपण, शारीरिक इजा व इतर घातक अनुभवांना सामोरे जावे लागते. तिची पुरेशी शारीरिक, मानसिक तयारी नसतानाच तिला बाई म्हणून कामाला लावतात.

शिक्षण, विकास, गर्भप्रतिबंधक साधने व सुरक्षित गर्भपात या सर्वांमुळे बालविवाह पूर्णपणे गैरलागू झाले आहेत. ही घातक सामाजिक कुप्रथा तत्काळ थांबवली पाहिजे.

किशोरवयातील लैंगिक अत्याचार

मुलींवर (आणि कधीकधी मुलांवरही) लैंगिक अत्याचार होत असतात. अत्याचार करणारी व्यक्ती कधी कुटुंबातली असते तर कधी बाहेरची असते. चिडवण्यापासून ते बलात्कार व खून अशा लैंगिक अत्याचारांच्या अनेक पातळया आहेत. लैंगिक शोषण हा एक गुन्हा आहे आणि आपण याविरुध्द आवाज उठवला पाहिजे.

हा अत्याचार वैयक्तिक आणि सामाजिक मानसिकतेला हानीकारक असतो. त्यामुळे पुढच्या आयुष्यातील लैंगिक जीवनावर दुष्परिणाम होतो, चुकीचा दृष्टिकोन तयार होतो आणि समाजातदेखील हिंसकता वाढते.

कोणत्याही स्त्रीच्या मनाविरुध्द लैंगिक जबरदस्ती करणे गुन्हा आहे. अगदी ती लग्नाची बायको असली तरी हा मुद्दा लागू पडतो. तसेच अठरा वर्षांखालील कोणत्याही स्त्रीशी, तिची संमती असली तरी, लैंगिक संबंध ठेवणे हा एक गुन्हा आहे. पण हा कायदा क्वचितच वापरला जातो.

मुलांशी योग्यवेळी बोलून त्यांना याची माहिती देणे, याच्या विरुध्द जागृती करणे आणि धीटपणे न्याय मागणे हे आपण त्यांना शिकवू शकतो. यात महिला गट आणि तरुणांच्या गटांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. यासंबंधी मुलामुलींना फोनवर मदत मागण्यासाठी प्रत्येक शहरात (Child helpline) काही फोन नंबर्स उपलब्ध आहेत.

मानसिक आरोग्य आणि दृष्टिकोन

Childhood Strikes या वयात जे काही बरे-वाईट अनुभव येतात त्यामुळे मुलांचे वय व व्यक्तिमत्त्व घडत असते. म्हणून या वेळेला कुटुंब, शाळा आणि समाज यांनी मुलांमधील चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. एखादी छोटीशी मदतदेखील बरेच काही साध्य करू शकते.

उदाहरणार्थ, एका मंडळाने एका गावात मुलींसाठी दोन सायकली दिल्या. त्यांनी आळीपाळीने या वापरायच्या होत्या. प्रत्येक गावातल्या मुली दोन महिने सायकल चालवायला शिकायच्या आणि मग त्या दुस-या गावात पाठवून द्यायच्या. या एवढयाशा मदतीने त्या गावातल्या पुष्कळ मुली सायकल चालवायला तर शिकल्याच पण त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. त्या एकेकटया फिरायला शिकल्या. मग त्यांनी गट करुन पैसे जमवून एक सायकल घ्यायची ठरवली. काही मुलींनी जवळच्या गावी मोठया शाळेत पुढच्या शिक्षणाला जाण्याचे ठरवले. एवढया एका गोष्टीने त्यांच्या जीवनात किती फरक पडू शकतो हे बघायलाच पाहिजे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.