या सर्व विविध घटकांचा विचार करून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे मॉडेल्स (प्रकार) दिलेले आहेत.
गरीब कुटुंबांना परवडेल व ग्रामीण नागरिकांकडून सहज बनविता येईल असा हा ड्रम पध्दतीचा संडास आहे. यामध्ये रस्त्याच्या कामातला डांबराचा रिकामा ड्रम संडासच्या टाकीसाठी वापरला जातो. हा ड्रम जमिनीच्या आत उपडा गाडावा. हे करण्यापूर्वी ड्रमला गोल छिद्रे पाडावीत व विष्ठा वाहून जाण्याकरिता जोडलेला पाईप ड्रमला जोडावीत. बैठकीकरिता बाजूला एक प्लॅटफॉर्म तयार करावा लागतो. यामध्ये भिंतीला लावण्याच्या गुळगुळीत टाईल्सचा उपयोग करून मलपात्र तयार केले जाते. हा संडास अतिशय कमी किंमतीत सहजपणे निर्माण होऊ शकतो. या संडासला लागणा-या साहित्याची यादी –
1. डांबराचा रिकामा ड्रम 1 नग.
2. मलपात्र तयार करण्यासाठी गुळगुळीत टाईल्स 8″x 8″ 4 नग.
3. विटा 200 नग
4. सिमेंट अर्धी बॅग
5. रेती 10 घनफूट
6. मजुरी – 1 गवंडी दिवस
व्हीआयपी मधील व्ही म्हणजे व्हेंटिलेटेड. म्हणजे सुधारित दुर्गंधमुक्त खड्डा संडास. यात थोडी सुधारणा करून दुर्गंध निघून जाण्यासाठी व्हेंट पाईप लावलेला असतो.
व्हीआयपी संडासला थोडा जास्त खर्च येतो. आवश्यक वाटल्यास यात कोंबडा किंवा ट्रॅप वापरता येतो.
जिथे पाण्याची सोय होते तेथे हा संडास उपयुक्त आहे. यात आडोसा, खड्डा, व्हेंट पाईप हे सर्व असणारच. शिवाय यात कोंबडा किंवा ट्रॅप वापरला जातो.
मलपात्र आणि ट्रॅपचे आकारमान छोटेखानी असते. 1-2 लिटर पाणी ओतून साफ होईल असा ट्रॅप बनवलेला असतो.
ट्रॅपमध्ये पाणी शिल्लक असल्याने किडे, दुर्गंध यापासून हा संडास पूर्ण मुक्त असतो. यात अर्थातच कागदाचे बोळे, कपडा, सॅनिटरी पॅड (मासिक पाळीची घडी) हे काहीही टाकता येत नाही.
अनेक शहरांमध्ये सामान्यपणे जे संडास असतात त्यात 5-7 लिटर पाणी फ्लशसाठी लागते. हा पाण्याचा अपव्यय आहे. शहरातली मल: निसारण व्यवस्था जास्त पाण्यावर अवलंबून असते. मात्र पाणी बचत करण्यासाठी अनेक उपाय करणे आवश्यक आहे. लघवी केल्यानंतर 5-6 लिटर पाणी सांडून देणे याचा आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे.
या 3 प्रकारच्या संडासांचे अनेक उपप्रकार आहेत. त्यांचा गरजेनुसार वापर करता येईल. अनेक शहरांमध्ये याबद्दल मार्गदर्शन करणा-या संस्था आहेत. त्यांच्याकडे प्रशिक्षण आणि साधने मिळू शकतील.
पाण्याची बचत करण्यासाठी झडपेचा संडास उपयुक्त आहे. यात जलबंद S ट्रॅप (कोंबडा) नसतो. मलपात्रातून सरळ उतरणा-या पाईपमधून मैला खड्डयात पडतो. या पाईपच्या शेवटी झडप असते, ती तात्पुरती उघडते व नंतर मिटते. या झडपेने माशा व दुर्गंध यांचा संडासमध्ये त्रास होत नाही. मलविसर्जनानंतर वेगळे पाणी टाकावे लागत नाही. स्वच्छतेसाठी 1-2 लिटर पाणी वापरतात तेवढे पुरते. या पध्दतीच्या संडासामध्ये पाण्याचा वापर खूपच कमी असल्याने विष्टेचे विघटन कमी काळात पूर्ण होते.
संडासमध्ये कमीत कमी पाणी वापरुन स्वच्छता करण्यासाठी या सूचनांचा विचार करा.
मलपात्राचा उतार व गुळगुळीतपणा जास्त असला की विष्ठा लवकर घसरुन जाते. यासाठी निदान 40 अंश उतार असलेले व लहान भांडे चांगले.
कोंबडा पाईप (जलबंद) 75 से.मी. ऐवजी 20 सेंमी ठेवला तर 5-7 लिटर ऐवजी 2 लिटर पाणी सफाईसाठी पुरते. जलबंद S टाईपचा ठेवण्याऐवजी J (इंग्रजी जे) किंवा P (इंग्रजी पी) आकाराचा चालतो. यात कमी पाणी लागते.
मलपात्राच्या नळीच्या शेवटी जलबंदाऐवजी झडप वापरल्यास केवळ 1 लिटर पाणी पुरते. ही झडप स्टेनलेस स्टीलची असते. बिजागिरी गंजू नये म्हणून पितळ व तांब्याची बनवली जाते.
पूर्वी संडास बांधताना पावलांसाठी उंचवटे बनवले जात असत. ही पध्दत स्वच्छतेसाठी आणि मुलांना गैरसोयीची म्हणून बंद केली आहे.