ब-याच जणांच्या दातांवर एक प्रकारचे कठीण पिवळे कीटण चढते. यामुळे हिरडया व दात यांमध्ये फट तयार होते. अन्नकण यात अडकून कुजतात व दुर्गंध येतो, कीटणामुळे हिरडयांची हानी होते. यामुळे दातांचा मुळाकडचा भाग उघडा पडत जातो. या सर्व घटनाक्रमामुळे हिरडयातून पू व रक्त येते. यामुळे हळूहळू दात दुबळे होऊन पडतात. दातांवर कीटण न चढेल इतकी स्वच्छता रोज पाळणे आवश्यक आहे. ब्रशचा वापर करताना हा उद्देश लक्षात ठेवावा. दातांची योग्य निगा ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे.
नायट्रिक ऍसिड, एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर
वृध्दापकाळात एक महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न म्हणजे दात पडण्याचा. बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20 वर्षात बहुतेक सर्व दात पडून जातात. एकदा अन्न चावण्याची क्रिया बंद पडली की त्याचा पोषणावर वाईट परिणाम होतो. यामुळे माणूस खंगतो; आणि यामुळे 5-10 वर्षांनी तरी आयुष्य कमी होत असावे. दात गेल्याने चेहराही एकदम वेगळा दिसायला लागतो. यासाठी वेळीच कवळी बसवून घ्यावी.
कृत्रिम दात गरजेप्रमाणे दोन-चार दातांऐवजी किंवा सर्व दातांऐवजी बसवता येतात. सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय किंवा खाजगी दंतवैद्याकडे हे काम होते. एकूण लाभाच्या मानाने यास खर्च फारसा नसतो.
कवळी बसवायची असेल तर एक काळजी घेणे आवश्यक आहे. कवळी बसवण्यासाठी दात धरणा-या जबडयांच्या हाडांची मूळ अस्थिरेषा टिकून राहिली पाहिजे. पण दात पडण्याच्या नैसर्गिक क्रियेस 10-20 वर्षे लागू शकतात. असे झाले तर सुरुवातीला पडलेल्या दातांच्या जागचे हाड इतर जागांच्या मानाने जास्त झिजते. यामुळे अस्थिरेषा वेडीवाकडी आणि उंचसखल होते. अशा अस्थिरेषेवर कवळी बसू शकत नाही. म्हणून दात पडायला आले की 5-6 महिन्यांत सर्वच दात काढून कवळी बसवणे चांगले. मात्र 2-4 दात पडले असतील आणि उरलेले सर्व चांगले असतील तर तेवढयापुरतेच कृत्रिम दात वापरता येतात. यामुळे एकूण झीजही टळते. काही वृध्दांना कवळी 10-20 वर्षेही चांगली चालते. हळूहळू हाडांच्या झिजेमुळे कवळीची बैठक थोडी बदलू शकते. म्हातारपणासाठी कृत्रिम दात हे एक फार मोठे वरदान आहे. सर्व वृध्दांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे.
खालच्या किंवा वरच्या जबडयाचा अस्थिभंग झाल्यास तिथे वेदना तर होतेच. याचबरोबर जिथे तुटले असेल तिथले दात खालीवर पातळीवर आढळतात. जबडा मिटता येत नाही हेही याचे एक लक्षण असते. असे रुग्ण ताबडतोब दंतवैद्याकडे पाठवावेत. अशा वेळी डॉक्टर तारेने जबडा पक्का करतात. यानंतर सुमारे 6 आठवडे रुग्णाला तोंड उघडता येत नाही. केवल चूळ भरणे व पातळ अन्न पिणे एवढेच शक्य होते. बोलणे देखील खुणेनेच करावे लागते.
तारेने जबडा बांधायला पर्यायी पध्दत म्हणजे शस्त्रक्रिया करून स्क्रूने जबडयांचा भाग फिट करणे. यासाठी योग्य निर्णय दंतवैद्यच घेतील.