Children Health Icon नवजात बालकांची निगा बालकाची वाढ आणि विकास
नवजात बालकांची निगा

Krushna बाळंतपण व त्यानंतर 6 आठवडे आई आणि बाळाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. जन्मलेल्या बाळाची काळजी नीट न घेतल्याने अनेक अर्भकमृत्यू होतात. आपल्या देशात मातामृत्यूही खूप होतात. दर हजार गरोदर-बाळंतपणात एक स्त्री दगावते. इतर अनेक देशांत हे प्रमाण ह्याच्या दशांश आहे. या प्रकरणात आपण नवजात बाळाची काळजी हा महत्त्वाचा विषय शिकणार आहोत.

स्तनपान
स्तनपान म्हणजे बाळासाठी अमृत

जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे बाळाचे पोषण तर होतेच पण त्याचबरोबर त्याची रोगप्रतिबंधक शक्तीही वाढते. मातेचे पोट लवकर कमी होते आणि तिच्या अंगावर जाणे लवकर कमी होते. जास्त वेळा अंगावर पाजल्याने आईच्या दुधाचे प्रमाण वाढते. अंगावर पिताना आईच्या कुशीची बाळाला उबही मिळते. लवकर स्तनपानाचा सल्ला प्रत्येक मातेला द्यायलाच हवा.

Breast Feeding
Breast

आईचे दूध हे तिच्या शरीरात गरोदरपणातच तयार होते. बाळंतीण झाल्यानंतर 2-3 दिवस ते चिकासारखे घट्ट असते. बाळाला हे पहिले चिकाचे दूध मिळणे अत्यंत गरजेचं आहे कारण यातूनच बाळाला पहिली रोगप्रतिबंधक शक्ती मिळते.

आईच्या दुधात आवश्यक ती सर्व सत्त्वे असतात. त्यात बाळाला आवश्यक तेवढे पाणीदेखील असते. जास्त वेळा पाजल्याने जास्त दूध निर्माण होते. जुलाब आणि न्यूमोनियासारख्या रोगांपासून यामुळे बाळाचे सहज संरक्षण होते.

अंगावर पिणारी बाळे चोवीस तासात साधारण आठ वेळा दूध पितात. ज्यांना दूध पोटभर मिळतं ती बाळे सलग दोन तीन तास झोपतात. त्यांचे वजनही नियमितपणे वाढते. मुलींनादेखील अंगावर वेळोवेळी पाजले जात आहे याची खात्री करावी.

अंगावर पाजल्यामुळे बाईची मासिक पाळी लांबते. अशा त-हेने स्तनपानाने पाळणा लांबवायला मदत होते. (संतती नियमनदेखील आपोआपच होते.) या घटकात आपण संतती नियोजनामध्ये स्तनपानाचे महत्त्व काय ते देखील शिकणार आहोत.

2. स्तनपानाची प्राथमिक तत्त्वे
  • स्तनाच्या बोंडावरच्या चिरा, सूज, दूध बाहेर न पडल्यामुळे स्तन ठणकणे या सगळयांवर वेळीच उपाय करण्यास आपण मदत केली पाहिजे. जर बोंडे आतल्या बाजूला वळलेली असतील तर बाळाला ती नीट चोखता येणार नाहीत. अशी बोंडे वेळीच रोज थोडी ओढून तेल लावून तयार करावीत. ही काळजी गरोदरपणातच घ्यावी हे बरे.
  • मी चांगल्या पध्दतीने पाजू शकते असा आत्मविश्वास आईच्या मनात निर्माण केला पाहिजे. तसेच तिच्या दुधातून बाळाला आवश्यक ती सर्व सत्त्वे मिळतात हे देखील सांगितले पाहिजे. जर दूध येत असेल तर दोन वर्षापर्यंतसुध्दा स्तनपान देणे फायद्याचेच आहे. मूल सहा महिन्याचे झाल्यानंतर इतर पूरक अन्नही चालू करणे आवश्यक आहे.
  • जर आईला एचायवी झाला असेल तर मात्र अंगावर न पाजता बाळाच्या भल्याकरता इतर पध्दतींचा विचार करायला हवा. अशावेळी आपण कुटुंबाला ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला पाहिजे.
3. स्तनपानाची त्रिसूत्री
  • लवकर स्तनपान – बाळ जन्मल्यानंतर अर्धातासात स्तनपान सुरु करावे.
  • याने अनेक लाभ होतात. दूध लवकर सुटते. बाळाला उब मिळते. प्रतिकारशक्ती मिळते.
  • निव्वळ स्तनपान – 6 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त स्तनपान द्यावे.
  • वरचे काहीही देऊ नये, पाणीही नको. याने बाळ निरोगी राहते, त्याचे योग्य पोषण होते.
  • योग्य स्तनपान – स्तनपानाची योग्य पध्दत शिका-शिकवा. हे सोपे पण महत्त्वाचे आहे.
4. स्तनपानासाठी महत्त्वाच्या सूचना

1. आईला स्तनपान देण्यास मदत करा. पहिलटकरणीला तर मदत लागतेच.

2. पाजण्याआधी प्रत्येक वेळी बोंडे कोमट पाण्याने स्वच्छ केली पाहिजेत.

3. बाळाला मांडीवर आडवं ठेवावं. जर आई कुशीवर झोपली असेल तर बाळाला तिच्या बाजूला कुशीत ठेवावे.

4. बोंडांचा मुळापासूनचा भाग धरून तो बाळाच्या तोंडात द्यावा. अशा त-हेने संपूर्ण बोंड बाळाच्या तोंडात जाईल.

5. बाळाचे तोंड आणि संपूर्ण शरीर आईच्या छातीकडे वळलेले असावे. बाळ वेडेवाकडे धरु नये याची काळजी घेतली पाहिजे.

6. बाळाच्या डोक्याला एका हाताने आधार दिला पाहिजे.

7. बाळाने बोंड सोडल्यावर ते बोंड स्वच्छ करायला हवे.

8. एक बाजू पाजून झाल्यावर बाळाला दुस-या बाजूला धरले पाहिजे.

9. बोंडांना चिरा असतील तर त्यांना मालीश करायला आईला मदत केली पाहिजे.

त्यावर हळद आणि साधे गोडेतेल लावावे. यावेळी बोंडावर प्लास्टिकची निपल वापरणे फायदेशीर ठरते.

10.बसलेली बोंडे आपण अलगद हाताने बाहेर ओढावीत. बसलेली किंवा सूज आलेली असताना बोंडावर मऊ रबराचे निपल ठेवून बाळाला पिऊ द्यावे. याने बोंडे बाहेर येण्यासही मदत होते. हे निपल पाजायच्या आधी आणि नंतर स्वच्छ केले पाहिजे.

बाळ एका बाजूला पीत असताना कधीकधी दुस-या स्तनातून दूध गळत रहाते. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.