Health Service आपल्या शासकीय आरोग्यसेवा आरोग्य सेवा
ग्रामीण रुग्णालय

ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात. ही रुग्णालये सरकार चालवते आणि इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतो. हे एका तालुक्यात 1-2 ठिकाणी असते. (तुमच्या तालुक्यात ते कुठे आहे ते माहीत आहे काय?)

UP Rural Hospital
External Patient Department

प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात.

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येतात.

ग्रामीण रुग्णालयात ब-याच प्रकारचे उपचार आणि काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. इथे एक बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, एक तज्ज्ञ (शल्यचिकित्सक) शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, आणि एक भूल देणारे डॉक्टर असावे अशी अपेक्षा असते.

External Patient Department
District Health Laboratory

एका सुसज्ज आणि पूर्ण कर्मचारीवर्ग असणा-या ग्रामीण रुग्णालयात खालीलप्रमाणे अनेक वैद्यकीय सेवा मिळू शकतात.

1. साधी बाळंतपणे आणि अवघड बाळंतपणे. अडलेल्या बाळंतिणीकरता सिझेरियनची सोय.
2. वैद्यकीय गर्भपात आणि अर्धवट झालेला गर्भपात वैद्यकीय मदतीने पूर्ण करणे.
3. स्त्रियांच्या आरोग्य समस्यांवर उपचार : रक्तस्राव, पांढरे पाणी जाणे, ओटीपोटात दुखणे.
4. लहान मुलांचा न्यूमोनिया, अतिसार, शरीरातील पाणी कमी होणे, तीव्र कुपोषित मुले तसेच तान्ह्या बाळांचे आजार, या सर्व गोष्टींकरता वैद्यकीय मदत.
5. न्यूमोनिया, रक्तदाब, ताप, मधुमेह अशा आजारांवर उपचार.
6. साधे (हाड मोडणे)फ्रॅक्चर, गळू, हर्निया याला लागणा-या शस्त्रक्रिया.
7. विषबाधा किंवा सर्पदंश अशा अपघातांवर उपचार.

Firozabad District Hospital
Vaccination Day

8. क्षयरोग नियंत्रणासाठी डॉट (समक्ष) उपचार
9. कुटुंबनियोजनाची नसबंदी शस्त्रक्रिया.
10. राष्ट्रीय योजनांचे आरोग्य उपक्रम राबवण्यास मदत करणे.
11. रक्त, लघवी आणि थुंकीची (बेडका) तपासणी.
12. क्ष-किरण तपासणी किंवा फोटो काढणे.
13. बलात्कार, मारहाणीमुळे झालेल्या जखमा याकरता आवश्यक कायदेशीर तपासण्या तसेच आरोग्य किंवा आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
14. पोलिसांच्या विनंतीवरून मृतांची शवचिकित्सा.
15. गर्भलिंग तपासणी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करणे. यासाठी वैद्यकीय अधीक्षक सक्षम अधिकारी म्हणून नेमलेला असतो.
16. एच. आय.व्ही (एड्स-संसर्ग) ची चाचणीदेखील काही ग्रामीण रुग्णालयात होते.
17. रुग्णांना जास्त गंभीर उपचाराची गरज असते. उदा. बाळंतपणात पिशवी फाटणे किंवा हार्टऍटॅक. अशांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची सोय इथूनच होऊ शकते.
18. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचीसुध्दा सोय असू शकते. बाळंतपणाला नेण्यासाठी उपयोग करायचा झाला तर या सेवेसाठी काहीच पैसे द्यावे लागत नाहीत. पण काही ग्रामीण रुग्णालयात मर्यादित सोयी असतात.
19. अतिकुपोषित बालकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करता येते.
20. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाची एक रुग्णकल्याण समिती असते. रुग्णालयात जमा होणारा निधी ते तिथेच वापरू शकतात. रुग्णालयाला देणग्याही घेता येतात.

रुग्णालयात पैसे द्यावे लागतात का?

District Hospital Room एक अल्पशी नोंदणी रक्कम कागद काढण्यासाठी वगळता, दारिद्रयरेषेखाली असणा-या सर्व रुग्णांना रुग्णालयाची सेवा मोफत आहे.
इतर रुग्णांना काही रक्कम भरायला लागेल. कोणत्या सेवेसाठी किती रक्कम भरायची याचा तक्ता तिथे लावलेला असेल. रक्कम भरल्यावर पावती अवश्य घ्यावी.

जर याविषयी काही तक्रार असेल तर ती वैद्यकीय अधीक्षकाकडे नोंदवा किंवा तक्रार पेटीत पत्र टाका. कधीकधी ग्रामीण रुग्णालयात काही औषधांचा साठा नसतो. अशा वेळी ते बाहेरून औषधे विकत आणायला सांगू शकतात. पण सल्लागार समितीने हा भार गरीब रुग्णांवर वारंवार पडणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे.

रुग्णालय सल्लागार समिती

River Revolving Hospital प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्थानिक सदस्यांची एक सल्लागार समिती असतेच. रुग्ण कल्याण समिती किंवा रुग्णालय समिती या नावाने ती ओळखली जाते. रुग्णांना मदत करणे, उपलब्ध सेवांच्या प्रतीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सामग्रीची दुरुस्ती करून घेणे अशा या समितीच्या जबाबदा-या आहेत.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.