औषधांचे परिणाम
औषधे वापरण्याच्या बाबतीत महत्त्वाचा नियम म्हणजे धीराने आणि सावकाश काम केले पाहिजे. भराभर औषध किंवा शक्ती बदलणे याने काहीच साध्य होत नाही. त्यातच होमिओ उपचारांमध्ये एक घटना अशी घडू शकते, की औषध दिल्यानंतर रोगलक्षणे काही काळ अधिक तीव्र होतात. त्यामुळे औषध दिल्यानंतर लक्षणे तीव्र झाल्यास त्या घटनेचा अचूक अर्थ लावणे महत्त्वाचे असते. येथे किमान दोन घटना संभवतात: औषध लागू पडणे किंवा रोगाचे प्राबल्य वाढणे. काही निकष लावून आपण यांतील खालीलप्रमाणे फरक ओळखू शकतो.
- औषध देताच रोगलक्षणे वाढली तर ती घटना औषधाचा परिणाम समजावा व वाट पाहावी.
- लक्षणे तीव्र होणे ‘नाटयपूर्ण’ असेल तरी वाट पाहावी.
- लक्षणे वाढली तरी रुग्ण मात्र बरे वाटते असे म्हणतो तेव्हा वाट पाहावी.
- कोणताही स्त्राव, पू वाहणे, प्रदर वाहणे, पाळी येणे, नाक वाहणे, अशी एखादी घटना लक्षणे वाढण्याशी संबंधित असेल तर वाट पाहावी.
- मुख्य म्हणजे रोगलक्षणाच्या वृध्दीने जीवास धोका उत्पन्न होत नसेल तर वाट पाहावीच पाहावी. एकूणच, वाट पाहाणे यात बरेच शहाणपण आहे हे लक्षात ठेवावे.
- जर औषधानंतर त्रासात काहीही बदल नसेल तर औषध गैर आहे की योग्य याची एकवार खात्री करून घ्यावी. योग्य असूनही रोगी चांगला प्रतिसाद देत नाही, असे असेल तर नोसोडचा म्हणजे आजारी प्राणी अथवा माणसाच्या उत्सर्जित स्त्रावापासून तयार केलेल्या औषधांचा वापर करतात. मात्र तो पूर्ण अभ्यासानेच करावा लागेल.
औषध लागू पडण्याच्या खुणा
औषधांचा परिणाम योग्य होत आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी खालीलप्रमाणे सूत्रे सांगितली आहेत.
- लक्षणे उद्भवली त्याच्या उलट क्रमाने बरी होण्यास सुरुवात होते. म्हणजेच शेवटी उद्भवलेले लक्षण सर्वात आधी बरे होते.
- लक्षणे आतून बाहेर अशी बरी होत गेली पाहिजेत. म्हणजे उदा. अस्वस्थपणा, खाज आणि पू येणे अशी जर एखाद्या इसब झालेल्या माणसाची लक्षणे असतील तर पू वाहणे वाढून अस्वस्थपणा व खाज कमी व्हावी ही घटना योग्य उपचाराची खूण आहे. वरून कातडी बरी होऊ लागली. पण अस्वस्थपणा आणि खाज वाढली तर औषध चुकले आहे असे समजावे. अशा रीतीने पू येणे, वाढणे हे कदाचित रोगलक्षणे वाढण्याची खूण आहे असे वाटू शकते. पण तसे घडणे हेच रोग्याला उपकारक असते.
- लक्षणे वरून खाली बरी होत जाणे योग्य आहे असेही मत आहे. याचा अर्थ असा, की लक्षणे अधिक महत्त्वाच्या अवयवाकडून इतर कमी महत्त्वाच्या भागात जाणे हे रोग बरा होत असल्याचे लक्षण आहे, असे हेरिंग म्हणतो आणि ते योग्यच आहे.
हे सूत्र खालीलप्रमाणे थोडक्यात लिहिल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते. रोगलक्षणे पुढीलप्रमाणे बरी होत चालली असता होमिओ उपचारांचा योग्य उपयोग होत आहे असे समजावे. (अ) उद्भवण्याच्या उलट क्रमाने (ब) आतून बाहेर (क) वरून खाली.
अर्थात ही सूत्रे विचारपूर्वक वापरली पाहिजेत. फार ठोकळेबाज विचार येथेही करू नये.
रोगलक्षणे वाढलेली अवस्था काही वेळा खूपच दीर्घ असू शकते. विशेषत:जर मूळ रोगलक्षणे निरनिराळया औषधांनी दडपलेली असली तर हा काळ वाढतो. या घटनांकरता वेळ देणे योग्य आणि आवश्यक वाटल्यासच तेथे उपचार सुरू करावा. हे उपचार सोपे असतात. म्हणजेच उपलब्ध लक्षणे हीच रोगलक्षणे धरून तेथे इलाज करावे लागतात.
प्रस्तुत पुस्तकात दिलेली औषधांची माहिती ही फक्त व्यवच्छेदक लक्षणे आहेत. ती लक्षात राहीपर्यंत पुन:पुन्हा वाचणे महत्त्वाचे आहे. त्यावरून औषध देण्यास थोडी सुरुवात करता येईल. तथापि, या शास्त्रात अधिक खोलात जायचे आहे, असे मनात ठेवूनच अभ्यास करणे सुरू करावे हे चांगले.
होमिओपथीचे औषध कसे निवडाल
रुग्ण सांगत आलेल्या लक्षणसमूहाकरता औषध सापडवणे हे होमिओपथीमधील सर्वात महत्त्वाचे काम असते. याकरता रिपर्टरी किंवा औषध सूचकाचा उपयोग केला जातो. या प्रकरणात दिलेल्या रोगनिदानाच्या पध्दतीला अनुसरून एक छोटी लक्षण व रोग-सारणी तयार केलेली आहे. त्यातील मथळयांखाली होमिओपथीच्या औषधांचा गट लिहिला आहे. कल्पना अशी, की रुग्णाच्या बोलण्यात येणा-या लक्षणांवरून काही धागा हुडकून, तो धरून, होमिओपथीने योग्य त्या औषधकडे जावे. सामान्यत:जी लक्षणे ज्या शब्दांत रुग्णाकडून सांगितली जातात त्या अनुषंगानेच यादी निवडली आहे. होमिओपथीचे औषध निवडताना अर्थात लक्षणांच्या बारकाव्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ‘डोकेदुखी’ या लक्षणाखाली ऍकोनिटम नॅपेलस, ब्रायोनिया, अल्बा, ग्लोनाइन, काली बायक्रोम, लॅकेसिस, लायकोपोडियम, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सॅग्वेनेरिया सिलिशिया, स्पायजेलिया, थूजा, बेलाडोना एवढी तरी औषधे निदान येतील. मग त्यातील कोणते द्यायचे हे ठरवणे हे काम उरेल. औषधांची निवड करताना डोकेदुखी कशा प्रकारची आहे ते ध्यानात घ्यायला हवे. समजा पेशंटने सांगितले की डोके ठोके पडल्याप्रमाणे दुखते (ठसठसते), उजेडाकडे पाहवत नाही, झोपल्याने (आडवे झाल्याने) त्रास होतो किंवा वाढतो. अशा वेळी ‘बेलडोना’ याच औषधाची निवड झाली पाहिजे.
समजा रुग्ण सांगतोय, की डोके दुखते, विश्रांतीने बरे वाटते, घट्ट पट्टी बांधल्याने डोकेदुखी कमी होते, डोळयांची हालचालसुध्दा सहन होत नाही तर ‘ब्रायोनिया’ हे औषध निवडले जाईल.
‘डोकेदुखी’ असे ढोबळ लक्षण न पाहता बारकाव्याने त्याचा विचार करणे आणि त्यानुसारच औषधयोजना करणे हे होमिओपथीचे शक्तिस्थान आहे. ते लक्षात घेता औषधयोजना करणे व्यर्थ आहे.
लक्षणांचा समग्र विचार केला जावा याकरता खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- रुग्णाच्या तक्रारी शक्यतो त्याच्या शब्दांत लिहून घ्याव्या.
- रुग्णास मोकळेपणाने बोलू द्यावे. नंतर त्याच्या सोबत आलेल्या जवळच्या माणसाकडे रुग्णाच्या लक्षणांची, चौकशी करावी.
- रुग्ण सांगतो ते लक्षण केवळ त्याची भावना आहे, की वस्तुस्थितीही आहे ते ठरवावे लागते. – उदा. ताप आल्यासारखे वाटते किंवा गरम वाटते असे रुग्ण म्हणतो. पण ताप खरोखर येतो किंवा नाही हे ठरवणे महत्त्वाचे आहे. याकरता तापमापकाचा उपयोग करावा.
- रुग्णाचे नीट निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या हालचाली व हावभाव पाहून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. उदाहरणार्थ, दवाखान्यात पंखा असेल तर रुग्णाची प्रतिक्रिया काय होते ते पाहावे. तसेच उन्हाळयात स्वेटर घालून येणारा किंवा हिवाळयात गरम कपडे न लागणारा रुग्ण वेगवेगळया औषधांना प्रतिसाद देतो. सिलिशियाचा रुग्ण सहज गारठतो, तर सल्फरचा रुग्ण गारवा शोधत असतो हे ध्यानात ठेवावे.
- एकदा रोगलक्षणे मिळाली, की ती नीट लिहून घ्यावीत. म्हणजेच ज्या लक्षणांचा आपण मार्गदर्शक म्हणून औषध शोधण्यास उपयोग करणार ती वेगळी लिहून काढावीत. अशी निदान तीन-चार तरी लक्षणे निघणे आवश्यक असते.
- प्रत्येक मार्गदर्शक लक्षणापुढे त्या लक्षणाने सुचवली जाणारी औषधे लिहावीत. उदा. ‘हालचालीने बरे वाटते’ हे लक्षण आपण घेऊ. यामुळे सुचणारी औषधे ऍकोनाइट, आर्सेनिकाम फेरम, काली कार्ब, काली सल्फ, लायकोपोडियम, पल्सेटिला, -हसटॉक्स, इत्यादी आहेत.
- समजा, याचबरोबर दुसरे लक्षण ‘एकंदरीत तहान नसणे’ हे असेल तर त्याने सुचणारी औषधे एपिस मेलिफिका, आर्सेनिकम, बेलाडोना चायना, फेरम मेटॅलिकम, काली कार्ब, लायकोपोडियम, नक्स (मोश्चाटा), फॉस्फोरिक ऍसिड , पल्सेटिला, सेपिया या दोन गटांतील सामान्य औषधेच फक्त आपल्याला विचारात घ्यायची आहेत. म्हणजे आर्सेनिकम अल्बम, फेरम मेटॅलिकम, काली कार्ब, लाल्यकोपोडियम, पल्सेटिला एवढीच औषधे उरतील. आता उरलेल्या औषधांपैकी कोणते औषध रोग्यास देणे योग्य आहे हे ठरवण्यासाठी एक तर आपण आणखी एखादे लक्षण घेऊन औषध संख्या कमी करू शकतो, किंवा औषधाचे वर्णन वाचून ते औषध रुग्णास देऊ शकतो.
- जेव्हा बरीच लक्षणे असतात तेव्हा त्यांतील कोणती लक्षणे औषध शोधण्याकरता वापरायची हे निवडावे लागते. मानसिक लक्षणे आणि संपूर्ण शरीरासंबंधी विधान करणारी लक्षणे महत्त्वाची असतात ती लक्षणे औषधे वगळण्याकरता वापरावीत. नंतर विशिष्ट रोग म्हणजे कावीळ, डांग्या खोकला, याकडे लक्ष द्यावे किंवा नंतर विशिष्ट अवयवांकडे वळावे (उदा. यकृत, फुप्फुसे, इ.)
- जोपर्यंत रुग्णाने सांगितलेली लक्षणे किंवा त्यांतील बरीच लक्षणे एका औषधाखाली सापडत नाहीत, तोवर हा शोध चालू ठेवावा. औषधसूचकामुळे औषधे सुचवली जातात हे लक्षात ठेवावे. औषधाची निवड ही औषधांच्या लक्षणवर्णनावरून करायची असते. निवडलेली लक्षणे योग्य त्या वर्णनाने ज्या औषधाच्या लक्षणांमध्ये आढळतील ते औषध म्हणजेच होमिओपथिक औषध.
- या पुस्तकातील लक्षण किंवा रोगांची यादी ही त्रोटक आहे. शिवाय रोगाच्या नावाखाली होमिओ औषधांना फारसे महत्त्व नाही त्यामुळे त्यावर पूर्ण भर टाकून औषध निवडता येणार नाही. याचा अर्थ असा, की औषधाची अंतिम निवड ही सर्व रोगलक्षणांवरून म्हणजेच औषधवर्णनावरून (‘मटेरिया मेडिका’ वरून) व्हायला हवी.