आधुनिक विज्ञानामुळे बहुतेक सर्व औषधे तोंडाने घेऊनही परिणामकारक झाली आहेत. जी औषधे पोटात घेऊन चालत नाहीत अशा औषधांची संख्या फार कमी आहे. तसेच औषध पोटात घेण्याचा मार्ग जास्त निर्धोक, स्वस्त, सोपा आहे.
मात्र इंजेक्शनचा आग्रह सामान्य डॉक्टर व पेशंट दोघेही धरतात. इंजेक्शनमुळे जास्त फी सांगता येते हे डॉक्टरांचे धोरण असते. तर इंजेक्शन म्हणजे रामबाण उपाय असा लोकांचा गैरसमज आहे. रोगराईच्या बाजारपेठेत त्यामुळे इंजेक्शनची चलती आहे.
औषध पोटात घेतले तर अर्ध्या तासाने रक्तात पसरते आणि इंजेक्शनने घेतले तर पाच मिनिटांत पोहोचते. एवढया फरकासाठी 20-50 रुपयांची जादा किंमत मोजावी लागते. बरेच आजार (उदा. सर्दी) औषधाशिवाय बरे होऊ शकतात. ज्या रुग्णांना औषधोपचार लागतो त्यांतल्या पाच-दहा टक्के लोकांना देखील इंजेक्शनची बिलकुल गरज नसते. व्यवहारात मात्र डॉक्टरकडे जाणे म्हणजे टोचून घेणे असेच समीकरण झालेले आहे. दिवसेंदिवस हे वेड वाढतच चाललेले आहे.
इंजेक्शनप्रमाणेच हल्ली ‘सलाईन’ वेड वाढत चालले आहे. सलाईन म्हणजे मीठपाणी किंवा साखरपाणी अशी मिश्रणे असतात. ही निर्जंतुक असतात आणि शिरेतून देता येतात. सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध आहे. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. पण सलाईनचा गैरवापरही प्रचंड प्रमाणात होतो. ग्लुकोजमुळे तरतरी वाटते. सलाईन घेतल्याचे रुग्णाला मिळणारे मानसिक समाधान सोडल्यास एकदम नव्वद-शंभर रुपये मिळवणे हाच ब-याच व्यावसायिकांचा हेतू असतो. म्हणून इंजेक्शन व सलाईनची नेमकी गरज काय याची माहिती थोडक्यात इथे दिली आहे.
हे सर्व लक्षात घेता अनेक दवाखान्यांमध्ये दिली जाणारी बहुतेक इंजेक्शने (‘ब’ जीवनसत्त्व, जेंटामायसिन, इ.) बहुधा अनावश्यक असतात.
इंजेक्शनांचे दुष्परिणामही असतात.
लहान मुलांमध्ये पावसाळयात इंजेक्शननंतर पोलिओचा आजार बळावू शकतो. इंजेक्शनमुळे ‘रिअक्शन’ (प्रतिक्रिया) होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते.
इंजेक्शनच्या जागी जंतुदोष, गळू होण्याची शक्यता असते. इंजेक्शनमुळे नसेला इजा होऊन हात निर्जीव होऊ शकतो. (उदा. दंडात दिली गेलेली इंजेक्शने).
सुई, सिरिंज पुरेशी निर्जंतुक नसेल तर ब कावीळ व ‘एड्स’ ची लागण इंजेक्शनमार्फत होऊ शकते. म्हणून इंजेक्शनचा वापर काटेकोरपणेच केला पाहिजे. दुर्दैवाने इंजेक्शन हे पैसे काढण्याचे आणि खोटे समाधान करण्याचे साधन होऊन बसले आहे.
सलाईन हे जीवदायी औषध आहे, पण त्याचा अनावश्यक वापर फार होतो. सलाईन खालील बाबतीत आवश्यक असते.
पण व्यवहारात किती तरी वेळा उगाचच सलाईन दिले जाते. रुग्णदेखील अज्ञानाने सलाईनचा आग्रह धरतात. अशुध्द सलाईनमुळे रुग्ण दगावण्याची उदाहरणे आहेत. अनावश्यक इंजेक्शने व सलाईन टाळणे हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कावीळ, एड्स यांसारखे सांसर्गिक आजार इंजेक्शन व सलाईनच्या सुईने पसरू शकतात. हे लक्षात ठेवले पाहिजे. मुख्य म्हणजे सलाईनच्या गैरवापराने वैद्यकीय खर्च अनेकपटीने वाढतो.
बहुतेक टॉनिकांत साखरपाणी, जीवनसत्त्वे मद्यार्क व लोहक्षार असतात. मद्यार्कामुळे थोडी तरतरी वाटते व टॉनिकवर श्रध्दा बसते. परंतु ज्या प्रमाणात टॉनिके विकली जातात त्याच्या एक-दोन टक्के प्रमाणात देखील त्यांचा उपयोग नसतो. टॉनिकमधील काही जीवनसत्त्वे लघवीवाटे फेकून दिली जातात. त्यामुळे सरसकट टॉनिक लिहून देणे किंवा विकत घेणे हा अडाणीपणा आहे. टॉनिक म्हणजे लूटमारीचे एक साधन झाले आहे.