आम्लता जास्त झाल्याने किंवा जठराची आम्ल सहन करण्याची शक्ती कमी झाल्याने हळूहळू जठरव्रण तयार होतो. अल्सर किंवा जठरव्रण हे मध्यमवयात ब-याच लोकांमध्ये आढळणारे दुखणे आहे. सतत काळजी,ताण, गडबड, जेवणातील अनियमितता, तिखट, तेलकट आहार यांच्यामुळे आम्लता वाढून अल्सर होण्याची शक्यता असते. हा आजारही आता जिवाणूंमुळे (हेलिकोबॅक्टर) होतो असे सिध्द झाले आहे. पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
जेवणानंतर तास-दोन तासांनी पोटातले दुखणे वाढत असल्यास जठराऐवजी त्यापुढच्या लहान आतडयांच्या भागात (आमाशय) आतडे व्रण असण्याची शक्यता असते. भारतात जठरव्रणापेक्षा हा प्रकार जास्त आढळतो.
दुर्बिण तपासणी – एंडोस्कोपीने जठर किंवा आमाशयात असलेला व्रण/अल्सर स्पष्ट दिसून येतो.
आम्लता, जळजळ होणा-या व्यक्तींना पथ्यापथ्य सांगणे फार महत्त्वाचे असते. एक सल्ला म्हणजे शिळया अन्नापेक्षा गरम व ताज्या अन्नात आम्लता कमी असते. म्हणून ताजे अन्न घ्यावे; शिळे अन्न घेऊ नये.
डाळीपैकी मूगडाळ ही सौम्य असून इतर डाळी (तूरडाळ, हरभराडाळ) आम्लता वाढवतात. म्हणून आहारात मूग वापरणे चांगले. मूगडाळीपेक्षा सालासह मूग अधिक चांगले.
मीठ व खारट पदार्थ (लोणचे, इ.), मिरच्या, सांडगे, पापड, आंबील, दारू, आसवारिष्टे, सॉस, टोमॅटो केचप, ताकाची कढी, तळलेले पदार्थ (वडे, भजी), अतिगोड भात, इत्यादी पदार्थ आम्लता वाढवतात, म्हणून हे पदार्थ वर्ज्य करावेत.
याउलट आवळा, डाळिंब, कागदी लिंबू (आंबट असले तरी) हे पदार्थ आम्लता वाढवत नाहीत. गव्हाचे फुलके, ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, इत्यादी पदार्थ आम्लता, जळजळ कमी करतात. कोणत्या पदार्थाने आराम पडतो आणि कोणत्या पदार्थाने त्रास होतो, हे रुग्णाला स्वत:लाच हळूहळू कळते.
जठरव्रण नाही याची खात्री असल्यास (म्हणजे नुसती जळजळ, आम्लता असल्यास) वमन, विरेचन या उपायांचा चांगला फायदा होतो. यासाठी आधी ज्येष्ठमध 100 ग्रॅम (याची पुडी मिळते) भांडयात घेऊन त्यावर 500 मि.ली. उकळते पाणी ओतून अर्धा तास तसेच ठेवावे. हे गार झालेले पाणी वमनासाठी वापरावे. वमन करण्यासाठी हे पाणी प्यायला देऊन लगोलग रुग्णास त्याच्या स्वत:च्या बोटांनी घशात स्पर्श करून उलटी करण्यास सांगावे.
औषधयोजनेत अविपत्तिकर चूर्ण दीड ग्रॅम दिवसातून दोन-तीन वेळा 20 ते 28 दिवस द्यावे. यामुळे सकाळी शौचास जास्त पातळ होत असल्यास अविपत्तिकर चूर्ण कमी करून परत 14 दिवस हाच प्रयोग करावा.