digestive system icon पचनसंस्थेचे गंभीर आजार पचनसंस्थेचे नेहमीचे आजार
हर्निया (अंतर्गळ)

Hernia हर्निया हा आजार म्हणजे आतडयाचा कोणतातरी भाग पोटाच्या स्नायूंच्या पदरातून बाहेर पडणे. काही लहान मुलांना बेंबीच्या ठिकाणी असा फुगार दिसतो. हर्नियावर हाताने (किंवा आवाजनळीने) तपासल्यावर आतडयाची हालचाल व आवाज समजतात. हर्निया बोटाने आत ढकलल्यावर आत जातो आणि हात काढून जोर केला तर परत बाहेर येऊ शकतो.

पोटाचे ऑपरेशन झाले असल्यास (विशेषत: मध्यरेषेवर) काही वर्षानी क्वचित तिथले स्नायू दुबळे पडतात. यामुळे तिथे हर्नियाचा फुगार दिसतो.

सर्वात जास्त आढळणारा जांघेतला हर्निया असून तो लहान वयात किंवा उतारवयात दिसतो.

पोटातला दाब वाढल्यावर फुगार होणे ही हर्नियाची एक महत्त्वाची खूण आहे. खोकला करणे, उभे राहणे, वजन उचलणे कुंथणे, शिंकणे, इ. कारणांनी पोटात दाब वाढू शकतो.

हर्निया हा शस्त्रक्रियेनेच बरा होऊ शकतो. हर्निया स्वत: सहसा दुखत नाही. पण त्यातल्या आतडयाला पीळ पडून ‘आतडीबंद’ झाला तर खूप वेदना होते. यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागते.

हर्नियाच्या ठिकाणचा फुगार एकदम वाढणे, दुखरेपणा, गरमपणा, उलटया, इत्यादी लक्षणे गंभीर समजावीत.

जलोदर

Dropsy यकृतातून जाणा-या नीलाप्रवाहात अडथळा आल्यामुळे जलोदर होतो.

सर्व आतडी, जठर, यकृत, प्लीहा, पांथरी, इत्यादींवर एक पातळ दुपदरी आवरण असते. हया दुपदरी आवरणात नेहमी थोडासा द्रवपदार्थ असतो. या आवरणामुळे आतडयाची हालचाल सोपी होते. यामुळे मार, आजार यांपासून आतील अवयवांचे संरक्षण होते. जलोदर म्हणजे या दुपदरी आवरणात प्रमाणाबाहेर पाणी साठणे. या आजाराची कारणे अनेक आहेत.

  • दयाच्या निरनिराळया आजारात रक्ताभिसरणाची क्रिया नीट न होऊन पाणी साठणे.
  • यकृत निबर होऊन यकृतातून जाणा-या नीलांना अडथळा होऊन या आवरणात पाणी साठणे.
  • उदरपोकळीच्या आवरणात टी.बी., कॅन्सर हे आजार होणे.
  • तीव्र कुपोषणाचे आजार, यामुळे प्रथिनांची कमतरता.
  • जलोदर हे गंभीर आजाराचे लक्षण असून यासाठी लवकरात लवकर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
आयुर्वेद

जलोदराची कारणे अनेक आहेत. यकृतसूजेनंतर येणा-या जलोदराचा प्रकार आधुनिक वैद्यकाप्रमाणे साध्य (बरा होणारा) आहे. परंतु आयुर्वेद रुग्णालयांमधून केल्या जाणा-या उपायांचा चांगला उपयोग होतो हा अनुभव आहे. मीठ, पाणी जरासुध्दा न घेता केवळ पूर्णपणे दुधावर सहा महिनेपर्यंत निग्रह दाखवू शकणा-या रुग्णांना चांगला उपयोग झाला आहे. आहारातील एक अट म्हणजे सर्व प्रकारच्या उसळी टाळणे. असे पथ्य पाळल्यानंतर हळूहळू पचनशक्तीप्रमाणे चतकोर भाकरी, ओवा-जिरे मिसळलेली लसणीची चटणी यांचा प्रयोग करावा. एकूण पथ्यापथ्य तीन ते नऊ महिनेपर्यंत पाळावे लागते.

या आजारात सौम्य जुलाब होत राहणे चांगले असते. यासाठी आहारातल्या डाळींवर रुईचा चीक आधीच टाकून द्यावा. यासाठी 20 ग्रॅम डाळीवर रुईचा चीक दोन-तीन थेंब टाकावा (जास्त टाकू नये नाहीतर जुलाब होतील). भाकरी-पोळीचे पीठ भिजवताना त्यामध्येही दोन थेंब रुईचा चीक मिसळावा. या जुलाबामुळे शरीरातले अनावश्यक पाणी कमी होत राहते.

आरोग्यवर्धिनी (500 मि.ग्रॅ) हे औषध यकृताचे कामकाज सुधारण्यास उपयोगी आहे. याच्या 1-2 गोळया दिवसातून 2-3 वेळा याप्रमाणे 3 ते 9 महिने द्याव्या. याबरोबरच कुमारीआसव आणि पुनर्नवारिष्ट 2-2 चमचे तेवढयाच पाण्यात मिसळून देत राहावे. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत पुनर्नवा (खापरखुट्टी, वसू) भाजी म्हणून खेडयांमध्ये मिळू शकते. या वनस्पतीचा 50-100 ग्रॅम या मात्रेत रोज 2 वेळा वापर केल्यास यकृतपेशींचे काम सुधारते. 3 ते 6 आठवडे हे उपचार सुरू ठेवावेत.

यकृत निबर होणे (सि-हॉसिस)

यकृत निबर होऊन बिघडणे व जलोदर होणे याला खालीलपैकी काही कारणे असू शकतात.

  • दारूचे व्यसन हे यकृत खराब होण्याचे प्रमुख कारण आहे.
  • सांसर्गिक कावीळ, विशेषत: ‘बी’ प्रकार हे यकृत दाहाचे आणखी एक प्रमुख कारण आहे.
  • भारतातील लहान मुलांमध्येदेखील याचा एक प्रकार आढळतो. त्यात यकृत निबर होते व जलोदर होतो. 6 महिने ते 3 वर्ष वयामध्ये हा आजार जास्त आढळतो. नात्यात होणारी लग्ने, आहारात खवट शेंगदाण्यातून जाणारे अफ्लाटॉक्सीन नावाचे विषारी द्रव्य, तांब्याच्या भांडयांचा स्वयंपाकात वापर व आनुवंशिकता ही त्याची महत्त्वाची कारणे सापडली आहेत.

कावीळ, जलोदर, पोटावरच्या नीला उठून दिसणे, मळमळ, उलटी, आजाराच्या शेवटच्या अवस्थेत रक्ताची उलटी वगैरे अनेक लक्षणे यात दिसून येतात.

वेळीच निदान झाले तर डीपेनिसिलीन व आरोग्यवर्धिनी या औषधांचा चांगला उपयोग होतो. एकदा सि-हॉसिस हा यकृताचा रोग जडला, की बरा होणे जवळजवळ अशक्य असते. याचे परिणाम फार दूरगामी असतात. केवळ या रोगासाठी तरी दारू टाळणे आवश्यक आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.