शरीर हे त्रिदोषयुक्त (तीन तत्वे) आहे. काही व्यक्तीत हे त्रिदोष – कफ, वात, पित्त समस्थितीत असतात. बहुतेक जणांमध्ये एक ना एक दोष जास्त असतो. दोष-प्रकृती कशी ओळखायची ते आपण आधी थोडक्यात समजावून घेऊ या.
वातदोषाधिक्याच्या व्यक्ती ह्या नेहमी सडपातळ, तडतडया, लगेच कामाला लागणा-या, पण कामात सातत्य नसणा-या असतात. त्यांची भूक कमीजास्त होते, पण अन्न कितीही घेतले तरी वजन वाढत नाही. मळाला कोरडे खडे होण्याची प्रवृत्ती असते. काही ना काही आजारपण वारंवार असते. गरम अन्न आवडते पण पंखा व गारठा नकोसा वाटतो, थंडीत लोकरीचे कपडे लागतातच अशी प्रवृत्ती असते. या व्यक्तींच्या शरीरावरील शिरा (निला) उठून दिसतात. त्यांची त्वचा रखरखीत कोरडी दिसते. पावसाळयात वारंवार आजारपण आढळते. शरीरातील मांसल भाग कडकडीत असतो.
पित्तदोषाधिक्याच्या व्यक्तींना उकाडा सहन होत नाही. त्वचा इतरांच्या मानाने थोडी गरम असते. मांसल भाग इतर प्रकृतीच्या मानाने मऊ लागतो. नेहमी भरपूर भूक, झटपट पचन होत. भुकेच्या काळात पुरेसे खाणे न मिळाल्यास कासावीस होणे दिसून येते. मात्र ऑक्टोबरमध्ये आजारी पडण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तीस भराभर नवीन कल्पना सुचतात, रागही जास्त असतो. अशा व्यक्तींना मलमूत्रविसर्जनासंबंधी किंवा अपचनाचे आजार सहसा होत नाहीत.
कफदोषाधिक्याच्या व्यक्ती नेहमी गुटगुटीत, शांत-संथ, मोजके खाणा-या, उष्णताप्रिय, इतरांच्या मानाने निरोगी, न दमता काम करणा-या, गाढ झोपणा-या, व्यायामप्रिय अशा असतात.
वरीलप्रमाणे एकेक दोषाधिक्य असलेल्या व्यक्तींप्रमाणे दोन-दोन दोषाधिक्यांचे मिश्रण असलेल्या प्रकृतीच्या व्यक्तींही आढळतात हे लक्षात ठेवले पाहिजे.