digestive system icon पचनसंस्थेचे गंभीर आजार पचनसंस्थेचे नेहमीचे आजार
उदरसूज-पोटसूज
hernia
stomach ulcer

वरील दुपदरी आवरणात जंतुदोष होऊन दाह-सूज-पू होणे म्हणजेच उदरसूज किंवा पोटसूज. हा एक आकस्मिक आणि गंभीर आजार आहे. वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण काही तासांत देखील दगावू शकतो. याची मुख्य कारणे याप्रमाणे-

  • आतडेव्रण-जठरव्रणाला भोक पडून त्यातले पदार्थ या आवरणात येणे. यामुळे जंतुदोष होणे.
  • अपेंडिक्सदाह (आंत्रपुच्छदाह)
  • स्त्रीबीजनलिकादाह, इत्यादींबरोबर येणारा जंतुदोष.
  • पोटाची शस्त्रक्रिया झाल्यावर जंतुदोष होणे.
  • पोटावर होणा-या जखमा, (उदा. भोसकणे, इ.)
  • आतडयांचा वाढलेला क्षयरोग.
  • पोटसुजेचे प्रमुख लक्षण म्हणजे सतत वाढत जाणारी पोटदुखी, पोटावर सर्वत्र दुखरेपणा, कडकपणा व रोगी अंथरुणाला खिळून राहणे.

    कोणत्याही तीव्र पोटदुखीवर उपचार करताना ‘पोटसूज’ नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

    पचनसंस्थेचे कर्करोग

    पोटासंबंधी तक्रारी असल्यास विशेषत: उतारवयातल्या व्यक्तींच्या बाबतीत कर्करोगाची शक्यता विसरून चालणार नाही. गिळायला त्रास किंवा बध्दकोष्ठाच्या सतत तक्रारी, टिकून राहणारी कावीळ, मलविसर्जनाच्या बदलत्या सवयी, जलोदर, इत्यादी गोष्टींपैकी काहीही असल्यास लवकरात लवकर तज्ज्ञास दाखवावे. पचनसंस्थेच्या तक्रारींबरोबरच भूक न लागणे, वजन कमी होणे, खूप अशक्तपणा, रक्तपांढरी, पोटावर गाठ- गोळा लागणे, उलटीतून किंवा विष्ठेतून रक्तस्राव या इतर तक्रारी असू शकतात.

    अन्ननलिका आणि जठराचा कर्करोग

    आपल्या देशात हा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो. जठराच्या आतल्या आवरणावर कर्करोगाची सुरुवात झाल्यास कर्करोग वेगाने पसरण्याची शक्यता असते. धूम्रपान, तंबाखू सेवन, दारू, अतितिखट खाणे, इत्यादी सवयींमुळे कर्करोगाची शक्यता वाढते.

    • अन्ननलिकेच्या कर्करोगात सर्वात आधी गिळायला त्रास सुरू होतो.
    • जठराच्या कर्करोगात भूक न लागणे, पोट भरल्यासारखे जड वाटणे, मळमळ, उलटी, कधीकधी उलटीत रक्त, इत्यादी लक्षणे दिसतात. कर्करोगाची गाठ मोठी असल्यास पोटातील (पोटावरील क्र. 2,5 या भागात) ‘गाठ किंवा गोळा’ हाताला लागण्याची शक्यता असते.

    अशी लक्षणे, चिन्हे दिसल्यास पुढील तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवावे. लवकर रोगनिदान झाल्यास शस्त्रक्रियेने उपयोग होऊ शकतो. पण ब-याच वेळा रोग लवकर समजून येत नाही. एडोस्कोपी तंत्राने आता याचे चांगले रोगनिदान होऊ शकते.

    आतडयाचा किंवा गुदद्वाराचा कर्करोग

    मोठया आतडयाचा किंवा गुदद्वाराचा कर्करोगही सहसा पन्नाशीनंतर आढळतो. वजन कमी होणे, शौचावाटे रक्त पडणे, बध्दकोष्ठ, मलविसर्जनाच्या सवयी बदलणे, इत्यादी लक्षणे आढळतात. तज्ज्ञाकडून लवकर तपासणी आवश्यक असते. एडोस्कोपी (दुर्बिणीमुळे) याचे रोगनिदान सोपे झाले आहे.

    यकृताचा कर्करोग

    पोटावरील यकृताच्या भागात (म्हणजे भाग 1 व 2) निबरपणा, यकृताची वाढ, गाठ आढळणे हे यकृताच्या कर्करोगातले प्रमुख लक्षण-चिन्ह आहे. सोनोग्राफी तंत्राने याचे रोगनिदान आता अचूकपणे करता येते. मात्र यकृताचा कर्करोगही लवकर पसरणारा असल्याने रोग वेळीच ओळखला तरी विशेष उपयोग होत नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.