गर्भपात किंवा ‘अर्धेकच्चे पडणे’ हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकतो. गर्भधारणा होऊन सात महिने (२० आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला गर्भपात म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते.म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपु-या दिवसांचे बाळंतपण म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.) गर्भपात हा वैद्यकीय शास्त्रानुसार बाळंतपणापेक्षा जास्त जोखमीचा असतो.
गर्भ वारंवार पडत असेल (म्हणजे तीन अथवा अधिक वेळा) तर लिंगसांसर्गिक आजार किंवा गर्भाशयाचे तोंड सैल असणे ही कारणे असू शकतात.
निसर्गतः होणारा गर्भपात अनेक कारणांनी होतो – गर्भ सदोष असणे, मातेला लिंगसांसर्गिक आजार असणे, गर्भपिशवीचे तोंड सैल असणे, जोरदार जुलाब/हगवण होणे, खूप ताप येणे, प्रवासात ओटीपोटात धक्का लागणे, कावीळ होणे, अन्न विषबाधा, लैंगिक संबंधात धक्का लागणे, स्त्री अथवा पुरुष बीजामध्ये काही दोष, भृणाची विकृतीयुक्त वाढ, मातेचे तीव्र कुपोषण, इत्यादी.
1. पोट दुखते व अंगावरून थोडे रक्त किंवा तांबडे पाणी जाणे ही गर्भपाताची सुरुवात असते. वेळीच विश्रांती व उपचार झाल्यास गर्भपात व्हायचा टळून गर्भ पुढे वाढत राहतो. मात्र यासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले पाहिजे.
2. अंगावरून जास्त रक्त जाणे व पोटात दुखणे ही दोन्ही लक्षणे असतील तर गर्भपात अटळ असतो. अशा वेळी आतून तपासल्यावर गर्भाशयाचे तोंड उघडून एक बोट आत जाण्याइतकी वाट झालेली असते. अशा वेळी गर्भ लवकर पडून जाणेच हिताचे असते. पोटात दुखणे थांबून, रक्तस्राव थांबला असेल तर गर्भ पडून गेला असण्याची शक्यता असते. आतून तपासणी केल्यावर अशा वेळी गर्भाशय लहान आणि घट्ट लागते.
3. अर्धवट गर्भपात – काही वेळा मात्र गर्भाचा काही भाग आत राहून जातो व रक्तस्रावही चालू राहतो. आतून तपासणी केल्यावर गर्भाशय मऊ व मोठे लागते. कारण आत गर्भाचा भाग व रक्त असते. अशा वेळी रुग्णालयात नेऊन गर्भाशयाचे अस्तर खरवडून (क्युरेटिंग) घेणे हिताचे असते. नाहीतर जंतू शिरून आजाराचा धोका निश्चितच असतो. ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे. हा उपाय केल्यावर रक्तस्राव थांबतो. काही वेळा अर्धवट गर्भ आत राहून जंतुदोषाची लागण होते.
4. चौथी अवस्था – सपूर्ण गर्भपात होणे. वेदना थांबतात. रक्तस्त्राव थांबतो आणि गर्भाशयाचे तोंड बंद होते.
आपल्यासारख्या देशात योग्य उपचाराऐवजी अघोरी मार्ग वापरून गर्भ पाडण्याचे अनेक प्रकार होतात. यात नेहमीच धोके असतात. अतिरक्तस्राव, जंतुदोष सिप्टिका, इत्यादी परिणाम होऊन माता मृत्यू घडू शकतात. यासाठी गर्भपाताचा खास कायदा 1972 साली झाला आहे. यातल्या सोयी आपण नंतर पाहू.
गर्भधारणेनंतर वीस आठवड्यांच्या आत गर्भाचा शेवट होणे म्हणजे गर्भपात. वीस आठवड्यानंतर गर्भ बाहेर पडला तरी जगू शकतो. पण त्याआधी मात्र बाहेर जगू शकत नाही.
वैद्यकीय गर्भपाताचा कायदा व्हायच्या आधी अयोग्य गर्भपातांमुळे खूप त्रास व अपमृत्यू होत असत. पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रियांवर अत्याचार तर होतातच. आपल्या देशात विवाहबाह्य संततिला सामाजिक मान्यता नसते. यामुळे चोरून मारून अयोग्य पध्दतीच्या गर्भपाताचा धोका अनेक स्त्रियांना पत्करावा लागत असे. झाडपाल्याची औषधे, गर्भाशयात काडी किंवा इतर पदार्थ घालून गर्भपात करणे पूर्वी सर्रास होते. असे ‘पोटचे पाडणे’ गुप्त ठेवावे लागत असल्याने शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत असे. रक्तस्रावाबरोबर जंतुदोष झाला, की अनेक स्त्रियांना वंध्यत्व, ओटीपोटातले आजार, इत्यादी संकटांना तोंड द्यावे लागत असे. अनेक स्त्रिया यात दगावत असत. गर्भपाताचा कायदा झाला तरी अजूनही असे छुपे गर्भपात होतातच.