झोप ही माणसाची मानसिक आणि शारीरिक गरज आहे. वयाप्रमाणे झोपेचा कालावधी हळू हळू कमी होत जातो. वृध्द माणसांना अगदी 2-4 तास झोप पुरते तर लहान बाळे दिवसाच्या 24 तासांपैकी बहुतेक वेळ झोपून काढतात.
झोपेचा वैद्यकशास्त्राने सखोल अभ्यास केला आहे. त्यात उथळ आणि गाढ झोप अशा अवस्था आळीपाळीने येत राहतात असे दिसून येते. याचा अंदाज डोळयांच्या हालचाली आणि मेंदूचा विद्युत आलेख यावरून करता येतो. उथळ झोपेच्या अवस्थेत डोळे थोडया जोरजोरात फिरत/हलत राहतात. गाढ झोपेत डोळयांची हालचाल मंद होते. स्वप्ने पडतात उथळ झोपेच्या अवस्थेत.
स्वप्ने सर्वांनाच आणि रोज पडतात, फक्त बहुतेक वेळा ती आठवत नाहीत. म्हणून काही जणांना वाटते की त्यांना स्वप्नच पडत नाही. स्वप्नांचे विषयही सहसा ठरावीक असतात. बहुतेक स्वप्ने पाऊल चुकून खड्डयात पडणे, तोल जाणे, साप दिसणे, इ.असतात. यामागे प्राणिजीवनातले उत्क्रांतीतले अनुभव असतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही स्वप्ने दैनंदिन जीवनातल्या जास्त जाचक किंवा आनंददायक अनुभवाशी निगडित असतात.
स्वप्न आणि भविष्य याचा काही संबंध नसतो. पण काही लोकांना दूर किंवा भविष्यात होऊ घातलेल्या घटनांची कल्पना येते असा दावा केला जातो. हे ‘सहावे इंद्रिय’ किती खरे मानायचे हा प्रश्नच आहे. कारण पुढे घडणा-या घटना आधीपासून ठरलेल्या असतात असे मानणे बरेच अशास्त्रीय आहे. मात्र काही संभाव्य घटनांची चित्रे त्या दृष्टीने संवेदनाक्षम व्यक्तीच्या मनात येऊ शकतात हे खरे. त्यापैकी नंतर ख-या ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख होतो आणि खोटया ठरलेल्या विसरल्या जातात हेही लक्षात ठेवले पाहिजे. अशी अंधश्रध्दा ही एक मानसिक समस्याच आहे.
दिवास्वप्न पाहणे (म्हणजे मनाने स्वप्न रचत राहणे) हा प्रत्येक निरोगी माणसाचा स्थायीभाव आहे. बहुतेक माणसे दिवसाचा बराच ‘मोकळा वेळ’ दिवास्वप्ने रचण्यात घालवतात असे दिसून आले आहे. यात काही गैर नाही.
अंधश्रध्दा हा एक मानसिक दुबळेपणा आहे. मागास व अशिक्षित समाजाचे हे एक वैगुण्य आहे. भारतीय समाजात तर सुशिक्षित माणसेही त्याला बळी पडतात. श्रध्दा आणि अंधश्रध्दा याबद्दलचा वाद तर कायमच चालू असतो. देवधर्मकल्पनेशी त्याची फार सांगड असते.
अंधश्रध्देची अनेक उदाहरणे आहेत; काही सौम्य तर काही घातक व भयंकर आहेत.
आपल्यालाही अशी अनेक उदाहरणे माहीत असतील. हिंदू धर्मात अशा अंधश्रध्दांचा विशेष पगडा आहे. विज्ञान आणि शिक्षणाने आपण हा अंधश्रध्दांचा नायनाट केला पाहिजे. अंधश्रध्दाविरोधी कायदा लवकरच येणार आहे.
निरनिराळया मनोविकारांवर काय उपचार केले जातात याची सर्वसाधारण लोकांना अत्यंत कमी माहिती असते. सहसा मंत्रतंत्र, मारझोड, उपेक्षा अशा गोष्टींचाच प्रचार होतो. अंधश्रध्दा ही मोठी समस्या असते. आधुनिक उपचार म्हणजे केवळ शॉक नाही तर मनोरुग्णालयात डांबून ठेवणे अशीही कल्पना असते. या बाबत आपण थोडी माहिती करून घेऊ या.
मानसिक आजारांवरच्या उपचारांचे पुढील प्रकार आहेत.
गंभीर मानसिक आजारांचे उपचार जरा जास्त अवघड व दीर्घ मुदतीचे असतात. भ्रमिष्टावस्था, अतिनैराश्य, उन्माद, इत्यादींचे मनोरुग्ण ब-याच वेळा दीर्घकाळ रुग्णालयात ठेवावे लागतात. योग्य औषधोपचाराने त्यांची अवस्था निदान आटोक्यात राहू शकते. समाजात यातल्या काही जणांचे पुनर्वसनही करता येते.
साधारण मनोविकारांवरचे उपचार तर ब-याच प्रमाणात यशस्वी होतात. असे मनोरुग्ण इतरांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतात व आपापले व्यवसाय करू शकतात.
सदोष व्यक्तिमत्त्वावर फारसे उपचार लागत नाहीत. अशा आजारांत नातेवाईक, मित्र यांच्यावरही जबाबदारी असते ती त्या व्यक्तीला मानसिक आधार व मदत देण्याची. योग्यवेळी रोगनिदान झाले, औषधोपचार मिळाले तर सर्वांच्या मदतीने बहुतांश मनोरुग्ण चांगले जीवन जगू शकतील. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसिक आरोग्यकेंद्राचे डॉक्टर मदत करतील. यापुढे प्राथमिक आरोग्यकेंद्रातही ही सेवा मिळू शकेल अशी आशा आहे.
लक्षात ठेवा : ही माणसे मनोरुग्ण असू शकतील
अशा व्यक्ती आढळल्यास त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे, डॉक्टरकडे पाठवण्याचा प्रयत्न करा, कुटुंबीयांना सावध करा व संयमाने शेवटपर्यंत पाठपुरावा करा.