जन्मलेल्या बाळाची काळजी
बाळाचे डोके बाहेर आल्यावर पूर्ण बाहेर येण्याची वाट न पहाता बाळाचा श्वसनमार्ग साफ करावा.
- बाळ उलटे धरु नका.
- बाळावर पाणी मारु नका.
- बाळाचे नाक, तोंड घसा म्यूकस नळीने साफ करावे. म्यूकस नळी नसल्यास स्वच्छ मऊ सुती कपडा करंगळीला गुंडाळून बाळाच्या घशातून बोट फिरवून चिकटा काढून टाकावा.
- बाळ बाहेर येऊन, नाळेतील नाडी तपासून ती थांबल्यावरच नाळ कापावी.
- तोपर्यंत बाळ लगेच कोरडे करावे. लगोलग उबदार कपडयात गुंडाळून ठेवावे.
- बाळाला आंघोळ घालण्याची घाई करू नये.
- यानंतरही बाळ न रडल्यास अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा. आपल्या तोंडाने बाळाच्या नाकातोंडात आपले गाल फुगवून हलके फुंकर घालावी. फुंकताना फक्त आपल्या गालातलीच हवा द्यावी. छातीतली नाही.1 मिनिटामध्ये 10 ते 15 वेळा फुंकर द्यावी.
- या सर्व क्रिया करताना बाळ उबदार राहील याची काळजी घ्या. पेटती शेगडी खोलीत ठेवली तर उपयोग होईल. याऐवजी 100 वॅटचा दिवा लावणे चांगले.
- नाळ निर्जंतुक दो-याने बांधा. हल्ली निर्जंतुक दोरा बंद पाकिटात मिळतो. प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे चौकशी करा. तयार दोरा नसेल तर साधा दोरा 20 मिनिटे आधीच उकळून घ्या. ज्या कात्रीने नाळ कापायची तीही 20 मिनिटे आधीच उकळून ठेवावी. नाळ स्वच्छ फडक्याने बांधून घ्या. निर्जंतुक बँडेजपट्टी चांगली. हे नसेल तर नाळेच्या टोकाला आयोडिन लावून तशीच उघडी ठेवली तरी चालते.
- बाळाचे डोळे स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. उपलब्ध असल्यास डोळयात जंतुनाशक थेंब (टेट्रा) टाका.
- बाळाला स्वच्छ कोरडे करा व स्वच्छ सुती फडक्यात गुंडाळून ठेवा. थंडीचे दिवस असतील तर गरम राहील इतके पांघरूण वापरा. विशेषतः अपु-या दिवसांच्या बाळासाठी जास्त काळजी घ्यावी लागते. पांढरा थर खरडून काढू नये. तेल लावून साफ केल्यावर हळू हळू आपोआप निघेल.
- पहिल्यापासूनच बाळाला अंगावर पाजायला सांगा. दूध जरी लगेच आले नाही तरी असे केल्याने पान्हा फुटण्यास मदत होते. पहिला चीक जंतुरोधक असतो. तो वाया जाऊ देऊ नका. ब-याच ठिकाणी पहिले तीन दिवस बाळाला अंगावर न पाजण्याची पध्दत आहे, ती चुकीची आहे.
- बाळाला सुरुवातीला पातळ, चिकट, हिरवट, काळी शी होते. ती लगेच ओल्या फडक्याने साफ करून घ्या. बाळाच्या अंगावर शी वाळली तर ती काढताना नाजुक त्वचेवर जखमा होतात.
- बाळास काही व्यंग नाही याची तपासणी करून घ्या
नुकतेच जन्मलेले बाळ (नवजात अर्भक) 1 ते 7 दिवस
बाळाच्या प्रकृतीला धोका
खालील बाबतींत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- बाळाला उलटया होणे.
- बाळ काळे-निळे पडणे.
- 48 तास लघवी न होणे.
- पहिल्या 24 तासांत शौचास न होणे, गुदद्वार बंद असणे.
- बाळ नीट पीत नसणे, दूध ओढत नसणे.
- पहिल्या दोन दिवसांतच कावीळ होणे.
- झटके येणे किंवा हालचाल नसणे.
- ताप येणे.
- जन्मवजन दोन किलोपेक्षा कमी असणे.
- तोंडाशी फेस येणे.
नवजात अर्भकाची तपासणी – श्वसन व रक्ताभिसरण
जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते.
- पहिल्या रडण्यानंतर शांत झालेल्या मुलाचा श्वसनाचा दर प्रत्येक मिनिटाला 30 ते 40 इतका असतो. त्यात अनियमित लय असू शकते.
- त्वचेचा रंग गुलाबी असतो, श्वसनक्रियेत किंवा हृदय व रक्ताभिसरणात काही दोष असल्यास बाळाचे ओठ, डोळयाखालचा भाग, हात, पाय व नखे यांवर निळसर झाक असते.
- कधीकधी मूल पांढरट व निस्तेज दिसते. असे काही असल्यास मूल रुग्णालयात पाठवावे.
- श्वसनक्रियेत जर काही दोष असेल तर श्वसनाच्या वेळी बाळाच्या नाकपुडया फुलतात, छातीच्या फासळया आत ओढल्या जातात आणि हनुवटी व मान वरखाली होते.
- श्वसनात जास्त गंभीर दोष असेल तेव्हा श्वास सोडताना बाळ कण्हते.
विष्ठा
बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर 48 तासांपर्यंत कधीही असू शकते. 4 ते 5 दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून 12-15 वेळा शी करतात. याउलट काही बाळे 4 ते 7 दिवसात एकदा शी करु लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.
खालील तक्रारी आढळल्यास सावधानता बाळगावी.
- बाळाला शी होत नसेल तर गुदद्वार बाहेरून मोकळे आहे किंवा नाही हे करंगळी घालून तपासावे.
- तोंडाने फेस अथवा बुडबुडे काढणे आणि पहिल्या 48 तासांत एकदाही शी न करणे ही बाळाच्या पचनमार्गात अडथळा असल्याची चिन्हे असू शकतात.
- तोंडाने काहीही पाजल्यावर लगेच भडभडून होणारी उलटी किंवा हिरवी उलटी.
लघवी
मुलगा असेल तर लघवीची धार लांब पडते की नाही हे आईस विचारावे. जर लघवीची धार व्यवस्थित असेल तर (लघवीच्या पिशवीपासून ते लघवीच्या जागेपर्यंत) मूत्रमार्गात अडथळा नाही असे समजावे. पहिल्या 24 तासांत लघवी झाली नाही तर तज्ज्ञाकडे पाठवावे.
डोके
पूर्ण दिवस भरून जन्मलेल्या बाळाच्या डोक्याचा आकार बाकी शरीराच्या मानाने मोठा असतो.
जन्मताना डोक्यावर आलेल्या दाबामुळे डोक्याच्या वरच्या भागावर फुगल्यासारखे दिसते. हा फुगीर भाग 24 ते 48 तासांत नाहीसा होऊन डोक्याला सारखेपणा येतो.
डोक्याचा घेर 32-36 से.मी. (सर्वसाधारण 35 से.मी.) असतो.
टाळू
डोक्याची हाडे पूर्ण जुळलेली नसतात. त्यामुळे पुढे शंकरपाळयाच्या आकारात तर पाठीमागे त्रिकोणी आकारात टाळू असते. पुढील टाळू 1 वर्षात व मागील टाळू 1 महिन्यात भरते
हात-पाय
नवजात बाळाचे हात-पाय दुमडलेल्या अवस्थेत असतात व मुठी मिटलेल्या असतात.
शरीरावर चिकटा
जन्मताना बाळाच्या अंगावर बहुधा पांढ-या चिकट पदार्थाचे आवरण असते. जन्मानंतर खूप घासून हा चिकटा काढू नये नाहीतर नाजूक त्वचेला इजा होते. हा चिकटा हळूहळू आंघोळी सोबत 2-3 दिवसात जातो.
वजन
आपल्या देशात नवजात बाळाचे वजन 2 किलो ते 3 किलो (सर्वसाधारणपणे 2.5 किलो) असते
संप्रेरकांचे परिणाम
आईच्या शरीरातील स्त्रीसंप्रेरकांमुळे (हार्मोन्स) कधीकधी, सुरुवातीला काही दिवस बाळाचे स्तन मोठे व सुजल्यासारखे दिसतात. त्यातून कधीकधी दूधही पाझरते.
मुलगी असेल तर याच कारणाने (स्त्रीसंप्रेरकांमुळे) योनिमार्गातून एक-दोन दिवस रक्तस्रावही होऊ शकतो.
थोडया दिवसांत हे परिणाम आपोआप थांबतात.
दूध ओढणे
सर्वसाधारणपणे निरोगी बाळ जन्मल्यावर लगेच अंगावरचे दूध ओढू शकते. कमी वजनाचे/दिवसाचे मूल दूध ओढायला दमते.