Abortion Icon गर्भपात बाळंतपण
वैद्यकीय गर्भपात

या पार्श्वभूमीवर गर्भपाताचा कायदा ही एक मोठीच सुधारणा आहे. तरीही सुरक्षित गर्भपात हा स्त्रीचा सहज अधिकार म्हणून या कायद्याने मान्य केलेला नाही. सहज अधिकार हे तत्त्व सोडून इतर अनेक ‘कारणांवरून’ या कायद्यात गर्भपात मान्य केलेला आहे. मात्र या कायद्यामुळे स्त्रियांसाठी गर्भपात सोपा झालेला आहे. वैद्यकीय गर्भपातासाठी आता कायद्याने पुरुषांच्या संमतीची आवश्यकता नसते. तसेच तज्ज्ञांकडून गर्भपात केल्याने यातला धोका अगदी कमी झाला आहे. सुधारित गर्भपात कायद्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

(अ) गर्भपाताची वैध कारणे

गर्भपातासाठी खालील कारणे मान्य करण्यात आली आहेत.

  • गर्भामध्ये विकृती असल्याची शंका अथवा परिस्थिती असणे.
  • गर्भावस्थेचा मातेच्या आरोग्यास (शारीरिक अथवा मानसिक) धोका असणे.
  • होणा-या अपत्यास सामाजिक मान्यता मिळण्यासारखी नसल्यास म्हणजे उदा. विवाहबाह्य संतती, बलात्कार, फसवणूक या मार्गाने गर्भ राहणे.
  • संततिप्रतिबंधक उपाय वापरत असतानाही चुकून गर्भ राहणे.

स्त्री मानसिक अपंग असल्यास गर्भपातासाठी हे कारण पुरते. मात्र नुकताच सुप्रीम कोर्टाने याविरुध्द निकाल दिला असल्याने याबाबतीत थोडा मतभेद निर्माण झाला आहे.

स्त्री मानसिकदृष्टया अपंग किंवा अज्ञान (तिचे वय अठरा वर्षाखाली असेल) तरच गर्भपातासाठी पालकांची संमती लागते. एरवी तिची स्वतःची संमती पुरते.

स्त्रीगर्भ हे गर्भपाताचे कारण होऊ शकत नाही. असे करणे गुन्हा आहे.

(ब) गर्भपात केंद्र

शासनमान्य केंद्रावरच गर्भपात करता येतो. या ठिकाणी पुरेशी तयारी व उपकरणे, सोयी आहेत हे पाहूनच मान्यता दिली जाते. प्रत्येक हॉस्पिटलला अशी मान्यता असतेच असे नाही. 12 आठवडयांपुढच्या गर्भपातासाठी पोटावर ऐनवेळी शस्त्रक्रिया करण्याची व रक्त देण्याची सोय असल्याशिवाय त्या हॉस्पिटलला मान्यता मिळू शकत नाही. बहुतेक गर्भपात केंद्रांना 12 आठवडयाच्या आतलाच गर्भपात करता येतो.

मान्यताप्राप्त केंद्रावर ‘अधिकृत गर्भपात केंद्रा’ची पाटी असते.

  • गर्भपात केंद्र
(क) प्रशिक्षित डॉक्टर

गर्भपात करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ (M.D किंवाDGO) लागतो. अथवा खास प्रशिक्षित MBBS डॉक्टर चालतो. डॉक्टर प्रशिक्षित असल्याचे शासनाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12 आठवडयांपर्यंतचा गर्भ असेल तर एक मान्यताप्राप्त डॉक्टर लागतो. 12 ते 20 आठवडयांचा गर्भ असेल तर किमान दोन मान्यताप्राप्त डॉक्टर हजर असावेत.

20 आठवडयांच्या पुढे गर्भपात करायला मान्यता नाही. कारण यानंतर स्त्रीच्या दृष्टीने धोका वाढतो. मात्र याबद्दल काही मुदतवाढ अपेक्षित आहे.

  • अघोरी उपाय नको
(ड) गर्भपात कसा करतात

आठ आठवडयांच्या आतला गर्भ लहान असतो. हा गर्भ निर्वात पंपाने ओढणे हे एक साधे तंत्र आता वापरतात. यानंतर सहसा क्युरेटिंग लागत नाही. या साध्या तंत्राला एम.व्ही.ए. (मॅन्युअल व्हॅक्युम ऍस्पिरेशन) असे म्हणतात. याला भूल लागत नाही.

बारा आठवडयांच्या आतल्या गर्भपातासाठी खालून म्हणजे योनीमार्गाने छोटी शस्त्रक्रिया असते. यात गर्भाशयात नळी सरकवून निर्वात पंपाने आतला गर्भ ओढून घेतात यानंतर गर्भपिशवी आतून खरवडून काढतात. गर्भाशयाच्या तोंडाशी असणा-या नसांपुरती भूल देऊन हे काम करता येते.

12 ते 20 आठवडयांपर्यंतचा गर्भ सलाईन किंवा विशिष्ट औषध (प्रोस्टा ग्लॅडिन) गर्भाशयात सोडून किंवा प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. यात जास्त धोका व त्रास असतो. रुग्णालयात राहावे लागते.

  • इंजेक्शनने गर्भपात होऊ शकत नाही
एम. आर.(पाळी नियंत्रक)

पाळी चुकून 15 दिवसच झाले असतील व गर्भ नको असेल तर ही पध्दत वापरतात. ही बाब गर्भपाताच्या कायद्याच्या कक्षेत येत नाही. यात एक प्लास्टिकची सिरींज वापरतात. नळीमार्फत गर्भाशयात जे काही असेल ते शोषून घेतले जाते व त्यानंतर पाळीचे चक्र नेहमीसारखे होते. म्हणून याला ‘एम. आर.’ किंवा ‘पाळी सुरळीत करणे’ असे म्हणतात. पण पाळी चुकून 15 दिवसांपेक्षा अधिक वेळ झाला असेल तर या पध्दतीचा उपयोग होत नाही.

एम. आर. व दहा-बारा आठवडयांपर्यंतच्या गर्भपातासाठी रुग्णालयात काही तास राहणे पुरते, मात्र त्यानंतरच्या गर्भपातासाठी वेगळी पध्दत असल्याने रुग्णालयात दोन-तीन किंवा अधिक दिवस राहावे लागते.

गर्भप्रतिबंधक गोळी

लैंगिक संबंध आल्यापासून २४ तासात, एकच गोळी घेऊन गर्भसंभव टाळण्याची सोय आता झाली आहे यात स्त्रीसंप्रेरकांचा एक मोठा डोस असतो.

मेडिकल गर्भपात : ७ आठवड्या अगोदरचा गर्भपात गोळ्या/औषध घेऊन करता येतो. मात्र हे औषध स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घ्यावे. साधारण गोळ्या घेतल्यानंतर ४८ ते ७२ तासात गर्भपात होतो.

गर्भपात टाळण्यासाठी काय करावे : दिवस जाण्या अगोदर पासून डॉक्टरांकडे जाणे. पूर्वी झालेल्या गर्भपाताचे कारण शोधून सापडले तर गर्भपात न होण्यासाठी अगोदर पासून उपाय करता येतात व गर्भपात होण्याची पुनरावृत्ती टाळता येते.

झाडपाल्याचा गर्भपातासाठी वापर

गर्भपात करण्याची गरज ही पूर्वापार आहे. समाजाच्या नीतिविषयक कल्पनांमुळे बरीवाईट किंमत मोजून गर्भपात घडवून आणले जातात. खेडोपाडी गर्भपातासाठी झाडपाल्याचे औषध देणारे असतात. काही वेळा त्यांच्या औषधांचा उपयोग झाला असल्याचे पाहण्यात येते. या गोष्टी सरसकट वाईट म्हणून टाकाऊ ठरवणे किंवा योग्य म्हणून एकदम स्वीकारणे हे दोन्हीही शास्त्रीय नाही. अशा उपायांची तपासणी करून त्यात काय व किती धोका आहे हे संशोधकांनी अभ्यास करूनच ठरवायला पाहिजे. पण असे उपाय करणारे वैदू माहिती द्यायला तयार असतील तर ही औषधे काळाबरोबर नष्ट होणार नाहीत. पण आता आधुनिक वैद्यकीय तंत्र वापरून जवळजवळ निर्धोक गर्भपात करता येतो, हे आपण सांगायला पाहिजे.

गाजराचे बी, कच्ची पपई वगैरे खाल्ल्यास गर्भपात होतो असे अनेक स्त्रिया मानतात. आदिवासी भागात घरी तयार केलेली दारू ही यासाठी वापरली जाते. या सर्व पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढून गर्भपात होतो असा समज आहे. मात्र आधुनिक काळात असे प्रयोग करून जिवाशी खेळण्यापेक्षा मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात शास्त्रीय उपचार करून घेणे केव्हाही चांगले.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.