हल्ली सर्व बाळंतपणे रुग्णालयात करायची मोहीम आहे. मात्र काही बाळंतपणे अजूनही गावात घरी किंवा उपकेंद्रात होतात. उपकेंद्रात बाळंतपण करायचे असल्यास डॉक्टर उपलब्ध नसतो, तरी कुशल प्रसूतीसेविका असायला पाहिजे.
गावात बाळंतपण करायचे? मग एवढया गोष्टी बघूनच करा! बाळंतपण करतानाही लक्ष ठेवा ! : तक्ता (Table) पहा.
या सर्व सूचना बाळंतपण करतेवेळी लक्षात घेण्यासाठी म्हणून आहेत.यापूर्वीच्या नियमित तपासणीत काही धोका असल्यास त्याची वेगळी दखल पूर्वीच घेतली आहे असे समजू या.
ही माहिती, प्रत्यक्ष अनुभवानेच नीट समजते.
बाळाचे डोके खाली असेल तरच गावात बाळंतपण करा. इतर बाबतीत या सूचना गैरलागू आहेत.
या तपासणीत काही धोका अडचण आढळल्यास बाळंतपण हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे. पाठवून देताना किती वेळ शिल्लक आहे याचा अंदाज घ्या. वाटेत बाळंतपण होणार असेल तर आपण सोबत गेलेले बरे.
पहिले बाळंतपण अवघड असते, शक्यतो असे बाळंतपण गावात करू नका. तसेच पहिलटकरणीस पहिल्या व दुस-या पायरीला इतरांपेक्षा दुप्पट वेळ लागू शकतो हे लक्षात ठेवा.
गर्भाशयात कधी कधी जुळे असते. अशा वेळी तेव्हा पोट हिशेबापेक्षा मोठे दिसते. तसेच कधीकधी गर्भाबरोबर जास्त पाणी असते. अशा वेळी बाळंतपण अवघड असते.
पहिले मूल तिशीत होत असेल तर बाळंतपण अवघड असते. त्यामुळे असे बाळंतपण शस्त्रक्रियेच्या सोयी असलेल्या रुग्णालयात व्हावे.
कोवळया वयात बाळंतपण आले तर आई व मूल या दोघांनाही धोका असतो. खरे तर कायद्याने अठरा वर्षाखालील मुलीचे लग्न करणे बेकायदेशीर आहे.
या आधीच्या बाळंतपणात काही त्रास झालेला असला तर याही वेळी त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून गर्भनिदानाच्या वेळीच याबद्दलची सर्व माहिती विचारून घ्यावी.
जास्त बाळंतपणे होऊन कधीकधी ओटीपोटाचे स्नायू कमकुवत होऊन गर्भाशयाची पिशवी थोडीफार बाहेर पडते. अशा वेळी बाळंतपण अवघड जाते व गर्भाशय फाटण्याची शक्यता असते. म्हणून अशी बाळंतपणे तातडीच्या ऑपरेशनची सोय असलेल्या रुग्णालयातच व्हावीत.
बाळंतपण सुरू झाल्यावर आधी एनिमा द्या एनिमा म्हणजे सुमारे अर्धा ते एक लिटर साबणाचे कोमट पाणी नळीच्या मदतीने गुदाशयात (मोठे आतडे) सोडून आतला सर्व मळ काढून टाकणे. हे केले म्हणजे बाळंतपणात मलविसर्जन होणे टळते. यामुळे बाळ आणि आईच्या जखमा स्वच्छ राहतात. शिवाय एनिमाने ख-या कळा वाढतात व बाळंतपण सोपे होते.
गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे उघडेपर्यंत (सुमारे चार बोटे रुंद) मातेला सोसवेल तितके हिंडणे-फिरणे करू द्यावे. तसेच चहा, पाणी पिऊ द्यावे. कळा वाढल्यावर आपोआप ती एका जागी थांबेल. गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडल्यावर जमिनीवर किंवा पलंगावर स्वच्छ मेणकापड (प्लास्टिक) आणि चादर अंथरून त्यावर बाळंतपण करा.
काही स्त्रियांना उताणे पडून तर काहींना बसून बाळंतपण सोपे जाते.
खेडयांमध्ये घरी उकिडवे बसून बाळंतपण करण्याची पध्दत आहे, ती शास्त्रीयदृष्टया जास्त बरोबर आहे. बाळंतपण आडवे झोपून केल्याने जास्त अवघड जाते असा अनुभव आहे. रुग्णालयात डॉक्टर,नर्सेस यांच्या सोयीकरता बाळंतपण उताणे झोपवून केले जाते, मात्र त्यात बाळंतिणीला अधिक कष्ट पडतात. उकिडवे बसून बाळंतपण केल्याने बाळाची प्रवृत्ती आपोआप खाली सरकण्याची असते. झोपून लघवी करणे, संडास करणे, अगदी नाकातला शेंबूड काढणेही जड जाते, हा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव असतोच. हेच तत्त्व बाळंतपणातही लक्षात ठेवावे.
काही गावामध्ये उकिडवे बसण्याच्या बरोबर आणखी एक युक्ती केली जाते. छताला दोरी बांधून तिचे खाली सोडलेले टोक बाळंतीण हाताने धरून कळा घेते व जोर करते. यामुळे बाळंतपण सोपे जाते. बाळ योनिमार्गातून बाहेर येताना मात्र त्याचे डोके जमिनीवर लागणार नाही, इजा होणार नाही अशी दक्षता घेणे आवश्यक आहे.म्हणूनच प्रत्यक्ष बाळ बाहेर पडताना काही ठिकाणी उताणे झोपवण्याची पध्दत आहे.
गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडेपर्यंत मातेने कळा येताना खाली जोर देऊन आपली शक्ती वाया घालवू नये हे समजावून सांगा प्रसूतीच्या दुस-या टप्प्यातच फक्त मातेने खाली जोर करावा. विनाकारण कळा घेण्याने ओटीपोटातले स्नायू दुबळे होतात.
पाण्याची पिशवी (पाणमूठ) फुटल्यावर किंवा गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडल्यावर कळांच्या बरोबर मातेला खाली जोर करायला सांगा याबरोबरच आपल्याजवळ उकळलेली निर्जंतुक कात्री किंवा कोरे ब्लेड, दोरा, (20 मिनिटे उकळलेला), बाळ घेण्यासाठी टोपले किंवा पाटी, पुरेसे स्वच्छ कपडे, गरम पाणी (एक बादली) हात धुण्यासाठी साबण आहेत याची खात्री करून घ्या.
गरोदरपणातील, बाळंतपणातील धोके : वेळीच रुग्णालयात न्या. (तक्ता (Table) पहा)
बाळाचे डोके बाहेर दिसायला लागल्यावर त्याच्या डोक्याच्या बाजूची योनिमार्गाची कातडी बोटे फिरवून सैल करणे, मागे करणे वगैरे उपाययोजून डोके लवकरात लवकर बाहेर पडेल यासाठी प्रयत्न करा. कळा आल्यावर मातेला खाली जोर करायला सांगा. वाट लहान पडत असल्यास, तेवढा भाग बधीर करून (लिग्नोकेन इंजेक्शन) कात्रीने योनिमार्गास छेद देऊन वाट मोठी करता येते. पण हे तंत्र शिकून घ्यावे लागते, नाही तर बाळाला कात्री लागण्याची भीती असते. पहिलटकरणीत हे तंत्र सर्रास वापरले जाते. यामुळे योनिमार्ग वेडावाकडा फाटत नाही व परत जुळणी चांगली होते. पण प्रत्येक पहिलटकरणीस छेदाची गरज नसते. योनिमार्ग लहान असेल तरच छेद द्यावा.
डोके बाहेर पडल्यानंतर आधी त्याचा घसा नळीने साफ करा. त्यानंतर दोन हातांच्या मदतीने धीमा ताण द्या. म्हणजे बाळाचे सर्व शरीर बाहेर येईल. मानेभोवती नाळेचा वेढा असेल तर तो सैल करा किंवा चिमटे लावून नाळ मध्ये कापून घ्या, म्हणजे बाळ गुदमरणार नाही.