विषम म्हणजे वाईट. यापूर्वी या तापात रोगी दगावण्याचे प्रमाण फार होते म्हणून हे नाव पडले असावे. हा आजार सांसर्गिक आहे आणि तो आतडयातून शरीरात प्रवेश करतो. पण त्याचे परिणाम सर्व शरीरात होतात.
हा आजार पटकीप्रमाणे दूषित अन्नपदार्थामुळे पसरतो. शहरांतही याचे रुग्ण आढळतात. हा रोग सूक्ष्मजंतूंमुळे (जिवाणू) होतो. काही लोकांना त्यांची लागण झाली तरी बाधत नाही. पण हे लोक रोग मात्र पसरवत असतात. अशा लोकांना ‘रोगजंतूवाहक’ म्हणू या. अशा रोगवाहक व्यक्तींवरही उपचार केले पाहिजेत. हा आजार जास्त करून 8-13 या वयोगटात होतो.
दूषित अन्न, पाणी, दूध, अस्वच्छ हात, दूषित पाण्यातल्या भाज्या व मासे यांमार्फत हे रोगजंतू पोटात शिरकाव करतात. रोगजंतू प्रवेशानंतर 1 ते 3 आठवडयात आजार सुरु होतो.
हे जंतू पचनसंस्थेतल्या रसग्रंथींमध्ये राहून वाढतात. रक्तात त्यांची विषद्रव्ये पसरतात. त्यामुळे ताप आणि थकवा येतो. या रसग्रंथी सुजून नंतर फुटतात. यानंतर आजार जास्त वाढतो.
विषमज्वरात सतत जास्त ताप, डोकेदुखी, खूप थकवा, भूक नसणे, पोटदुखी कधी पातळ हगवण या मुख्य खाणाखुणा असतात. तापाची इतर कारणे तपासणे आवश्यक आहे. रोगनिदानासाठी तापाचा तक्ता व मार्गदर्शक पाहा. विषमज्वराची शंका आल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवा. उपचाराअभावी ताप 3 आठवडयांपर्यंत राहतो. यानंतर आतडयात रक्तस्राव होऊ शकतो.
विषमज्वर रोगनिदानासाठी काही विशेष तपासण्या आवश्यक असतात.
आपल्या देशात यासाठी विडाल रक्ततपासणी केली जाते. ही रक्ततपासणी फार भरवशाची नाही. मुख्य म्हणजे आठवडयाच्या अंतराने अशा दोन तपासण्या कराव्या लागतात. पहिल्या तपासणीपेक्षा दुस-या तपासणीत अनेक पटीने विषमज्वर प्रतिज्घटक सापडल्यासच निदान करता येते.
याऐवजी अस्थिमज्जा किंवा रक्तातील जंतूंसाठी केलेली तपासणी जास्त खर्चाची असते. पण या तपासणीत जंतूंची वाढ होईपर्यंत 2-3 दिवस जावे लागतात.
ग्रामीण भागात याऐवजी लघवीवर एक झटपट तपासणी आपल्यालाही करता येईल. यासाठी परीक्षानळीत रुग्णाच्या लघवीचा नमुना घेऊन त्यात डायझोरिएजंट हे रसायन मिसळून परीक्षानळी चांगली हलवावी. लघवीला लाल रंगाचा फेस आल्यास टायफॉइडची 80% खात्री समजावी. (उरलेल्या 20% रुग्णात ही तपासणी आजार असूनही निगेटिव्ह – नकारार्थी येते)
विषमज्वरात ऍस्पिरिन देऊ नये, कारण आतडी दुबळी झालेली असतात. ऍस्पिरिनने अचानक आतडयास छिद्र पडण्याची शक्यता असते. अचानक पोटात दुखू लागल्यास अन्नपाणी देऊ नये; तज्ज्ञाकडे पाठवावे.
विषमज्वराच्या आजारावर वेळीच उपचार झाले नाही तर अनेक प्रकारचे धोके संभवतात.
लवकर व योग्य उपचार झाल्यास हे सर्व दुष्परिणाम टळू शकतात. म्हणूनच या आजाराची शंका आल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे जाणे आवश्यक आहे.
विषमज्वराची लस पूर्वी इंजेक्शन स्वरुपात उपलब्ध होती. मात्र आता ही लस उपलब्ध नाही. ही लस परिणामकारक होती पण सूज, ताप, इ. दुष्परिणामांमुळे ती थोडी त्रासदायक होती. शासनाने उत्पादन बंद केल्यामुळे एका स्वस्त आणि चांगल्या लसीपासून आपण वंचित आहोत.
आता तोंडाने घेण्याची लस (कॅप्सूल स्वरुपात) उपलब्ध आहे. जेवणाआधी अर्धा तास याची कॅप्सूल घ्यायची असते. याचे एकूण तीन डोस असतात. (1ला दिवस, 3रा व 5 वा दिवस) दर तीन वर्षांनी याचा एक बूस्टर डोस आवश्यक आहे.
ही लस 6 वर्षाखालील मुलांना देऊ नये. या लसीने 70% संरक्षण मिळते. याचा काहीच त्रास होत नाही. वैद्यकीय स्टोअरमध्ये ही लस टायफोरल या नावाने उपलब्ध आहे. इतरही नावे आहेत.
याशिवाय नवीन लस इंजेक्शन स्वरुपात उपलब्ध आहे. ही 2 वर्षे वयानंतर कोणालाही देता येते. याने 2 आठवडयात प्रतिकारशक्ती निर्माण होते व ती 2 वर्षेपर्यंत चांगली टिकते. याचे एकच इंजेक्शन असते व दर दोन वर्षांनी बूस्टर घ्यावे लागते.