उचकी म्हणजे श्वासपटलाची वारंवार होणारी प्रतिक्षिप्त क्रिया. जठराच्या वरच्या भागात दाह झाल्याने उचकी लागते. तिखट, दारू, इ. पदार्थांमुळे असा त्रास होतो.
जेवणात उचकी लागल्यास थोडा गूळ खाऊन पाणी प्यावे. अशी उचकी 1-2 तासांत थांबते. गुळाने उचकी न थांबल्यास सूतशेखर ऍंटासिड किंवा फॅमोटिडीन गोळीचा उपयोग होईल.
दिवसदिवस उचकी लागत असल्यास डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. यामागे मूत्रपिंडाचा आजारही असू शकेल.
आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते.
आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.
आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.
आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, फेरम फॉस, लायकोपोडियम, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सल्फर.