harmon icon संप्रेरके व संप्रेरक विकार (हारमोन्स)
संप्रेरके व संप्रेरक विकार (हारमोन्स)
प्रास्ताविक

Hormone शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत. त्यांत मुख्य प्रकार दोन आहेत. पहिला प्रकार म्हणजे तयार होणारा रस नळीवाटे आणून सोडणा-या ग्रंथी उदा. लालोत्पादक पिंड, स्वादुपिंडाचा काही भाग, यकृत, इ. या ग्रंथींतून तयार होणारे रस ‘स्थानिक’ स्वरुपाची कामे करतात. (उदा. लाळेमुळे पचनाची सुरुवात होणे, पित्तरसामुळे आतडयात स्निग्ध पदार्थाचे पचन होणे, इ.)

ग्रंथींचा दुसरा प्रकार म्हणजे अशी नळी नसलेल्या ग्रंथी. यांचा रस सरळ रक्तात मिसळतो. या ग्रंथींतून किती रस पाझरावा याचे नियंत्रण रक्तातील रासायनिक घडामोडींवर व चेतासंस्थेच्या आदेशावर अवलंबून असते.

या दुस-या प्रकारच्या ग्रंथींमध्ये तयार होणा-या रसांना ‘संप्रेरक’ रस म्हणता येईल. कारण या रसांमुळे शरीरातील अनेकविध क्रियांचे प्रेरण व नियंत्रण होते. या संप्रेरकांचे काम अगदी विशिष्ट असते. उदाहरणार्थ, पुरुषसंप्रेरकांमुळे ‘पुरुषी लक्षणे’ दिसतात. थायरॉईड किंवा गलग्रंथीतून येणारी संप्रेरके शरीरातल्या अनेक रासायनिक घडामोडींवर नियंत्रण ठेवतात. पिटयुटरी या मेंदूखालच्या ग्रंथीतून येणा-या संप्रेरकांमुळे शरीराची वाढ होते. स्त्रीबीजांडातून येणा-या संप्रेरकांमुळे स्त्रीत्वाची लक्षणे, गर्भधारणा, इत्यादी गोष्टी शक्य होतात.

आपल्याला संप्रेरकांच्या अस्तित्वाची जाणीव सहसा होत नाही. जेव्हा संप्रेरकांचे प्रमाण कमीजास्त होऊन शरीरात उलथापालथ होते तेव्हाच ही जाणीव होते. हे बदल अचानक होतात किंवा हळूहळू दिसतात. पण संप्रेरकाच्या पातळीतल्या बदलांचे परिणाम निश्चितपणे खूप दूरवर होतात.

काही संप्रेरके आता तयार करता येतात. आता संप्रेरकांच्या कामांची यादी जरा पाहू या.

संप्रेरके म्हणजे रासायनिक पदार्थ असतात. त्यांचे काम अगदी विशिष्ट प्रकारचे असते. संप्रेरकांची रक्तातील पातळी अगदी सूक्ष्म आणि काटेकोर असते. त्यात थोडा फरक पडला तरी त्या त्या कामावर दूरगामी परिणाम होतात.

काही संप्रेरके वाढीच्या कामासाठी आवश्यक असतात. उदा. पिटयुटरीमधून येणारे ‘वाढ संप्रेरक'(ग्रोथ हार्मोन), तसेच गलग्रंथीतून येणारे थायरॉक्झिन. वाढीच्या काळात यांचे प्रमाण कमी असेल तर वाढ खुंटते. वाढ संप्रेरकांचे वाढीच्या काळातले प्रमाण गरजेपेक्षा जादा असेल तर उंची व रुंदी प्रमाणाबाहेर वाढतात, अगदी आठ-नऊ फुटांपर्यंत उंची जाऊ शकते.

स्त्रीसंप्रेरकांचे काम अनेकविध स्वरुपाचे असते उदा. मासिक पाळी येणे, स्त्रीबीज बाहेर पडणे, गर्भधारणा, स्त्रीत्वाची इतर लक्षणे – आवाज मृदू असणे, चरबीचे प्रमाण, अवयवांची गोलाई, केसांची विशिष्ट ठेवण, स्त्री-जननसंस्थेची वाढ व कार्य, इ.

पुरुषसंप्रेरकांचे कामही अगदी विशिष्ट असते. उदा. दाढीमिशा, लैंगिक इच्छा, शरीरातील ठेवण, पुरुषी आवाज, इ.

स्त्रीसंप्रेरकांचा उपयोग मोठया प्रमाणात कुटुंबनियोजनासाठी होत आहे. पुरुषसंप्रेरकेही जास्त प्रमाणात वापरली जात आहेत. यांचा दुरुपयोगही मोठया प्रमाणावर होत आहे. या प्रकरणात संप्रेरकांच्या कमीजास्त प्रमाणाने होणा-या आजारांची माहिती घेऊ या.

पिटयुटरी ग्रंथी

Breastfeeding ही ग्रंथी डोक्याच्या कवटीत मेंदूच्या खाली एका सुरक्षित कप्प्यात असते. यातून अनेक प्रकारची संप्रेरके तयार होतात. वाढ-संप्रेरक हे वाढीसाठी आवश्यक असते.

दूध संप्रेरक (प्रोलॅक्टीन) हे प्रसूत झालेल्या मातेच्या स्तनातून दूध सुटण्यास प्रेरणा देते. यातील इतर सर्व संप्रेरके शरीरातील इतर रसग्रंथींच्या (गलग्रंथी, स्त्रीबीजांड, ऍड्रेनल ग्रंथी) कामावर नियंत्रण ठेवतात. म्हणजे पिटयुटरी ही शरीरातील जवळजवळ मुख्य संप्रेरक ग्रंथी आहे.

पिटयुटरी ग्रंथीतून पाझरणा-या वाढ संप्रेरकांचे प्रमाण जास्त असेल तर शरीराची वाढ जास्त होते. यामुळे जास्त उंची, मोठा चेहरा व जबडा, हाताचे व पायाचे मोठे पंजे अशा खाणाखुणा दिसतात.

याउलट लहानपणीच वाढ संप्रेरक कमी पडल्यास उंची कमी, चेहरा लहान, लहान जबडा अशा खाणाखुणा दिसतात. वाढ संप्रेरक कमी किंवा जास्त असेल तर उपाय करता येतात. मात्र आजार वेळीच आटोक्यात आला पाहिजे. या आजारांचे प्रमाण फारसे नाही.

पिटयुटरी ग्रंथी काम कसे करते?

सहज माहितीसाठी आपण दूधसंप्रेरकाचे काम पाहू या. गरोदरपणात स्तनांची वाढ होतच असते. दूधसंप्रेरकाने स्तनातील दूध निर्माण करणा-या भागाची वाढ होते व चरबीही वाढते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीनंतरच स्तनातून स्त्राव यायला सुरुवात होते. बाळंतपणानंतर लगेच दूध बाहेर पडण्याची क्रिया होणे आवश्यक आहे. एकदा सुरू झाल्यावर मग ही क्रिया प्रत्येक स्तनपानाच्या वेळी आपोआप होते. बाळाला अगदी पहिल्यांदा स्तनपान देताना बाळाचे ओठ बोंडाला लागून चेतासंस्थेतर्फे हा चोखण्याचा संदेश पिटयुटरी ग्रंथीपर्यंत पोहोचतो व त्यातून दूधसंप्रेरक पाझरते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष दुग्धजनक पेशींवर होऊन दूध यायला सुरुवात होते. (बाळंतपणाआधी मात्र ही क्रिया होऊ शकत नाही). बाळंतपणानंतर लवकरात लवकर म्हणजे चार-सहा तासांत ही घटना घडणे फायद्याचे असते. जेव्हा हे घडत नाही तेव्हा स्तनपान सुरूच होत नाही किंवा दूध लवकर उतरत नाही.

स्त्रीबीजांडाचे कामकाज चालण्यासाठीही पिटयुटरीतून अनेक संप्रेरके येतात. या संप्रेरकांमुळे स्त्रीबीज तयार होते, ते बाहेर पडते, शिवाय आणखी काही महत्त्वाची कामे होतात. यामुळे मासिक पाळीचे चक्र चालू राहते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.