आरोग्य कायदा
वैद्यकीय प्रमाणपत्र
डॉक्टरांकडून मिळणा-या वैद्यकीय प्रमाणपत्रांबद्दल काही सूचना अशाः
- वैद्यकीय सर्टिफिकेटवर पुढील नोंदी असतात. व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता, तपासण्याची वेळ, तारीख, वय, जखमेबद्दल नोंदी (किती, कोठेकोठे, कशा प्रकारच्या), गंभीर आहे किंवा नाही, जखमेचे कारण (उदा. कोणत्या शस्त्राने), जखम होऊन अंदाजे किती वेळ झाला आहे. शेवटी संबंधित व्यक्तीला ओळखण्याच्या शारीरिक खुणा (उदा. तीळ ) व सहीशिक्का.
- सरकारी डॉक्टरांकडून पोलीस केसमध्ये मूळ प्रतीसाठी कोणतीही फी आकारली जाऊ नये. नातेवाईकांना नक्कल प्रत हवी असल्यास ठरावीक फी आकारली जाते.फी घेतल्यास त्याची शासकीय पावती देणे डॉक्टरवर बंधनकारक आहे.
- ब-याच वेळा पुढील तपासणी करण्यासाठी (एक्स-रे, इत्यादी) किंवा जास्त उपचार करण्यासाठी मोठया सरकारी रुग्णालयात, बहुधा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले जाते. असे असेल तर रुग्णालयातून घरी जातानाच प्रमाणपत्राची मागणी करावी. नंतर ते प्रमाणपत्र मिळणे अवघड असते.
- दखलपात्र नसतील अशा घटनांमध्ये बहुधा संबंधित व्यक्ती डॉक्टरचे प्रमाणपत्र पोलिसात नेऊन देते. दखलपात्र घटना असेल तर ही प्रमाणपत्र मिळवण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेची आहे.
- वैद्यकीय प्रमाणपत्राची नक्कल (झेरॉक्स) करता आली तर तशी नक्कल जवळ ठेवून घ्यावी.
वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसात पोहोचल्यानंतर त्यावर गांभीर्याप्रमाणे कार्यवाही होते. दखलपात्र नसेल तर ती केस सरकारतर्फे (किंवा आवश्यक वाटल्यास खाजगी जबाबदारीवर) प्रथमश्रेणी कोर्टात उभी राहते. त्या वेळेस सर्व साक्षीदारांना कोर्टातर्फे खर्च देण्यात येतो. पण खरे तर या खटल्यांचा खर्च, मानसिक त्रास, वेळ व खटपटी पाहता शक्यतो आपसात या गोष्टी मिटवाव्यात हे उत्तम.
घरातला हिंसाचार
आमच्या दवाखान्यात यशोदा इतकी वर्षे अंगदुखीसाठी म्हणून येते, पण ही साधी कष्टाची अंगदुखी नसून दारूडया नव-याची मारहाण आहे हे कळायला उशीरच झाला खरा. तिच्या कोपरावर खरचटलेले आणि गालावर वळ पाहिल्यावरच मला शंका आली. खोदून विचारल्यावर तिने खरी कहाणी सांगितली. गेली वीस वर्षे हा छळ जवळजवळ रोज संध्याकाळी चालू आहे, आणि तिच्या चार लेकी हे सर्व भरल्या डोळयांनी पहातपहातच लहानाच्या मोठया झाल्या आहेत. आता ही सवय मोडणे अवघड आहे, सुरुवातीसच काही उपाय केला असता तर हा छळ कदाचित थांबू शकला असता.
शेकडा सुमारे चाळीस घरांमध्ये स्त्रियांना मारहाण होते. त्यात मुख्य प्रकार म्हणजे नव-याने बायकोला मारणे, याशिवाय सास-याने सुनेला मारणे, भावांनी बहिणीला मारणे,क्वचित मुलांनी आईला मारणे हेही प्रकार घडतात. शिवीगाळ, लाथा, थपडा, डोके आपटणे आणि काठी चपलांनी मारहाण, कधी कधी चक्क खूनसुध्दा! एवढे होऊन तक्रार क्वचितच होते. बाईचा जन्म म्हणून या सर्व गोष्टी खपून जातात.
कारणे?
- दारूडे नवरे तर मारहाण करतातच, पण दारूडे नसलेलेही तितकेच मारझोड करतात.
- गरिबी हे कारण म्हणाल तर श्रीमंत घरामध्येही मारहाण होते, धार्मिक घरामध्येही असे प्रकार घडतात.
- शेतकरी, कामगार, व्यापारी, बडे नोकरदार अशा सर्व कुटुंबातही असे प्रकार घडतच असतात.
- वरवर दिसणारी कारणे क्षुल्लक असतात, उदा. जेवण आवडले नाही, सासूशी नीट बोलली नाही, इ. पण खरी कारणे वेगळी असू शकतात.
- लैंगिक असमाधान/ समस्या, हुंडा, जमीन जुमल्याचा वाटा, नव-याचे इतर स्त्रियांशी संबंध अशी अनेकानेक कारणे यात असू शकतात.
- विशेष म्हणजे भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही ही समस्या आहे. याला प्रगत देशही अपवाद नाहीत. मात्र भारतात काही विशेष घटक यात कारणीभूत ठरतात.
- मुलीचे लग्नावेळी वय लहान असणे, शिक्षणाचा अभाव, स्त्रियांना अर्थार्जनाची संधी नसणे (त्या कष्ट कमी करत नाहीत) जुळवून केलेली लग्ने (मुलगी देणे), एकत्र कुटुंबपध्दतींचा रामरगाडा, जातपातीच्या तटबंद्यांमुळे शेजार समाजाचा आधार नसणे, कायदेशीर मदत जवळपास उपलब्ध नसणे वगैरे अनेक कारणांमुळे स्त्रियांची कुचंबणा होते.
तरी देखील याही परिस्थितीत आपण काहीतरी करणे आवश्यक आहे. काय करता येईल याची थोडक्यात रूपरेखा या प्रकरणात मांडली आहे.