Pregnancy Childbirth Icon गरोदरपणातील काळजी
गरोदरपणातील धोके व काळजी
गरोदरपणातील धोक्याची लक्षणे, चिन्हे व आजार

Dangers Pregnancy Symbol मागच्या प्रकरणात आपण गरोदरपणातील सामान्य तक्रारी व त्यांची काळजी याबद्दल वाचले. या प्रकरणात धोक्याची चिन्हे व लक्षणे याबद्दल शिकू या. (बाळंतपणातले धोके वेगळया प्रकरणात दिले आहेत.)

गरोदरपणातील धोक्याची लक्षणे चिन्हे व आजार

सतत उलटया होणे

पहिल्या तिमाहीत सकाळी होणारी मळमळ बहुधा आपोआप थांबते. क्वचित उलट्या न थांबता वाढत राहतात व पोटात काहीही टिकत नाही. अशा वेळी गर्भात दोष असण्याची शक्यता असते. सतत उलट्यांमुळे मातेची प्रकृती नाजूक बनते. अशा वेळी ताबडतोब रुग्णालयात तपासणीसाठी नेणे आवश्यक असते. लघवी कमी होणे अथवा गडद पिवळ्या रंगाची होणे हे पण धोक्याचे लक्षण मानावे.

रक्तद्रव्याचे प्रमाण फार कमी असणे (रक्तपांढरी)

Blood Pressure Disorder रक्तद्रव्याचे प्रमाण 7-12 ग्रॅम असल्यास सौम्य रक्तपांढरी समजावी. मात्र रक्तद्रव्याचे प्रमाण सहा ग्रॅमपेक्षाही कमी असल्यास माता व गर्भ ह्या दोघांनाही धोका असतो. म्हणून अशा वेळी रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे.

पायावर सूज येणे

Inflammation गरोदरपणात चेहरा व पायावरची सूज ही रक्तपांढरी किंवा आणखी एका धोकादायक रोगात (गर्भाररोग) येते. कधीकधी योनिद्वारावर सूजही येते.

या रोगामध्ये गर्भ पडण्याचा धोका तर असतोच, पण तो पडला नाही तर गर्भाची वाढ अपुरी होते. तसेच मातेला झटके यऊ शकतात, बेशुद्धी व मृत्यू येऊ शकतो. या आजारात रक्तदाबाचे प्रमाण वाढते व लघवीमध्ये प्रथिने उतरतात. यासाठीच गरोदरपणात वारंवार रक्तदाब व लघवी तपासावी लागते. चेहरा वा पाऊल यावरची सूज हा धोक्याचा इशारा आहे. सुजेचे व रक्तदाबाचे जसे प्रमाण असेल त्याप्रमाणे घरी किंवा रुग्णालयात उपचार केले जातात. डोळ्यासमोर अंधारी येणे, डोकं दुखणे, अंधूक/धूसर दिसणे, अचानक पोटात दुखणे, झटके येणे, यासाठी लवकर डॉक्टरकडे नेले पाहिजे. मात्र केवळ पावलांवर सूज येणे ही सामान्य घटना आहे.

  • अकस्मात रक्तस्त्राव होणे
  • अंगावरून पाणी जाणे
आयुर्वेद

या आजारावर इतर उपचारांबरोबरच अनंतमूळ पाच ग्रॅम + मंजिष्ठा पाच ग्रॅम पावडर कपभर पाण्यात उकळून काढा करावा. हा काढा दिवसातून घोट घोट तीन-चार वेळा द्यावा. असे पाच-सात दिवस करावे. सूज जास्त असल्यास पुनर्नवा पाच ग्रॅम वरील मिश्रणात घालावा व काढा करावा. हा काढा दिवसातून दोन-तीन वेळा अर्धा-अर्धा कप द्यावा. याप्रमाणे सात दिवस उपचार करावेत.

ओटीपोटात खूप दुखणे (अस्थानी गर्भ?)

Female Reproductive Diagram काही वेळा गर्भ नेमका गर्भाशयात न राहता गर्भनलिका किंवा त्यांच्याही बाहेर वाढतो. पहिल्या तिमाहीपर्यंत वाढल्यावर त्याला गर्भनलिकेतली जागा पुरत नाही. तो गर्मनलिकेत दाबला जाऊन नंतर फुटतो. यामुळे घातक रक्तस्राव होतो. ओटीपोटातले तीव्र दुखणे असेल, विशेषतः चक्करही आली असेल तर धोक्याचा इशारा समजा. यासाठी ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे. सोनोग्राफीत हा दोष स्पष्टपणे समजून येतो. म्हणूनच पाळी चुकल्यावर गर्भनिदान करून घेणे चांगले असते.

रक्तस्राव

एकदा गर्भ राहिल्यानंतर बाळंतपण होईपर्यंत अंगावरून सहसा रक्त जात नाही. मात्र गर्भाशयात वार चुकीच्या जागी रुजली असेल किंवा गर्भ गर्भाशयातून अचानक सुटू लागला तर अंगावरून रक्त जाते.

सामान्यपणे वार गर्भाशयाच्या बाजूला किंवा वरच्या अंगाला असते, पण ती गर्भाशयाच्या तोंडावर असेल तर मात्र अचानक रक्तस्राव सुरू होऊ शकतो. अशा वेळी पोटात दुखत नाही. पण माता व बाळ या दोघांनाही गंभीर धोका असतो. अशा वेळी ताबडतोब रुग्णालय गाठणे आवश्यक असते. असा रक्तस्राव बहुधा तिस-या तिमाहीत होतो.

पोटात दुखून रक्तस्राव होत असेल तर गर्भपात होण्याची शक्यता असतेच. पण ही घटना सात महिन्यांनंतरची असेल तर कारणे वेगळी असतात. अशा मातेलाही ताबडतोब रुग्णालयात नेणे आवश्यक असते.

थोडक्यात म्हणजे गरोदरपणात अंगावरून रक्त जाणे ही धोक्याची खूण आहे. अशा वेळी विलंब प्राणघातक ठरू शकेल. काही वेळा शस्त्रक्रियेने गर्भाशय उघडून आतला गर्भ काढून टाकणे भाग पडते. यासाठी ताबडतोब योग्य रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे.

इतर आजार

Reverse Basics Stomach मातेस हृदयविकार, मधुमेह, दमा, मूत्रपिंडाचे आजार, कावीळ, क्षयरोग, इत्यादींपैकी काही आजार असेल तर बाळंतपणात त्याचा विशेष त्रास होतो. अशा मातांना रुग्णालयात पाठवावे.

पोटात मूल उलटे किंवा आडवे राहणे

तिस-या तिमाहीत, विशेषकरून नवव्या महिन्यानंतर बाळाचे डोके वर (किंवा बाजूला) असल्यास धोका संभवतो. याचा अर्थ बाळाचे डोके व बाळंतपणाची वाट यांचे नीट जुळत नाही असा आहे. असे बाळंतपण धोक्याचे असू शकते. बाळाचा हात किंवा पाय आधी बाहेर पडतो व मग उरलेला भाग बाहेर येणे अवघड होते. म्हणून बाळाचे डोके खालच्या बाजूला नसेल तर ऑपरेशनची सोय असलेल्या रुग्णालयात बाळंतपण करणे आवश्यक आहे. म्हणून शेवटच्या तिमाहीत बाळाचे डोके खाली आहे की नाही याची खात्री करणे जरूर आहे.

शेवटच्या एक-दोन आठवडयांत बाळाचे डोके ओटीपोटात न जाणे (मस्तकप्रवेश न होणे)

बाळाचे डोके ओटीपोटात खोल जाणे व आत घट्ट बसणे याला ‘मस्तकप्रवेश’ असे म्हणता येईल. पहिलटकरीण असल्यास प्रसूतीच्या संभाव्य तारखेच्या आधी दोन आठवडे ‘मस्तकप्रवेश’ होत नसेल तर बाळंतपणात अडचण येण्याची शक्यता आसते. डोके प्रसूतीच्या वाटेपेक्षा मोठे आहे किंवा आणखी काही अडचण आहे असा याचा अर्थ असतो. नंतरच्या बाळंतपणामध्ये मात्र ‘मस्तकप्रवेश’ अगदी शेवटी शेवटी होतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.