नाशिकच्या आरोग्यसेवा- भविष्यकालीन वृत्तपत्र लेखन

माझ्या अभ्यासाप्रमाणे नाशिक शहर (जिल्हादेखील) आरोग्यसेवा-सघन आहे. जास्तीत जास्त डॉक्टर्स, रुग्णालये, फार्मसीज, लॅब्ज असे येथे भरपूर आहे. उत्तर महाराष्ट्रातले काही रुग्ण येथे येत असतील पण इथले काही शिर्डी, मुंबई, पुणे इकडेही जातात. अशा एका आरोग्य वैद्यकीय सेवांची कल्पना करता येईल का की जिथे उत्तर महाराष्ट्रच नाही तर मुंबई-पुण्याचे व कदाचित परदेशी रुग्णही आरोग्य सेवा घ्यायला येतील. नाशिकचे हवामान, निवांतपणा, निसर्ग व पुणे-मुंबई रस्ता सोडता इतर कनेक्टिव्हीटी याला निश्चिततच अनुकूल आहे. स्मार्ट हेल्थ मेडिकल सिटी असे काहीतरी असायला हवे. मनपा, राज्य शासन, धर्मादाय संस्था, कॉर्पोरेट्स आणि एकूण खाजगी वैद्यकीय क्षेत्राने याबद्दल एकत्र विचार केला पाहिजे, असे शक्य आहे. नाशिकची वैद्यकीय उलाढाल अशी स्मार्ट वैद्यकीय व्यवस्था सांभाळायला आजही पुरेशी आहे. गरज आहे ती एकाधिक आकृतीबंधांची, राजकीय, प्रशासकीय व वैद्यकीय नेतृत्वाची आणि योग्य नियोजनाची.

चांगल्या आरोग्य वैद्यकीय सेवा त्रिस्तरीय असायला पाहिजेत, पहिला स्तर जनरल प्रॅक्टीशनर्स व पॅरामेडिक्सचा, दुसरा स्तर बेसिक स्पेशालिटिज (उदा. स्त्रीरोग, बालरोग, ऑर्थो, जनरल सर्जरी व फिजिशियन वगैरे) आणि तिसरा स्तर म्हणजे सुपरस्पेशालिटी (खरे म्हणजे सब स्पेशालिटी) सेवांचा. या तिन्ही स्तरांची रचना, परस्पर संबंध आणि समुचित वापर करून आदर्श वैद्यकीय सेवा घडवता येतात. यासाठी आता डॉक्टरांनी गटा गटांनी एकत्र येऊन तिन्ही स्तरांवर सोयी सुविधांची पुनर्रचना किंवा नवस्थापना करायला पाहिजे. या पुनर्रचनेसाठी एक वैद्यकीय आर्किटेक्चर आणि नगररचना तयार व्हायला पाहिजे.

कोणतीही चांगली आरोग्यसेवा केवळ रुग्ण, डॉक्टर, रुग्णालये, तंत्रज्ञान आणि अर्थपुरवठा एवढ्यावरच उभी राहत नाही तर त्यासाठी एक आवश्यक सामाजिक तत्वज्ञान, शास्त्रीयता व उत्तरदायित्व अशी ‘सॉफ्ट’ तत्वे व प्रणाली यासाठी आवश्यक आहे. सोपे करून सांगायचे झाले तर जिल्ह्यातल्या किंवा इतर शहरांमधल्या रुग्णांमध्ये अशी भावना व विश्वाआस निर्माण व्हायला हवा की या शहरात माझ्यावर शास्त्रीय, सहानुभूतीपूर्ण व परवडतील असे उपचार मिळू शकतील. हे म्हटले तर सोपे आहे म्हटले तर अवघड. शिवाय अशा नवरचनेत एक किमान दर्जा नियंत्रण, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असायला हवे. यासाठी सॉफ्टवेअर भरपूर असले तरी आरोग्यसेवांचा आशय तसा मुळात व्हायला हवा. यासाठी आरोग्य व्यवस्थेचे संशोधन व व्यवस्थापन करणार्यास संस्था लागतात. निकोप स्पर्धा ही अशीच एक आवश्यक गोष्ट आहे. माझ्या मते इथून पुढे रुग्णालय क्षेत्रात(अ) सार्वजनिक, (सरकारी व मनपा) (ब) धर्मादाय (चरिटेबल ट्रस्ट, सोसायटी किंवा सेक्शन २५ कंपनी) आणि (क) कॉर्पोरेट्स असे तीन उपप्रकार शिल्लक राहतील, कौटुंबिक मालकीची मोठी रुग्णालये अपवादात्मक राहतील किंवा या तीन पैकी ब किंवा क गटात रुपांतरीत होतील. पुढे लागणारे तंत्रज्ञान आणि आर्थिक गुंतवणूक व इन्शुरन्स सारख्या अर्थपूरक व्यवस्था ब किंवा क प्रकारांनाच मदत करतील असा कल आहे. काही किमान आकाराच्या व स्पेशालिटी बहुलता असलेल्या गटांना भांडवल व्यवस्थापन, तंत्रज्ञान -गुंतवणूक, मनुष्यबळ व्यवस्थापन व स्पर्धात्मकता टिकवून ठेवायला सोपे जाईल आणि व्यक्तिश: रडत बसण्यापेक्षा हा मार्ग सोपा राहील. अशी व्यवस्था हवी असल्यास मनपा आणि शासनाने काही राखीव प्लॉट्स सवलतीने देणे, संरचनात्मक सोयी करणे आणि सार्वजनिक इन्शुरन्स कंपन्यांनी अशा रुग्णालयांना त्या क्षेत्रात प्राधान्य देणे असे होऊ शकते किंवा व्हायला हवे.

पण त्रिस्तरीय रचना व व्यावसायिक पुनर्रचनेपेक्षा देखील एक पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय शास्त्र व नीतीमत्ता धरून संशोधन होत राहणे. जगभर सध्याच्या अतिरोबोटिक तंत्रज्ञान वापरावर पुनर्विचार होत आहे याचा खर्च प्रगत देशांना देखील परवडत नाही, भारत तर किस झाड की पत्ती. त्यामुळे आरोग्य वैद्यकीय क्षेत्रात मशिन-उपकरण-तंत्रज्ञ, तंत्र यांचे व्यापारी प्राबल्य होण्यापेक्षा कमी खर्चाचे अधिक गुणकारी उपचार शोधून काढणे, ते सिद्ध करणे व रुग्णांसाठी उपलब्ध करणे हे महत्त्वाचे असते. यासाठी चांगल्या डॉक्टरांबरोबरच वैद्यकीय व इतर तंत्रज्ञान महाविद्यालये व संस्था लागतात. खरे तर नाशिकमध्येच आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. तिथल्या संशोधनाबद्दल मला फारशी माहिती नाही. मविप्र चे मेडिकल कॉलेज व संशोधन संस्था आहे, त्याच्याही संशोधनाबद्दलफारशी माहिती नाही. नाशिकमध्ये कदाचित नवीन शासकीय महाविद्यालय होऊ शकते, त्यासाठी मोठे जिल्हा रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालय तयार आहे. आधुनिक वैद्यक विज्ञानाच्या पलीकडे जाऊन भारतीय व चिनी वैद्यक, होमिओपथी वगैरे उपचार पद्धतींमध्ये आता शास्त्रज्ञ उत्तरे शोधत आहेत. पण भारतात या दृष्टीने म्हणावेसे काम नाही. भारतीय शिक्षण संस्थांची व्यापक संशोधनाची मानसिकताच नाही. चांगल्या दर्जाचे लोकोपयोगी संशोधन व तंत्रज्ञान विकसित झाले तरच मेडिकल टूरिझमचा डंका वाजू शकतो.

हे सर्व कसे सुरू होईल हे आज मला माहीत नाही. अनेक चांगले डॉक्टर्स अशा बदलाची वाट पाहत आहेत परंतु यासाठी या व्यावसायिक वर्तुळाच्या बाहेरच्या संस्था संघटनांचा संपर्क व्हावा लागतो. त्यातूनच नव्या संपकल्पना आणि रचना तयार होऊ शकतात. नाशिकच्या नव्या नगर रचनेत आतला, मधला व बाहेरील रोड असा काही आराखडा असतो. त्याबरोबरच अशा त्रिस्तरीय आरोग्य वैद्यकीय सोयींचा विभागवार आराखडा-आजचा आणि उद्याचा तयार व्हायला पाहिजे. तथापि या पुढच्या आरोग्य वैद्यकीय सेवांसाठी इच्छा आणि उर्जा असणारे थोडेफार डॉक्टर्स तर असायला लागतील. शास्त्रीय, सहानुभूतीपूर्ण, भरवशाच्या आणि परवडणार्याण उत्तम सेवा सर्वांना मिळण्यासाठी एका दशकानंतर नाशिक हे डेस्टिनेशन व्हायला हवे.

डॉ. शाम अष्टेकर
फोन ९४२२२७१५४४

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.