निरोगी शहरे आणि नाशिक वृत्तपत्र लेखन

नाशिक हे महाराष्ट्रातच काय पण देशातल्याही अनेक चांगल्या शहरांपैकी एक आहे हे मी नक्की म्हणू शकतो. इतके चांगले हवामान, आजूबाजूला हिरवाई व डोंगरदर्याप आणि म्हटले तर मोठे, म्हटले तर छोटे असे दुसरे आटोपशीर शहर महाराष्ट्रात तर नक्कीच नाही. योग्य काळजी घेतली तर नाशिक हे महाराष्ट्रातल्या आदर्श शहरांपैकी होऊ शकते. पुणे नाशिक रस्ता तर १-२ वर्षात होईल, विमानतळही लवकरच चालू होईल. हे सर्व सुरळीत झाले तर मेडिकल टूरिझमच्या दृष्टीने देखील नाशिक विकसित होऊ शकते. पण जगातली आदर्श शहरे शोधायची तर युरोपमध्ये जावे लागते. युरोपमधली सर्वच शहरे अत्यंत स्वच्छ, मोकळी, सुरक्षित आणि आरोग्य परिपूर्ण आहेत. त्या शहरांमधल्या नद्या देखील स्वच्छ आहेत आणि शहराच्या ऐन मध्यातून लोक चालत किंवा सायकलने रस्ता ओलांडू शकतात, अगदी लहान मुले देखील. चांगल्या निरोगी शहरासाठी तीन घटक आवश्यक आहेत, अस्वच्छता व रोगराईचा प्रतिबंध, आरोग्य संवर्धनासाठी सोयीसुविधा आणि चांगल्या वैद्यकीय सोयी.

अस्वच्छता व रोगराई प्रतिबंधासाठी महाराष्ट्रातल्या इतर शहरांच्या तुलनेत नाशिक जरा बरे आहे, पण आदर्श मात्र नाही. गोदावरी प्रदूषण हा आपला सगळ्यात ठळक दोष आहे. त्यातले ८०-९०% प्रदूषण कारखाने नाही तर मनपाचे सांडपाणी करते. घनकचर्याहची परिस्थिती घंटागाडीमुळे पुण्यापेक्षा देखील चांगली आहे. पुण्यातल्या मुठा नदीचे कधीच बांधीव गटार झालेले आहे, तेवढे गोदावरीचे नुकसान झालेले नाही पण गोदावरी आपण जर्मनीतल्या किंवा पॅरिसच्या सीन सारखी,डॅन्यूबसारखी स्वच्छ करू तेव्हाच खरे शुद्धीकरण होईल. जेएनयुआरएम योजनेतून आपण हे करू शकलो असतो. घनकचर्याडची अंतिम विल्हेवाट कुठे लावायची हा प्रश्नो शहराला भेडसावतो आहे. घनकचरा व्यवस्थापनात जगभर नवनवे प्रयोग होत आहेत. कचर्याुचे घरापासून विल्हेवाटीपर्यंत विभाजन, शक्य तेवढे कंपोस्टिंग, प्लॅस्टिक कचर्यारचा पुनर्वापर (उदा. रस्त्यासाठी), ई कचर्या चे वेगळे संकलन व विषारी टाकाऊ पदार्थांचे (उदा. मोबाईलच्या बॅटर्यान) मनपाने वेगळे संकलन असे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

शहरी रस्तेवाहतुकीत मोठ्या रस्त्यांवर विभाजक, सर्व रस्त्यांवर मोठे फुटपाथ आणि त्यावर सायकल ट्रॅक्स ही आदर्श व्यवस्था असायला पाहिजे. खरे तर इथे फुटपाथचाच पत्ता नाही, असल्यास त्यावर अतिक्रमणे असतात. वाहतूक नियंत्रण हा तर फारच बिकट प्रश्नं झालेला आहे. नागरिकांना निर्धोक प्रवास करता येणे हे चांगल्या शहराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यासाठी अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक असायला हवी. मोठी बससेवा मुबलक नसली तरी मिनीबस सेवा असायला पाहिजे. चांगली मिनी बससेवा मिळाली तर खाजगी वाहनांची गर्दी कमी होईल, त्याशिवाय वाहतूक स्वच्छ होणार नाही. पर्यावरणवाद्यांनी रस्ता रुंदीकरणात अडथळे उभे केलेले आहेत, याचे निराकरण होईल तो सुदिन. वाहतूक कोंडीने प्रचंड प्रदूषण होते एवढेतरी पर्यावरणवाद्यांनी लक्षात घ्यावे.

आरोग्य संवर्धनासाठी योग्य आहार विहार महत्त्वाचा. शहरी नागरिकांचे आरोग्य मोजण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्थूलतेचे प्रमाण. सुटलेली पोटे, वाढलेले कंबर-नितंब गुणोत्तर वगैरे बेढब आरोग्याच्या खाणाखुणा आहेत. नागरिकांच्या जीवनशैलीतच शारीरिक हालचालींना पुरेसा वाव असणे महत्त्वाचे आहे. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कळीची भूमिका बजावू शकते. चालण्याचा किंवा सायकलींचा वापर यासारखे आरोग्य संवर्धक साधन नाही, नगररचनेत त्याला प्रमुख स्थान असायला हवे.

सरतेशेवटी निरोगी शहरांसाठी चांगली वैद्यकीय व्यवस्था पाहिजे. नाशिकमध्ये खाजगी आरोग्यसेवा प्रगत असल्या तरी सार्वजनिक व धर्मादाय (स्वस्त) रुग्णसेवा अपुर्याम व अविकसित आहेत. महसुली विभागाचे मुख्य शहर असूनही नाशकात शासकीय महाविद्यालय नाही. महापालिका व शासनाने एकत्रपणे अशा सेवांचा विकास व विस्तार करायला पाहिजे, आवश्यक तेथे खाजगी व धर्मादाय संस्थांशी सहकार्य करून वैद्यकीय क्षेत्राचा समुचित विकास करावा. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्याखेरीज यातल्या काही गोष्टी हाती घेणे अवघड आहे पण सगळ्याच गोष्टींना पैसे लागत नाहीत. प्रशासनसुधार आणि नागरिकांना सहभागी करून सध्याच्या व्यवस्था सुधारण्याने निदान सुरुवात होऊ शकते. महापालिकेचे सध्याचे आयुक्त स्वत: एक डॉक्टर आहेत त्यामुळे नागरिकांच्या आणि संस्थांच्या सहकार्याने एका आदर्श शहराची आशा आपण बाळगावी काय? या माझ्या कॉलममध्ये नाशिकच्या आरोग्य वैद्यकीय प्रगतीसाठी या निरनिराळ्या मुद्यांवर काही लेख मी लिहीणार आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.