जगभर हृदयविकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अविकसित देशांमध्ये देखील हे आजार आता सर्वाधिक महत्त्वाचे झालेले आहेत. आयुष्याच्या ऐन भरात हृदयरोगाचा झटका येणे आता जवळजवळ अपेक्षितच असते. उतारवयात धमन्यांचे आजार मेंदू ऍटॅक किंवा पक्षाघात घडवून शकतात. आयुर्वेदामध्ये शरीरातील पोकळ्या व प्रवाह -स्त्रोतस-स्वच्छ व वाहते ठेवण्याची महती सांगितलेली आहे. मात्र वयानुसार रक्तवाहिन्यांमधून मेद आणि चुना यांचे क्षार आतून चिकटतात व आतून अरुंद व कडक होत जातात. हा कदाचित बैठ्या जीवन शैलीचा व बदलत्या अन्नसंस्कृतीचाअपरिहार्य परिणाम आहे. आपल्या घरांमधल्या पाण्याच्या पाईपलाईन क्षारांमुळे जशा खराब होत जातात तशीच ही एक रोग प्रक्रिया आहे. या आजरांवर जर्मनीमध्ये प्रथम परिणामी एंजिओग्राफीचे निदान विकसित झाले. व तिथेच एंजिओप्लास्टी देखील शोधली गेली. बायपासची सर्जरी हा देखील पर्याय त्या खराब झालेल्या रक्तवाहिन्यांसाठी वापरात आला.
आज जगभर हृदयविकारांचा अभ्यास व संशोधन हे वैद्यकशास्त्रातले सर्वात प्रगत व श्रीमंत दालन आहे. हृधयविकाराच्या प्रभावामुळे राष्ट्रीयदृष्ट्या देखील हृदयविकार तज्ज्ञ सर्वच देशांमध्ये वैद्यक शास्त्राचे नेतृत्व करताना दिसत आहेत. तथापि एंजिओग्राफी किंवा बायपास हे या आजाराचे निवारण करू शकत नाहीत म्हणजे मूळ प्रश्न सोडवू शकत नाही. शरीरभर सर्वत्र रक्तवाहिन्या खराब होत जातात मात्र या शस्त्रक्रियांनी आपण केवळ हृदयातला अडथळा तात्पुरता काढून टाकतो. नंतर सर्व प्रक्रिया चालूच राहते व या धमन्या देखील खराब होतच राहतात. एवढेच नव्हे तर कोलेस्ट्रॉल मेदाबद्दल आणि त्यावरच्या स्टॅटीन उपचारांचे काम देखील — आहे म्हणूनच या धमनीविकारांकडे नव्याने शास्त्रीय दृष्टीकोनातून उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू होते. अमेरिका, जर्मनी व इतर काही देशात यापासून किलेशन उपचारांचा प्रयोग केला जातो. अमेरिकेतली वैद्यकीय व्यवस्था जास्त बंदिस्त व इन्शुरन्सग्रस्त असल्यामुळे या थेरपीला सर्वमान्यता मिळालेली नाही. मात्र जर्मनीत ही थेरपी राजरोसपणे व फायदेशीर वापरली जाते. अमेरिकन वैद्यक शास्त्राचा व्यापारी दृष्टीकोन या पर्यायांना प्रमुख अडथळा ठरला आहे. किलेशनचे समर्थक प्रत्न करीत आहेत. नुकतीच या बाबतीत एक टॅक्ट आली, त्यातून किलेशनबद्दल काही स्टगन निकाल दिसले आहेत.
किलेशन म्हणजे शरीरातील हेवीमेटल (लोह, ऍल्युमिनियम, कॅल्शियम आदि जड धातू) औषध प्रक्रियेने काढून किडनीमार्फत बाहेर टाकून देण्याची प्रक्रिया. खाण कामगारांमध्ये पूर्वीपासून यासाठी हे औषध जगभर वापरले जाते व इंडियन फार्मोस्कोपियाला देखील यासाठी मान्यता आहे. मात्र हे निर्धोक व परिणामकारक औषध हृदयविकारासाठी किंवा धमन्यांच्या आजारांसाठी उपयोगी आहेत की नाही याबद्दल भारतीय पुस्तकांमध्ये समर्थक उल्लेख नाही किंबहुना भारतात शास्त्रीय अभ्यास झालेले नाही. आपल्याकडे वैद्यकशास्त्रात औषधे येण्याची व उपचार मुख्य प्रवाहात येण्याचे मार्ग म्हणजे मान्यताप्राप्त वैद्यकीय पाठ्यपुस्तके. भारतात औषधांबद्दलचे फारसे मूळ संशोधन होत नाही. केवळ फेज टू क्लिनिकल ट्रायल्स होतात असा हा वेगळा विषय आहे.
गेली काही वर्षे मुंबईत श्री. भालचंद्र गोखले हे खाण विषयातले आय.आय.टी चे तज्ज्ञ यांनी उतारवयात हृदयविकाराच्या समूळ उपचारांसाठी किलेशनचा पर्याय वापरून पाहिला. अर्थातच डॉ. पटेल आणि काही मंडळी मुंबईत असे उपचार गेली काही वर्षे शेकडो रुग्णांवर विशेष यशस्वी प्रमाणात करत आहेत पण त्यांचे अद्याप भारतीय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट झालेले नाही. किलेशन उपचारात ई.डी.टी.ए हे औषध लोकलमधून इतर काही औषधांबरोबर समाविष्ट करून हळूहळू द्यायचे असते. आठवड्यात दोन ड्रीप्स याप्रमाणे एकूण 30 ड्रॉप्स ड्रीप्स 3-4 महिन्यात मिळून दिल्या जातात. सुरुवातीस हृदय, किडनी यांच्या काही बायोकेमिक तपासण्याही केल्या जातात. ड्रीपनंतर रक्तवाहिन्यांमधून निघालेला सूक्ष्म कचरा मुत्रपिंडांवाटे वाहून जातो त्यामुळे या उपचारात मुत्रपिंडे शाबित असावी लागतात. हे उपचार पूर्णपणे निर्धोक आहेत. हृदयविकाराबरोबरच पक्षाघातानंतरचे 2-3 महिने यादृष्टीने लाभकारक ठरू शकतात. तसेच डायबिटीस, अलझायमरची सुरुवात इ. विकारांमध्येही या उपचाराचा उपयोग होऊ शकेल. हे उपचार कोणत्याही साध्या रुग्णालयात करतात आणि उपचारांबरोबरच प्रतिबंधक म्हणूनही याचा उपयोग अपेक्षित आहे. अतिरक्तदाब हा विकार भारतातील प्रौढ व्यक्तीत 20-30% प्रमाणात आढळतात. या विकारातील रक्तवाहिन्यांमधील अडथळे काढल्यामुळे हृदयाला अधिक पंपिंग करायला लागणे ही मूळ प्रक्रीया असते. किलेशन उपचारांनी रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातील सूक्ष्म अडथळे आस्तेआस्ते कमी झाल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. अतिरक्तदाब सौम्य होतो हे मी स्वत: एका केसमध्ये पाहिलेले आहे.
मात्र याबद्दलचा अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. एकूणच किलेशन उपचार धमन्यांची मूळ रोगप्रक्रिया दुरुस्त करणारा कमी खर्चातला उपाय असल्यामुळे त्याचे अभ्यासपूर्ण स्वागत करायला हवे असे माझे मत आहे. अन्यथा हृदयविकार व पक्षाघात आदि विकारांवर अधिकाधिक रुग्णालये व खर्चिक उपचार वाढतच राहतील. किलेशनसाठी इंजेक्शनच्या ऐवजी तोंडाने गोळ्या घेण्याचाही व इनिमाचाही पर्याय आहे मात्र इंजेक्शन-ड्रीपपेक्षा तो किती परिणामकारक आहे हे अजून निश्चित झालेले नाही. भारतातील प्रगत वैद्यक विश्वातले आधुनिक डॉक्टर खाजगीरित्या आयुर्वेद, होमिओपथी, योग वगैरेंचे उपाय सर्रास वापरतात. मात्र असा सल्ला देत नाहीत किंवा लिहून देत नाहीत. भारतीय वैद्यक परिषद कायद्यातल्या बंदिस्तपणामुळे इतर पॅथींमधले उपचार तर सोडा पण स्वत:च्या शास्त्रातले पर्यायदेखील नीटपणे अभ्यासले जात नाहीत. भारतीय वैद्यकव्यवहार हा व्यापारी कचाट्यात सापडला आहे. पंचतारांकित रुग्णालयातील प्रचंड गुंतवणूक सोप्या व सुप्त पर्यायांना वर येऊ देत नाही. शास्त्रापेक्षा यात व्यवहाराचा अडथळाच जास्त आहे. श्री. भालचंद्र गोखले यांनी याबद्दल इंडियन मेडिकल कौन्सिल व भारत सरकारचे आरोग्य खाते वगैरे संस्थांकडे याबद्दल दाद मागितली आहे. शास्त्रात मान्य असलेले निर्धोक औषध रोगनिवारणासाठी वापरण्यात फारशी अडचण नसावी. याबद्दलचे शास्त्रीय निकष पाळून अधिक अभ्यास करण्याची काही अडचण नसावी. खरे म्हणजे असे अनेक पर्याय शोधण्यासाठी फारसे लांब जावे लागत नाही. ऍप्रॉप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणजे अनुचित तंत्रज्ञान हा मंत्र आपण विसरायला नको.
डॉ. शाम अष्टेकर
फोन ९४२२२७१५४४