आधुनिक औषधशास्त्राप्रमाणे औषधांची एक वर्गवारी इथे दिली आहे. आपल्या दृष्टीने यातले निवडक गटच महत्त्वाचे आहेत. भूल देण्याची औषधे, हृदय-रक्ताभिसरणाची आणि कॅन्सरवरची औषधे, इत्यादी गट तज्ञच वापरु शकतात. एकदा ही वर्गवारी लक्षात घेतली, की औषधे नेमके काय परिणाम करतात, तेही थोडेसे आपल्या लक्षात येईल.
1. पचनसंस्थेवर परिणाम करणारी औषधे
आम्लविरोधी, अन्नमार्गाचे चलनवलन आणि कळ कमी करणारी. जठरव्रण बरा करणारी, विष्ठा सैल करणारी – जुलाब घडवणारी. मूळव्याध, भगेंद्र यांवरची मलमे. जुलाब कमी करणारी-थांबवणारी. स्वादुपिंड व यकृतासंबंधी औषधे. पाचक संयुगे, इत्यादी.
2. हृदय व रक्ताभिसरणावर परिणाम करणारी औषधे
रक्तदाब कमी करणारी. हृदयविकार, वेदना यांवरची. रक्तवाहिन्यांचे जाळे सैलावणारी. रक्तवाहिन्यांचे जाळे आकुंचित करणारी (उदा. अर्धशिशीवरची अर्गोमिन गोळी, ऍड्रेनलिन इंजेक्शन). रक्तस्त्राव थांबणारी. रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारी. इतर.
3. मेंदूवर परिणाम करणारी औषधे
वेदनाशामक, तापशामक (वेदना, ताप, उलटी यांचे नियंत्रण मेंदूमार्फत होते.) उदा. अस्पिरिन, पॅमाल, झोप आणणारी. गुंगी आणणारी, शांत करणारी, नैराश्यविरोधी, उलटी-विरोधी, झटके थांबवणारी, उत्तेजित करणारी.
4. स्नायू, अस्थिसंस्थेवर परिणाम करणारी औषधे
‘दाह’-विरोधी औषधे (उदा. इब्युप्रोफेन, ऍस्पिरिन). स्नायू सैलावणारी. लचक. इत्यादींवर लावायची औषधे. चेतापेशी-स्नायुपेशी संबंधावर परिणाम करणारी औषधे (उदा. नाग, मण्यार विषबाधेवर वापरावयाचे निओस्टिग्मीन इंजेक्शन).
5. संप्रेरके
स्त्रीसंप्रेरके, पुरुषसंप्रेरके, इतर स्टेरॉईड संप्रेरके. रक्तातील साखर कमी करणारी संप्रेरके (उदा. इन्शुलिन). स्त्रीबीजसंप्रेरके (उदा. क्लोमीफेन ). गलग्रंथी संप्रेरके, इत्यादी औषधे.
6. मूत्रसंस्थेवर परिणाम करणारी औषधे
लघवी वाढवणारी. मूत्रसंस्थेतली वेदना कमी करणारी (उदा. फेनझोपायरिडीन)
7. जननसंस्थेवर परिणाम करणारी औषधे
गर्भाशयाचे स्नायू आकुंचित करण्यासाठी (अर्गोमेट्रिनची गोळी व इंजेक्शन). बाळंतपणाच्या कळा वाढवणारे (ऑक्सिटो-सीन). गर्भारपणात गर्भाशयाचे स्नायू शिथिल-शांत करणारे. गर्भपातासाठी. शुक्रपेशीमारक गर्भनिरोधक मलम, गर्भनिरोधक गोळया, इत्यादी.
8. जंतुविरोधी औषधे
प्रतिजैविक औषधे (पेनिसिलीन, ऍंपी, इमासीन, टेट्रा, इ.) सल्फा औषधे. बुरशीविरोधी (उदा. नायटा मलम). अमीबा-जिआर्डियाविरोधी. हिवताप जंतुविरोधी (उदा. क्लोरोक्वीन). जंतविरोधी (उदा. बेंडॅझोल). निरनिराळया लसी (उदा. त्रिगुणी, पोलिओ, इ.) जंतुविषविरोधी (उदा. धनुर्वात, इ.)
9. पोषणविषयक औषधे
टॉनिके. क्षुधाप्रेरक औषधे. लोहयुक्त औषधे. इतर क्षार (कॅल्शियम, इ.) जीवनजल पावडर. शिरेतून देण्याची ‘सलाईन’, ग्लुकोज सलाईन’, जीवनसत्त्वे. इतर.
10 श्वसनसंस्थेवरची औषधे
श्वासनलिकांचे जाळे सैल-रुंद करणारी, दमाविरोधी, खोकला दाबणारी (कोडीन), निरनिराळया खोकल्याची औषधे-बेडका सैल करणारी. श्वसनाला चालना देणारी (तातडीच्या वेळी वापरण्याची) औषधे.
11. नाक, कान, घसा
चोंदलेले नाक मोकळे करणारी औषधे, कानाचे निरनिराळे थेंब-जंतुनाशक, बुरशीनाशक, मळ सैलावणारी, इ.
12 डोळयावरची औषधे
जंतुदोषविरोधी थेंब, मलमे, दाह कमी करणारी, डोळयाची बाहुली आकुंचित किंवा मोठी करणारी, इतर.
13 वावडेविरोधी औषधे
उदा. सी.पी.एम. गोळी, स्टेरॉईड औषधे, इ.
14. त्त्वचेसंबंधी औषधे
दाहशामक औषधे (उदा. कॅलमिन द्राव). बुरशीनाशक, जंतुदोषनाशक, इ.
15. शस्त्रक्रिया व भूल या संबंधाची औषधे
उदा. भूल देण्याचे ईथर, इ. शस्त्रक्रियेसाठी जंतुनाशक द्राव, इ.
16. कर्करोगविरोधी औषधे
17. प्रतिकारशक्तीसंबंधी औषधे
शरीराच्या संरक्षण व्यवस्थेचा उपद्रव होत असेल तर तो दाबणारी औषधे (उदा. स्टेरॉईड औषधे)
18. व्यसनमुक्ततेसाठी मदत करणारी औषधे
उदा. दारूच्या व्यसनातून सोडवण्यासाठी डायसल्फिराम.
19. विषबाधेवरचे उतारे
सर्प विषउतारा (ए.एस.व्ही.), हेपारिन निओस्टिग्मीन. कीटकनाशकांवरचे उतारे (उदा. ऍट्रापिन, पाम, इ.)
20. रक्त व रक्तपेशी, रक्तद्राव, इ.
शस्त्रक्रियेच्या वेळी. रक्तस्त्राव भरून काढण्यासाठी. तीव्र रक्तपांढरी झाली असेल त्यावेळी वापरण्यासाठी.
या पुस्तकात दिलेली औषधांची यादी योग्य व आवश्यक औषधांतूनच घेतली आहे. हे करताना खालील पाच कसोटया लावल्या गेल्या आहेत. निरनिराळया औषधांचा अभ्यास करून जास्तीत जास्त योग्य औषध निवडले आहे.